🟥मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड येथे धावत्या खासगी बसला भीषण आग.- ३४ प्रवासी बचावले..
कोलाड :- वृत्तसंस्था
मुंबई- गोवा महामार्गावर खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महामार्गावरील कोलाड येथे खाजगी प्रवासी बसला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे. धाटाव एमआयडीसी, दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्नीशमन दल, कोलाड रेस्क्यू टीम आणि पोलीस यांनी बचाव कार्य केले व आगीवर नियंत्रण आणले.
🟥समोर आलेल्या माहितीनुसार, बसमध्ये चालक आणि क्लिनरसह 34 प्रवासी होते. खासगी ट्रॅव्हल्सची ही एसी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्वरी येथून मालवणकडे निघाली होती. कोलाड रेल्वे पुलाजवळ आली असता बसच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला. तेव्हां ड्रायव्हरने गाडी थांबवून पाहिले असता बसने मागील बाजूस पेट घेतल्याचे दिसले. तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर आगीचा भडका उडाला. आगीच्या घटनेने प्रवाशी घाबरून गेले.