लहाणपण ते शहाणपण यांना जोडणारा पूल म्हणजे पुस्तक!-
मडिलगे येथील सरस्वती वाचनालयात’ लेखक आपल्या भेटीला ‘उपक्रम संपन्न –
आजरा.- प्रतिनिधी.
वाचन संकल्प अभियानांतर्गत मडिलगे येथील सरस्वती वाचनालयात लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमासाठी लेखक आणि निवेदक असलेले डॉ . मारुती डेळेकर प्रमुख वक्ते होते . मडिलगे शाळा व हायस्कूलच्या ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसमवेत वाचक – लेखक परिसंवाद रंगला . डॉ . डेळेकर सर यांनी लेखनामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले, की आपल्या अवतीभवती चांगुलपणा भरलेली, समाज परिवर्तनासाठी धडपडणारी, प्रेमळ, मायाळू माणसे आहेत, त्यांच्या सहवासाने लेखन करण्याची प्रेरणा मिळते . त्याचबरोबर समाज बिघडवणारी, अराजकता माजविणारी माणसंही आजूबाजूला आहेत, त्यांच्यापासून सावध करण्याची जबाबदारी जाणकार किंवा जागल्या म्हणून लेखकाची असते, हीच प्रेरणा घेऊन मी कथा – कादंबरी लेखनाकडे वळलो . वि . स . खांडेकर, शिरवाडकर, रा. ना . चव्हाण हे लेखक आपल्या साहित्यातून मापूस उभा करत होते.
तसेच शिवाजी महाराज, जिजामाता, स्वामी विवेकानंद यांची चरित्रे चांगल्या माणसाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत . विदयार्थी जीवनात आपले व्यक्तीमत्व घडवायचे असेल तर, जीवनाला योग्य वळण लावायचे असेल तर, संकटांना सामोरे जात त्यावर मात करावयाची असेल तर, एकाच आयुष्यात अनेक आयुष्यांची अनुभूती घ्यावयाची असेल तर वाचन आवश्यक आहे . अस्सल, जिवंत जीवनानुभव घ्यावयाचा असेल तर सकस आणि कसदार वाचन करावेच लागेल . अर्थातच लहाणपण ते शहाणपण यांना जोडणारा पूल म्हणजे पुस्तकांचे वाचन होय . बदल – प्रतिसाद – प्रतिक्रिया – विचार – सुसंवाद -वाचन – पुस्तक ही साखळी अंगिकारली तर नक्कीच तुम्ही चांगल्या मार्गावर आहात .म्हणून वाचाल तर वाचाल आणि वाचवालसुद्धा!!