🛑केंद्रीय अधिकाऱ्यांना अटक करण्याचा राज्यांना अधिकार.- सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा!
🟥ठरलंय तर अडलंय कुठं? – महायुतीचा मुख्यमंत्री ठरला मग नावाची घोषणा का नाही? सर्वसामान्यांमधून विचारला जातोय सवाल
🔴अजित पवार दिल्लीत पोहोचले.- अमित शाह चंदीगडला निघून गेले.- महायुतीत राजकारण रंगले?
नवी दिल्ली – वृत्तसंस्था
राज्य सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना अटकेच्या घटनांमधील वाढ पाहता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. न्यायालयाने केंद्रीय अधिका-यांना सूडाच्या कारवाईपासून संरक्षण करण्याच्या स्पर्धात्मक उद्दिष्टांमध्ये संतुलन साधण्यावर भर देण्यात आला. अशा कारवाईमुळे घटनात्मक संकट निर्माण होऊ शकते. राज्य सरकारच्या पोलिसांना भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यापासून रोखता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
तामिळनाडू पोलिसांनी कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीच्या एका अधिका-याला अटक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, अधिकारी केंद्र सरकारचे आहेत का, त्यांना राज्य पोलिसांनी अटक करावी का, हा प्रश्न आहे. त्या अधिका-यांविरुद्ध कारवाई करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असती तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती, असे खंडपीठाने नमूद केले.
तामिळनाडूचे अतिरिक्त महाधिवक्ता अमित आनंद तिवारी यांनी युक्तीवाद केला की, ईडीच्या अधिका-याला २० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. राज्य पोलिस आरोपपत्र दाखल करण्यास तयार आहेत, परंतु ईडी सर्वोच्च न्यायालयात जात असल्याने प्रतीक्षा करावी लागते.
यावर आरोपी अधिका-याच्या वकिलाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिवारी यांनी आक्षेप घेतला आणि गुन्ह्याचा तपास कोणत्या एजन्सीने करायचा हा तपासाचा विषय असल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या तपासात आरोपीची कोणतीही भूमिका असू शकत नाही. मात्र त्यांना निष्पक्ष तपास करण्याचा अधिकार आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.
या खटल्यातील विरोधाभासी मुद्यांचा संदर्भ देत खंडपीठाने म्हटले की, संघराज्य रचनेत प्रत्येक घटकाला त्याच्या अधिकारक्षेत्राचे विशेष डोमेन राखून ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे. दरम्यान, हे प्रकरण राज्य विरुद्ध केंद्र असे असल्याने आम्ही सर्वसमावेशक फेडरल फ्रेमवर्कचे नियोजन करण्याचा विचार करू आणि अशा प्रकरणांमध्ये तपासासाठी नियमावली तयार करू, असे खंडपीठाने म्हटले. अटक करण्यात आलेल्या ईडी अधिका-याला दिलेला अंतरिम जामीन पुढील आदेशापर्यंत वाढवला आहे.
🟥ठरलंय तर अडलंय कुठं? – महायुतीचा मुख्यमंत्री ठरला मग नावाची घोषणा का नाही? सर्वसामान्यांमधून विचारला जातोय सवाल
मुंबई :- प्रतिनिधी.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे जवळपास ठरल्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. पण महायुतीचं जर ठरलंय मग महायुतीचा मुख्यमंत्री जाहीर का होत नाही? असा सवाल आता सामान्यांकडून विचारला जात आहे. मुख्यमंत्री निवडीत आपला कोणताही अडथळा नाही असं सांगणाऱ्या शिवसेनेची आता थोडी भाषा बदलली आहे. भाजपनं खुशाल मुख्यमंत्री निवडावा असं मुख्यमंत्री सांगत नाहीयेत. मुख्यमंत्री अजून ठरायचा आहे. तीन नेते बसून मुख्यमंत्री ठरवू असं एकनाथ शिंदे सांगू लागले आहेत.
🟥शिवसेना नेतेही आडून आडून मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचा दावा आहे हे सांगायला विसरत नाहीत. पण शेवटी बोलताना दिल्लीतले नेते सांगतील ते मुख्यमंत्री असतील असंही ते सांगतात. महायुतीतला तिसरा भागीदार असलेली राष्ट्रवादीची भूमिका मात्र अगदी स्पष्ट आहे. मुख्यमंत्री काहीही झालं तरी भाजपचाच होणार असं राष्ट्रवादी ठासून सांगत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तर निकालाच्या पहिल्या दिवसापासून भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं सांगतायेत. त्याचा त्यांनी पुन्हा पुनरुच्चार केलाय. महायुतीत सगळं काही अलबेल असेल पण मुख्यमंत्रिपदावरुन अलबेल आहे हे आता मात्र सांगता येणार नाही.
ज्याअर्थी मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर होत नाही त्याअर्थी भाजपच्या दाव्याला मित्रपक्षांपैकी कुणाचा तरी विरोध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे राज्यात पुढचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलंय. मात्र, महायुतीतील अंतर्गत वादामुळे हे नाव जाहीर करण्यास उशीर केला जातोय. सत्ता स्थापनेत माझा कोणताही अडसर नसेल अशी भूमिका मांडलेल्या एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द केल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाची चर्चा रखडली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपद निश्चित करण्याकरता भाजपाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाने निरिक्षकांची नावे जाहीर केली आहेत.
🔴अजित पवार दिल्लीत पोहोचले.- अमित शाह चंदीगडला निघून गेले.- महायुतीत राजकारण रंगले?
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंनी नाराज नसल्याचे स्पष्ट केलेले असले तरी त्यांचे असे अचानक आजारी पडणे व महायुतीच्या चर्चेच्या बैठका एकदा नाही तर दोनदा रद्द करणे हे महायुतीत काहीतरी कुरबुर सुरु असल्याचे संकेत देत आहे. अशातच भाजपा २०, शिंदे १३ आणि अजित पवार गटाला १२ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंनी मुख्यमंत्री पद सोडण्याच्या बदल्यात अजित पवारांच्याताब्यातील अर्थखाते, भाजपाच्या वाट्याचे गृहखाते मागितले आहे, असे समजते.
🟥यामुळे आपली खाती कमी होऊ नयेत किंवा जास्तीचे पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवार सोमवारी दिल्लीला पोहोचले होते. परंतू, अमित शाह हे जवळच असलेल्या चंदीगढला निघून गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांना अमित शाह यांची भेट घेता आलेली नाही. यामुळे अजित पवार त्यांचे पूत्र पार्थ पवार, सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अमित शाह दिल्लीत कधी परततात याची वाट पाहत थांबले आहेत, असे समजते आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी केंद्रीय नेतृत्व धक्कातंत्र अवलंबण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतू अजित पवारांनी शिंदेंची बार्गेनिंग पावर कमी करण्यासाठी शरद पवारांचा २०१४ चा डाव टाकत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देऊन टाकला आहे. यावरूनही केंद्रात भाजपाचे नेते नाराज असल्याचे कयास बांधले जात आहेत. अजित पवार सोमवारी दिल्लीत पोहोचले. चंदीगढ दिल्लीपासून तसे जवळच आहे. आज पंतप्रधान मोदी आणि शाह यांना एका कार्यक्रमाला उपस्थित रहायचे आहे. मोदी आज चंदीगढला जाणार आहेत. परंतू अमित शाह हे सोमवारी रात्रीच चंदीगढला निघून आले आहेत. शाह अजित पवारांना भेटू शकले असते, परंतू ते चंदीगढला निघून गेल्याने अजित पवारांना भेटीची वेळ दिली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
🟥फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्यावर पावसाचे सावट.- कोकणासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता
पुणे :- प्रतिनिधी.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. तापमानात मोठी वाढ झाल्याचे जाणवत आहे. ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे थंडीचा जोर कमी होऊन हे तापमान वाढले असून आता या सोबत राज्यात पाऊस देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
🔴हवेतील कमी झालेली आर्द्रता, कोरडे वातावरण व उत्तरेकडून येणारे वारे यामुळे राज्यात गारवा वाढला होता. गेले काही दिवस कडाक्याची थंडी नागरिक अनुभवत होते. मात्र, पुण्यात तर महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान नोंदवले गेले होते. मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे वातावरणात बदल होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार पुण्यात रविवारी १३.३ अंश सेल्सियस, तर सोमवारी १७.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत शहरातील तापमान ७ अंश सेल्सियसने वाढल्याचे दिसून येत आहे.
🟥पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र उत्तर तामिळनाडूवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आर्द्रता व दमटपणा वाढत आहे. पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील चारही उपविभागात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी ५ डिसेंबरला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात पुढील तीन दिवस शहरात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहील.
🔴रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे वाहून विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीने चांगला जोर धरला होता. डिसेंबर महिन्यामध्ये आता थंडीचा जोर अजून वाढणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत देखील किमान तापमान हे १२ अंश सेल्सिअस होते. तर जालना, हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान हे १३ अंश सेल्सिअस राहणार आहे. लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांत देखील पुढील ३ दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.