🛑राज्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना आठवड्याला गाव भेटी द्याव्या लागणार.- ( महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश..)
🛑करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाला शुक्रवार पासून प्रारंभ.- किरणोत्सवाआधीच किरणे अंबाबाईच्या गाभाऱ्यात
🟥ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरण आढळून येतील,त्या परीक्षा केंद्राची मान्यता पुढील वर्षापासून रद्द होणार. ( बोर्डाकडून घेण्यात निर्णय.)
मुंबई ;- प्रतिनिधी.
मंत्र्यांपाठोपाठ आता अधिकारीही जनतेत जाऊन काम करावे लागणार आहे.जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकार्यांनी दर आठवड्याला गाव भेटी द्या!शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा!असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
वेगवान कारभारासाठी महसूल विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.महसूल विभागाकडून ११ कलमी परिपत्रक जाहीर.
परिपत्रकातील ११ कलमी मुद्दे
⭕सदर भेटी दरम्यान क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज यादृच्छिकरित्या व अचानक तंत्राचा वापर करुन तपासावे.सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या पार पडत आहे याची सकारात्मक खातरजमा करावी.यात केवळ औपचारिकता न ठेवता क्षेत्रीय यंत्रणेवर नियंत्रण राहील असे नियोजन करावे व दौ-यामध्ये सकारात्मक फलित निघेल याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.
⭕ग्रामपातळीवरील लोकांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करावेत. संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची सर्वसामान्यांशी वागणूक सौजन्यपूर्ण व संवेदनशीलतेची आहे,याबाबत जनसंवादातून खात्री करावी.
⭕गावपातळीवरील तसेच इतर अधिकारी / कर्मचारी नियमानुसार कार्यक्षेत्रात राहून आपले कर्तव्य निभावत असल्याची खात्री करावी.
⭕गौण खनिज व महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी नाविन्यपुर्ण संकल्पना राबविणे.तसेच, वाळू व गौण खनिज उत्पन्न तपासणी शासकीय धोरणानुसार अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा क्षेत्रीय भेटी दरम्यान करावी.
⭕क्षेत्रीय भेटी देवून नैसर्गिक आपत्तीप्रवण भागात भविष्यात आपत्ती कशी टाळता येईल याच्या उपाययोजना, भौगोलिक व स्थानिक परिस्थिती विचारात घेवून काय उपाययोजना करता येईल ?याबाबत वेळोवेळी त्या त्या मंत्रालयीन विभागास सुचित करुन जिल्हा, उपविभागीय तसेच तालुका पातळीवरील त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचित करुन कामे करुन घ्यावीत.
⭕मुख्यमंत्री महोदयांनी १०० दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने महसुली विभागास दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असल्याचा वेळोवेळी आढावा घ्यावा.
⭕सर्व कार्यालयांमध्ये कामकाज प्राधान्याने e-Office प्रणाली मध्ये होत आहे याची तपासणी करावी.
⭕सेवा हक्क कायदा पोर्टल,आपले सरकार पोर्टल,पी.जी. पोर्टल,पी. एम. जी पोर्टल, e-mutation, ई-पिकपाणी, e.Qj court इ. ऑनलाईन सुविधेमधील क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजास अनुसरून निर्गतीचा आढावा घ्यावा.
⭕सेतु कार्यालयाची तपासणी करावी व आवश्यक त्या सुचना संबंधितांना कराव्यात.
⭕कार्यालयांची तपासणी करत असताना कार्यालयीन इमारतीतील स्वच्छता,सुविधा इत्यादीची तपासणी करावी.
⭕कार्यालयाच्या समोर कार्यालयाचे नाव दर्शविणारे दर्शनीय व सुस्पष्ट नामफलक असल्याची तसेच नागरिकांची सनद, जनतेसाठी त्या कार्यालयामार्फत उपलब्ध होणा-या सुविधा व संपर्क क्रमांक हे त्या त्या कार्यालयासमोर लावण्यात आल्याची खात्री करावी.
🛑करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाला शुक्रवार पासून प्रारंभ.- किरणोत्सवाआधीच किरणे अंबाबाईच्या गाभाऱ्यात
कोल्हापूर :- प्रतिनिधी.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाला शुक्रवार पासून प्रारंभ होत आहे*मात्र, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सुरू असलेल्या चाचणीदरम्यान सोमवार पासूनच मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचली.त्यामुळे आता या पुढील सात दिवस किरणोत्सवाची पाहणी केली जाणार आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो.उत्तरायण किरणोत्सव ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान होत आहे.पूर्वी किरणाेत्सव सात दिवस चालायचा,मागील चार-पाच वर्षांपासून तो पाच दिवसांचा केला.आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सोमवार पासून ही पाहणी केली जात आहे.सोमवारी, मंगळवारी मावळतीची किरणे अंबाबाईच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचली.किरणांनी अगदी चरणस्पर्श केला.त्यामुळे आता २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत किरणोत्सवाचा सोहळा चालणार आहे.
💥थंडी कमी झाल्याचा परिणाम
आता थंडी कमी झाली आहे.त्यामुळे दाट धुके किंवा सायंकाळी लवकर सूर्यास्त होणे असे प्रकार होत नाहीत.त्यामुळे या काळात किरणांची प्रखरता तीव्र असते.नोव्हेंबर महिन्यातील दक्षिणायन किरणोत्सवापेक्षा जानेवारीतील किरणोत्सव अधिक क्षमतेने होतो,असा आजवरचा अनुभव आहे.
🟥ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरण आढळून येतील,त्या परीक्षा केंद्राची मान्यता पुढील वर्षापासून रद्द होणार. ( बोर्डाकडून घेण्यात निर्णय.)
मुंबई.- प्रतिनिधी.
💥फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरण आढळून येतील त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे.याबाबतचा मोठा निर्णय बोर्डाकडून घेण्यात येणार आहे.
🔴कोरोना काळातील सन २०२१ व सन २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षांच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१८, २०१९,२०२० , २०२३ व २०२४ या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचान्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
🛑फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्यात येईल.
🟥दोन्ही बाबीशिवाय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्हयात इ. १० वी व इ. १२ वी ची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकते प्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहिल.
🔴शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती,विभागीय मंडळे यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकार्याने परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथकांच्या भेटी होतील याचे नियोजन केले जाणार आहे.