रत्नागिरी रिक्षेचा नंबर वापरून कोल्हापुरात चालवली जात होती दुसरी रिक्षा
रत्नागिरी :- प्रतिनिधी.
रत्नागिरीतील रिक्षेचा नंबर वापरून कोल्हापुरात रिक्षा व्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
👉फैयाज दिलावर शेख वय ४० रा. शिरगाव हे रत्नागिरीत रिक्षा व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीची MH08E6576 या क्रमांकाची रिक्षा आहे. हि रिक्षा रत्नागिरी आरटीओ ऑफिसला पासिंगसाठी नेली असता ती ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्याचे त्यांना समजले. अधिक माहिती घेता कोल्हापूर आरटीओ कडून या रिक्षावर कारवाई केल्याचे समजले. जी रिक्षा कधी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर गेलीच नाही तिच्यावर कोल्हापुरात कारवाई कशी होते ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शेख यांनी कोल्हापूर गाठले. पण तेथे देखील समाधानकारक माहिती मिळाली नाही. एकाच नंबरच्या दोन रिक्षा आहेत याचा पुरावा पोलिसांना देण्यासाठी शेख यांचे मित्र फैयाज मुजावर यांनी हि रत्नागिरीतील रिक्षा नो पार्किंगमध्ये उभी करून त्यावर कारवाई करावयास लावली. या रिक्षेचा फोटो पोलिसांनी ऑनलाईन अपलोड करून कारवाई केली. याच दरम्यान ६ जून २०२१ रोजी शेख यांच्या मोबाईलवर रिक्षावर कोल्हापूर येथे कारवाईचा झाल्याचा मेसेज आला. मग पुराव्या दाखल हे दोन्ही फोटो कोल्हापूर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर चोगले यांना पाठवले. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कोल्हापुरात रत्नागिरीच्या रिक्षाचा नंबर वापरून व्यवसाय करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले आहे. या शोधकार्यात सहकार्य केलेले पोलीस निरीक्षक मधुकर चोगले यांचे सामाजिक कार्यकर्ते फैय्याज मुजावर यांनी आभार मानले आहेत.