💥धक्कादायक 💥
🟥मोटारसायकल चालवत असताना खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट.- शिक्षकाचा मृत्यू;- धक्कादायक घटना..
🟥पट्टेरी वाघाची मोटरसायकलवर झडफ.- चालक गंभीर जखमी…
भंडारा :- वृत्तसेवा

भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोटारसायकल चालवत असताना खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तर शिक्षकाच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून मोबाईलचा स्फोट नेमका कसा झाला? याचा शोध सुरु करण्यात आला आहे.
🔴भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सानगडी नजीक असलेल्या सिरेगावटोला येथे ही धक्कादायक घटना घडली. सुरेश संग्रामे (वय ५५) असं मृतक मुख्याध्यापकाचं नाव आहे. सुरेश संग्रामे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. तर नत्थु गायकवाड (५६) असं गंभीर जखमी असलेल्या मागे बसलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जखमी नत्थु गायकवाड यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत सुरेश संग्रामे आणि गंभीर जखमी नत्थु गायकवाड हे नातेवाईक असून दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवासी आहेत. दोघेही मोटारसायकलवरुन नातेवाईकाच्या एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडं जात असताना ही घटना घडली.
🟥खिश्यात मोबाइलाचा स्फोट झाल्यानंतर सुरेश संग्रामे यांच्या कपड्याला आग लागली होती. भाजल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झालेत. त्यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मोबाईलची बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या स्फोटामुळे संग्रामे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला तर इतर नातेवाईकाच्या कार्यक्रमावर दु:खाचे सावट पसरले आहे.
🟥पट्टेरी वाघाची मोटरसायकलवर झडफ.- चालक गंभीर जखमी…
बांदा :- वार्ताहर

डेगवे – वराडकरवाडी येथे पट्टेरी वाघाने मोटरसायकलवर झडप घातल्याने डेगवे ग्रामपंचायत सदस्य राजेश नारायण देसाई हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर सावंतवाडी येथील डॉक्टर खटावकर यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
🔴राजेश देसाई हे मळगाव येथे शुक्रवारी रात्री पत्नी वर्षा ,मुलगा समर्थ यांच्यासह मोटर सायकलने डेगवे मोयझरवाडी येथून जत्रेला जात होते. डेगवे – वराडकरवाडी येथे आले असता त्यांच्यावर पट्टेरी वाघाने झडप घातली, त्यामुळे मोटरसायकल पलटी झाली. त्यावेळी सर्वांनी एकच आरडाओरड केला . मागून येणाऱ्या मोटरसायकलस्वारांनी आरडाओरड सुरुवात केली. त्यामुळे पट्टेरी वाघाने धूम ठोकली. जखमी झालेल्या राजेश देसाई यांना सरपंच राजन देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई ,चंद्रकांत परब यांनी त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. यासंदर्भात वनविभागालाही कळवण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ पट्टेरी वाघ वनविभागाला आढळले आहेत. सह्याद्रीच्या पट्ट्यात आंबोली ते मांगेली पर्यंतच्या परिसरात हे वाघ आढळले आहेत. त्यात डेगवे गावही येतो. पट्टेरी वाघाच्या या हल्ल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने यात लक्ष घालावे तसेच राजेश देसाई यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मधुकर देसाई यांनी केली आहे.