🟥भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना तयार राहण्याच्या सूचना.- साऊथ ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत मोठा निर्णय.- दिल्लीत घडामोडींना वेग
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीयांचा जीव घेतल्यानंतर आता केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची बातमी समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून आज बुधवारी सकाळी दिल्लीत परतले आहेत.
त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विमानतळावरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. यानंतर दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमधील केंद्रीय संरक्षण मंत्रालयात तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, अजित डोवाल आणि संरक्षण मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भारतीय सैन्यदलाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारत आता पाकिस्तानावर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
काही वेळापूर्वीच संरक्षण मंत्रालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीअंती तिन्ही दलाच्या प्रमुखांना आपापले सैन्य तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: भारतीय वायूदल आणि नौदलाला अलर्ट मोडवर राहण्याचा आदेश मिळाला आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहा, असे सैन्यदलाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये अथवा दिवसांमध्ये काहीतरी मोठी घटना घडू शकते का, याविषयी तर्कवितर्क बांधले जात आहेत. गेल्या काही तासांपासून दिल्लीत वेगवान घडामोडी सुरु आहेत.
काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पहलगाम येथे हल्ला झाला त्या बैसरन व्हॅलीत दाखल झाले. अमित शाह हेलिकॉप्टरने याठिकाणी उतरले. त्यानंतर अमित शाह यांनी हल्ला झालेल्या ठिकाणाची फिरुन पाहणी केली. अमित शाह याठिकाणी हल्ला कसा झाला, याची सगळी माहिती घेऊन त्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहेत. दिल्लीत गेल्या काही तासांपासून महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौधरी यांची एक उच्चस्तरीय बैठक संरक्षण मंत्रालयात सुरु आहे. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सगळ्या बैठकांमध्ये सहभागी होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये दिल्लीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.