भ्रष्ट उमेदवाराला की भ्रष्टाचाराचा डागही नसलेला उमेदवार निवडायचा हे जनतेनेच ठरवावे.- स्वाती कोरी.
( भ्रष्टाचारांना पराभूत करण्याचे केले आवाहन.)
उत्तूर, प्रतिनिधी.
एकीकडे भ्रष्टाचाराने बरबटलेले मंत्री तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचा डागही नसलेले छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितराजे घाटगे कागल, गडहिंग्लज – उत्तूरच्या विधानसभेची निवडणूक लढवित आहेत.जनतेने या उमेदवारांची तुलना करुन मतदान करावे.असे आवाहन जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केले.
बहिरेवाडी(ता.आजरा) महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. दरम्यान भादवण येथे सत्यम मंडळ व संस्कार फौंडेशनच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी समरजितसिंह घाटगे यांना पाठींबा दिला. यावेळी उमेदवार समरजितसिंह घाटगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे, रणजीतदादा पाटील, दिग्विजय कुराडे, दिलीप माने, सागर कोंडेकर, दयानंद पाटील, प्रकाश कुंभार, संजय धुरे, प्रवीण लोकरे, अरुण व्हरांबळे, रमेश ढोणुक्षे, विश्वजीत पाटील, प्रकाश चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. कोरी पुढे म्हणाल्या श्री मुश्रीफ यांनी वडीलांसमान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी गद्दारी केली.त्याचप्रमाणे त्यांनी जेष्ठ समाजवादी नेते, आमचे वडील श्रीपतराव शिंदे यांचीही फसवणूक करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला.त्यांचा अपमान केला. याचा वचपा काढण्यासाठी कुणाच्या बापालाही न घाबरणारे जनता दलाचे कार्यकर्ते समरजितराजेंच्या प्रचारात आघाडीवर राहतील.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, उत्तुर विभागाने गतवेळी मंत्र्यांची पाठराखण केली. मात्र या परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोमकाकाईदेवी मंदिर सुशोभिकरणसाठी दीड कोटी रुपये मंजूर असलेल्या कामात सत्तर लाख रुपयांचेच काम केले व ऐंशी लाख रुपये मंत्री महोदयांनी व त्यांच्या लाडक्या ठेकेदाराने घशात घातले. मंदिरांसारख्या पवित्र कामातही खाऊगिरी न सोडणाऱ्या अशा भ्रष्टाचारी प्रवृत्तीला गाडूया.

यावेळी चंद्रकांत गोरुले, रमेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सुहास चौगुले यांनी स्वागत केले.उल्का गोरुले यांनी आभार मानले.
चौकट
भ्रष्टाचाराचे भूत गाडूया
स्वाती कोरी म्हणाल्या, गेल्या पंचवीस वर्षापासून सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता असे दुष्टचक्र पालकमंत्र्यांनी सुरू केले आहे. मी म्हणेल ती पूर्व दिशा, धमक्या, हुकूमशाही, बोगसगिरी, जनतेची दिशाभूल सुरु आहे. कागल गडहिंग्लज उत्तूरच्या जनतेच्या मानगुटीवर मंत्री मुश्रीफ नावाचे भ्रष्टाचाराचे बसलेले भूत गाडून समरजितराजेंना विजयी करा.
