आजरा शहराला व उपनगराला नियमित व वेळेवर पाणी पुरवठा
होत नसलेने.- दि. ११ मार्च, २०२५ रोजी नागरिकांचा महामोर्चा.
( अन्याय निवारण समिती व सर्व पक्षीय वतीने निवेदन.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शहराला व उपनगराला नियमित व वेळेवर पाणी पुरवठा होत नसलेने दि. ११ मार्च, २०२५ रोजी आजरा रहिवाशांनी आपले कार्यालयावरील पुकारलेल्या महामोर्चा बाबत निवेदन आजरा अन्याय निवारण समीतीच्या व सर्व पक्षीय वतीने निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजरा शहर व उपनगराला स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा होणेसाठी आजरा रहिवाशी अन्याय निवारण समितीतर्फे आपल्याला वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत. दिनांक ०१/०१/२०२५ रोजी आपल्या कार्यालयासमोर अन्याय निवाराण समितीचे सदस्य उपोषणास बसले होते. त्यावेळी आपण उपोषणाला सामोरे जाऊन संदर्भिय पत्र क्र. १ नुसार पंधरा दिवसात पाणी पुरवठा व्यवस्थित करतो असे लेखी उत्तर दिले होतें.
त्यानुसार अन्याय निवारण समितीच्या सदस्यांनी दि. ०१/०२/२०२५ पर्यंत वाट पाहुन दिनांक ०३/०२/२०२५ रोजी आपले दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी आपण संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये दिनांक १८/०२/२०२५ पर्यंत ३० अश्वशक्तीची नवीन मोटर बसवून नियमित पाणी पुरवठा केला जाईल असे लेखी उत्तर दिले होते. परंतु दिनांक २७/०२/२०२५ रोजी अन्यास निवारण समितीच्या अध्यक्षांशी संपर्क साधुन नवीन मोटर घेणे किती खर्चाचे आहे आणि हा केलेला खर्च वाया जाणार आहे हे आपण अन्याय निवारण समितीचे सदस्यांना पटवून सांगितले. त्या गोष्टी अन्याय निवारण समितीच्या सदस्यांनी मान्य केल्या व ज्याठिकाणी नवीन पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणाला दिनांक ०२/०३/२०२५ पासून पाणी पुरवठा केला जाईल असे सांगणेत आले. त्यावर अन्याय निवारण समितीचे सदस्यांनी आणखी दोन दिवस जादा घ्या परंतु पाणी पुरवठा व्यवस्थित करा असे सांगून दिनांक ०४/०३/२०२५ पासून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशा सूचना केल्या. हे आपण मान्य करून ४ मार्च २०२५ पासून पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आपण अन्याय निवारण समितीच्या सदस्यांना तोंडी आश्वासन
दिले. त्यानुसार आम्ही सर्व रहिवाशांना असे सांगून दिलासा देऊन थांबवले होते. परंतु दिनांक ४/०३/२०२५ रोजी सुध्दा पाणी पुरवठा सुरळीत न झालेने जनअक्रोश उफाळला असून दिनांक ११/०३/२०२५ रोजी आपले कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपण वेळकाढूपणा करत असलेल्या धोरणाचा निषेध करणार आहोत.

आजपर्यंत पाण्याच्या बाबतीत आजरा शहराच्या गल्लो-गल्लीमधून आलेले अर्ज उपनगरामधून आलेले अर्ज व अन्याय निवारण समितीतर्फे आलेले अर्ज अशा सर्व अर्जाना आपण केराची टोपली दाखविली आहे. तेंव्हा या मोर्चाद्वारे आपला निषेध करणेत येत आहे.
दिनांक ०१/०१/२०२५ रोजी व दिनांक ०३/०२/२०२५ रोजी नगरपंचायतीच्या लेटरहेडवर आपले सहिशिक्यानिशी पत्र देऊन सुध्दा आपण त्या पत्रानुसार कोणत्याही कामाची पुर्तता केलेली नाही. तेंव्हा अशा प्रकारची लेखी पत्रे देऊन जनतेची फसवणूक करत आहात याबद्दल आपलेवर फसवणुकीचा गुन्हा का करू नये याबाबत आपणास नोटीस वजा पत्र देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदरचा मोर्चा हा छ, संभाजी चौक येथून सुरु होऊन, आजरा नगरपंचायत कार्याल्यापर्यंत येईल याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे, सुधीर कुंभार, विजय थोरवत, संपत देसाई, बंडोपंत चव्हाण, मारुती सावतकर, गौरव देशपांडे सह सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
