🟥 पोलीस कॉन्स्टेबलने गळफास लावून केली आत्महत्या..( कॉन्स्टेबल सुरज पवार यांच्या या जाण्याने पसरली शोककळा
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.
कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या सुरज आनंद पवार (वय ३१ वर्षे, मुळ राहणार मळगाव – कुंभार्लीवाडी तालुका सावंतवाडी, सध्या – राहणार रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स,कुडाळ केळबाईवाडी)याचा मृतदेह ते राहत असलेल्या रामेश्वर प्रसाद अपार्टमेंट मधील फ्लॅट मध्ये सिलिंग फॅनला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या अस्वस्थेत आढळून आला.तपासाअंती सूरज पवार यांनी आपले कौटुंबिक कारणावरून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आज दुपारी पावणेचार पुर्वीची हि घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुरज आनंद पवार हे कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी आवळेगाव आऊटपोस्ट येथून ते कुडाळ पोलीस ठाण्यात हजर झाले होते. ते कुडाळ मधील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स मध्ये एकटेच राहत होते.आज दुपारी त्याच्या मित्राच्या मोबाईलवर त्यांनी ‘तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवीत आहे’ अशा आशयाचा मेसेज टाकला. त्या मित्राने याची कल्पना त्याचा मळगाव येथील भावाला दिली. ते तातडीने कुडाळला आले. तो राहत असलेल्या फ्लॅटवर गेले असता बाहेरून लॅच लावलेले होते. परंतु किल्ली बाहेर ठेवलेली होती. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सुरज पवार पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले.
सुरज पवार यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. सूरज पवार हे मळगाव-कुभार्लीवाडी येथील मूळ रहिवाशी होते. त्यांच्या त्या घरी आई, भाऊ, वहिनी आणि पुतण्या असा परिवार आहे. तर त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. सुरज पवार यांच्या या जाण्याने कुडाळ पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकाऱ्यानी हळहळ व्यक्त केली अप्पर पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले,पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. कांबळे यांनी सुद्धा याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात तातडीने भेट देऊन माहिती घेतली. अधिक तपस कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्री. माने करत आहेत.