🛑वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवत गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालून ११ लाखा रुपयचा फसवणूकीचा प्रकार.
(आजरा उत्तुर येथील घटना)
🛑मातोश्रीवर आज तीन मोठे पक्षप्रवेश.- महाविकास आघाडीची जागा वाटपाची होणार पत्रकार परिषद.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील उत्तुर येथे मोबाईल वरून फसवणूकीचे कॉल करून वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवत गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालून उत्तुर येथील ऋषिकेश दिनकर घेवडे यांच्याकडून बँक डिटेल्स घेऊन अज्ञातांनी अकरा लाख रुपयांची रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आला असून घेवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तब्बल अकरा लाख रुपये उकळल्याने उत्तूर पंचक्रोशीत खळबळ माजली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती उत्तूर ता. आजरा येथील ऋषिकेश दिनकर घेवडे हे नोकरी निमित्त खडकपूर, पश्चिम निदनापूर, पश्चिम बंगाल येथे राहतात. मोबाईल वरून त्यांना अज्ञाताने संपर्क साधून आपण लोकसेवक असून फेडेक्स या इंटरनॅशनल कुरियर सर्विस मधून बोलत असून आपले पार्सल स्टफ झाले आहे ते पुढे जाऊ शकत नाही अशा आशयाची माहिती दिली व पार्सल ची खोटी डिटेल्स दिली. आपल्या नावाने पार्सल आले आहे व टेस्ट झाले आहे हे ऐकून नेमके कोणी पार्सल पाठवले आहे व पार्सल मध्ये काय आहे ? याबाबत यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली.
दरम्यान आपण नॅशनल क्राईम ब्रँचचे तपासी अधिकारी / डीसीपी बोलत असून या पार्सलच्या पार्श्वभूमीवर आपण मोठ्या गुन्ह्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे व आपणावर पोलीस कारवाई होणार असल्याची भीती दुसऱ्या एका मोबाईल वरून दुसऱ्या व्यक्तीमार्फत घेवडे यांना घालण्यात आली. हा फसवणूकीचा प्रकार लक्षात न आल्याने व पाठोपाठ एकमेकांशी संबंधित फोन सुरू झाल्याने घेवडे हे गोंधळून गेले. तातडीने त्यांना इन्स्टा लोन करून दहा लाख ९१ हजार रुपये एका बैंक खात्यावर भरण्यासंदर्भात सुचवण्यात आले अन्यथा सदर गुन्ह्यात आपण अडकाल अशी भीतीही घालण्यात आली.
या फोनच्या संदर्भाने घाबरून गेलेल्या घेवडे यांनी इन्स्टा लोन करून संबंधितांच्या सूचनेप्रमाणे दिलेल्या खात्यावर रक्कम पाठवली. त्यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची फिर्याद त्यांनी आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास गडहिंग्लज उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे निरीक्षक होडगर करीत आहेत.
🛑उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, मातोश्रीवर आज तीन मोठे पक्षप्रवेश.- महाविकास आघाडीची जागा वाटपाची होणार पत्रकार परिषद.
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात उतरलेत. एकीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी महायुतीला एकापाठोपाठ एक धक्के देत असतानाच आता उद्धव ठाकरेंच्याही शिवसेनेत इनकमिंग सुरु झाले आहे.आज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन बड्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार असून महायुतीला दुहेरी धक्का बसणार आहे.
🟥ठाकरे गटात इनकमिंग!
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससह भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरेंनी जोर का झटका दिला आहे. अजित पवार आणि भाजपची साथ सोडून आज दोन बडे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कोकणातील भाजप नेते राजन तेली, सांगोल्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दीपक आबा साळुंखे आणि चिंचवड येथील मोरेश्वर भोंडवे हे नेते आज मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत.
🛑मातोश्रीवर ३ मोठे पक्षप्रवेश
राजन तेली हे भाजपचे सावंतवाडी मतदारसंघातील बडे नेते असून त्यांनी दिपक केसरकर यांच्याविरोधात विधानसभा लढवण्यासाठी ठाकरे गटाचा मार्ग निवडला आहे. आज सायंकाळी ५ वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दुसरीकडे सांगोल्यातून अजित दादा गटाचे दीपक आबा साळुंखे यांचा संध्याकाळी ४ वाजता मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार आहे. सांगोल्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला होता. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंत दीपक आबा साळुंखे हे शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहेत. चिंचवड येथील अजित दादा गटाचे मोरेश्वर बोन्डवे यांचा ६ वाजता पक्ष प्रवेश होणार आहे.
🟥दरम्यान, विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ही पत्रकार परिषद होईल. मविआचे जागा वाटप अद्याप पुर्ण झाले नाही. काही जागांवर अजूनही तिढा असल्याने आज पुन्हा बैठक होणार आहे.