Homeकोंकण - ठाणेआपला जिल्हा आपली बातमी महाराष्ट्रातील दिवसभराच्या घडामोडी एका छताखाली🟥निवडणूक आयोगाकडून लाडकी बहीण...

आपला जिल्हा आपली बातमी महाराष्ट्रातील दिवसभराच्या घडामोडी एका छताखाली🟥निवडणूक आयोगाकडून लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थिगिती./ पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात भाजपा आणि ठाकरे गट एकत्र काम करणार. बंद दाराआड चर्चा../बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट.- सिद्दीकी यांचा पोलीस सुरक्षा रक्षक निलंबित.


🟥निवडणूक आयोगाकडून लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थिगिती.

मुंबई :- प्रतिनिधी.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी ४० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत. कारण, तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

🟥आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजना त्वरीत थांबवल्या पाहिजेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या. तसंच, आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा आढावाही घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांकडे याबाबतची विचारणा केली. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं समोर आले. त्यामुळे विभागाकडून या योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला देण्यात आली. परिणामी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

🟪बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट.- सिद्दीकी यांचा पोलीस सुरक्षा रक्षक निलंबित.

मुंबई :- प्रतिनिधी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाकडून चूक झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळेच कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या शनिवारी रात्री बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यावेळी सोनावणे हेच सिद्दीकींसोबत होते. फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला, असा दावा सोनावणे यांनी केला आहे. बाबा सिद्दिकी यांना दिवसा दोन तर रात्री एका कॉन्स्टेबलची सुरक्षा देण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कालच पोलिसांनी जबाब नोंदवला. शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला तेव्हा हा कॉन्स्टेबल कुठे उभा होता? फायरिंग झाल्यावर त्याने काय केलं ? तो घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलिसांनी त्या सुरक्षारक्षक कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवून घेतला.
🟥मात्र आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. झिशान सिद्गीकी यांनी गेल्या दोन दिवसांत पोलिसांची भेट घेतली होती. या घटनेचे राजकारण करु नका. आम्हाला न्याय हवा, असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले होते. आपल्या वडिलांवर गोळीबार होत असताना पोलीस सुरक्षारक्षक काय करत होता, त्याला काहीच कसे करता आले नाही, असा सवाल झिशान यांनीही उपस्थित केला. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा सविस्तर जबाब नोंदवला जाणार आहे. दरम्यान बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर बाबा सिद्दिकींचा मुलगा झिशान सिद्दिकी यानं बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत एक निवेदन जारी केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की, माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांच्या जीवनाचं आणि त्यांच्या घरांचं रक्षण करताना आपले प्राण गमावले. आज माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचं राजकारण केलं जाऊ नये आणि नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे.

🟥पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात भाजपा आणि ठाकरे गट एकत्र काम करणार.- बाळ माने-महाडिक-बनेंमध्ये बंद दाराआड चर्चा!

रत्नागिरी – प्रतिनिधी.

रत्नागिरीत विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करण्यासाठी महायुतीतील भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट हातात हात घालून कामाला लागणार आहे. याबाबत आता खलबते सुरु झाली आहेत. रत्नागिरीत एक सक्षम उमेदवार दिला पाहिजे या मुद्द्यावर ठाकरे गटाचे नेते राजेंद्र महाडिक व उदय बने यांच्याशी माजी आमदार बाळ माने यांची बंद दाराआड चर्चा झाली आहे. यामुळे रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत यांच्यासमोर सक्षम पर्याय देऊन परिवर्तन करण्याबाबत ठाकरे गटाचे मनसुबे आहेत. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही याला बळ देण्याची ग्वाही दिल्याचे समजते. त्यामुळे मातोश्रींचा आदेश ठाकरे गटाला मानावाच लागणार आहे.
🛑निवडणुकीच्या युद्धात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असेही एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. शिवसेना-भाजप युती २०१४ मध्ये तुटली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अचानक शिवसेनेच्या गोटात दाखल झालेल्या उदय सामंत यांनी रत्नागिरीत विजय मिळवला. यामुळे धनुष्यबाणाचा पहिलाच आमदार झाला. २०१९ मध्ये भाजप-सेना युतीमुळे सामंत पुन्हा आमदार झाले. त्यानंतर युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी रत्नागिरी शिवसेना अभेद्य होती.
🟥अडीच वर्षांत राज्यात भूकंप झाला आणि शिवसेना फुटली. यात उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. रत्नागिरीतील काही पदाधिकाऱ्यांनी सामंत यांच्यासोबत काही पदाधिकारी, कार्यकर्ते गेले. परंतु आजही ठाकरे शिवेसेना कणखर आहे व मातोश्रीसोबत एकनिष्ठ असल्याचे लोकसभा निवडणुकीत हे दिसून आले आणि उमेदवार विनायक राऊत यांना दहा ते बारा हजारांचे लीड मिळाले.
आता विधानसभेच्या निवडणुकीत तीन वेळा पराभव पचवून पुन्हा एकदा बाळ माने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्यासमेवत तीन पर्याय आहेत. परंतु रत्नागिरीत सक्षम उमेदवार हवा याकरिता त्यांनी व्यूहरचना केली आहे. २५ वर्षांच्या युतीमुळे ठाकरे गटातील अनेकांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. यातूनच ते ठाकरे गटात प्रवेश करू शकतात, भाजपातच राहून आणखी काही वेगळा निर्णय घेऊ शकतात किंवा अपक्ष उभे राहण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. ठाकरे गटामधील इच्छुक राजेंद्र महाडिक, उदय बने यांच्याशी बाळ माने यांची बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्यामुळे परिवर्तनासाठी कोणता निर्णय होईल, हे आगामी काही दिवसांतच कळणार आहे. दबावतंत्र, साम-दामचा उपयोग करणे, विरोधकांना त्रास देणे सत्ताधारी पक्षालाही सोबत न घेणे अशा अनेक चुका प्रस्थापितांनी केल्या आहेत. विरोध करण्यासाठी सुद्धा शत्रूला शिल्लक ठेवायचे नाही, या नीतीमुळे आता रत्नागिरीत परिवर्तनासाठी माने-बने आणि महाडिक यांना कोण साथ देणार अशी चर्चा येथील मतदार संघात सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.