🛑मनसे विधानसभा निवडणुक स्वतंत्र लढणार.- कोणाशीही युती-आघाडी नाही.
( मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी केली घोषणा.)
🛑बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण!
एकाला पुण्यातून तर दोघांना नागपुरातून उचललं!!
🟥”शरद पवार फोडाफोडीच्या गोष्टी कशा करतात? ज्यांनी.”, राज ठाकरेंची तिखट शब्दांत टीका!
मुंबई :- प्रतिनिधी.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्ष देखील मैदानात उतरला असून त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोजित केलेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी घोषणा केली आहे. विधानसभा स्वतंत्र लढणार, कोणाशीही युती-आघाडी नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, आगामी निवडुकीसाठी ना युत्या, ना आघाड्या. आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेतील पक्ष असेल. ज्या लोकांनी आपल्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत त्या लोकांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू… जगाला हेवा वाटवा असा महाराष्ट्र घडावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. या राज्याची धुरा महाराष्ट्राने आमच्या हातात द्यावी. निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. सत्तेतील आणि विरोधातील लोक निवडणुकीसाठी काहीही करतील. उद्या जेव्हा हे राजकीय पक्ष पैसे वाटतील तेव्हा ते नक्की घ्या कारण तुमचे पैसे आहेत आणि मतदान मनसेच्या उमेदवाराला करा. एकदा मला महाराष्ट्र देऊन बघा मग महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
🟥रतन टाटासारखा सरळ सभ्य माणूस सर्वांना आवडतो तर राजकारणी सरळ सभ्य का नाही आवडत? खासदार फोडायचे, आमदार फोडायचे, विचार सोडून सत्तेत बसायचे हेच गेली पाच वर्षे सुरू आहे. हे फोडा फोडी असले धंदे करणारे राजकारणी हवेत? आज महाराष्ट्राच्या जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा. अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधी नव्हती. हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय राहणार, ही अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात कुणाला काहीच फुकट नकोय, फुकटचे पैसे नकोत, हाताला काम द्या, असे म्हणत लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका केली आहे. माझी भूमिका आधीच सांगितली होती, धमक पण आहे, मी शब्द देऊ शकतो. महाराष्ट्रात माझ्या हाताला सत्ता, द्या, प्रत्येकाला काम असेल,पण ते जातीप्रमाणे देणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
🟥बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण!
एकाला पुण्यातून तर दोघांना नागपुरातून उचललं!!
पुणे – प्रतिनिधी.
शहरातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी अखेर मुसक्य आवळल्या आहेत. घटनेच्या दिवसापासून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते. एवढेच नव्हे तर, आरोपींबाबत माहिती देणाऱ्यांना पोलिसांकडून 10 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता अखेर पोलिसांना या घटनेतील एका संशयित आरोपीला पुण्यातून तर, दोघांना नागपुरातून मुसक्या आवळ्यात यश आले आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका तरुणाला ताब्यात घेतले असून, येवलेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना 3 संशयित तरुण सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत. या सीसीटिव्हीद्वारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तर, दोघा संशयितांना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याचे सागितले जात आहे.
🟥बोपदेव घाटात नेमकं काय घडलं होतं?
गेल्या आठवड्यात बोपदेव घाटामध्ये 21 वर्षे तरुणी मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून त्या तरुणीचे आणि मित्राचे फोटो काढले. त्यानंतर या तिघांनी तरुणीला कारमध्ये बसवत तिला येवलेवाडीजवळ घेऊन गेले. या ठिकाणी तिघांनी तरूणीवर अत्याचार केले आणि नंतर तिला खडी मशीन चौकात सोडून पसार झाले होते.
बोपदेव घाटात रात्रीच्यावेळी कोणीच नसते, यामुळे मदतीला कुणीच आले नाही. यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती. घडलेल्या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केचदेखील प्रसिध्द करण्यात आले आहे.
🟥“शरद पवार फोडाफोडीच्या गोष्टी कशा करतात? ज्यांनी.”, राज ठाकरेंची तिखट शब्दांत टीका!
मुंबई – प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शरद पवार, उद्धव ठाकरे, भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या सगळ्यांचा समाचार आपल्या भाषणातून घेतला. शरद पवार म्हणतात माझा पक्ष फोडला. ते कशा काय फोडाफोडीच्या गोष्टी करतात? असा खोचक प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. आज राज ठाकरेंनी मुंबईतल्या नेस्को मैदानावर मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका केली.
प्रामाणिक उद्योजक चालतात मग राजकारणी का नकोत?
रतन टाटा यांचा आणि माझा खूप चांगला स्नेह होता. त्यांच्या निधनाने मलाही खूप दुःख झालं. मी लोकांच्या प्रतिक्रिया वाचतो आहे लोक म्हणत आहेत, सरळ, साधा आणि सज्जन माणूस होता. जर लोकांना रतन टाटांसारखा सरळ, साधा आणि सज्जन माणूस उद्योजक म्हणून आवडतो तर तुम्हाला सरळ, साधा आणि सज्जन राजकारणी का नको? प्रत्येक वेळी तुम्ही गद्दारांना कसं काय निवडून देता? खासदार, आमदार फोडायचे. एकाबरोबर निवडणूक लढवायची, मग निवडून आल्यावर विचारांशी प्रतारणा करुन दुसऱ्या पक्षांबरोबर जायचं आणि सत्तेत यायचं हेच मागची पाच वर्षे चाललं आहे. नेमकं तुम्हाला आवडतंय का? सरळ, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस पाहिजे की फोडाफोडी करणारे हवेत ते ठरवा असंही राज ठाकरे म्हणाले.
🟥काय म्हणाले राज ठाकरे?
शरद पवार सांगत आहेत आमचा पक्ष फोडला. मला हे काही कळलंच नाही. तुम्ही काय केलंत आयुष्यभर? १९७८ ला काँग्रेस पक्ष फोडला, १९९१ ला शिवसेना फोडली, त्यानंतर राणेंना फोडलं. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी करत आहेत? अजित पवारांबाबत मी बोललोच होतो. इतके दिवस ओरडत होते आता गुलाबी जॅकेट्स घालून फिरत आहेत. भाजपा या लोकांना स्वीकारतो कसा काय? अजित पवार भाजपात येण्याच्या आठ दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना आम्ही तुरुंगात टाकू. तुरुंगात टाकण्याऐवजी त्यांना मंत्रिमंडळात कसं काय टाकलं? हे सगळं का होतं आहे? कारण तुम्हाला गृहीत धरलं आहे. तुम्ही कोण आहात? मिंधे, लाचार सगळी जनता. पैसे फेकून तुमच्याकडून मतं घेऊन जाऊ, मग वाट्टेल तसं वागू, पैसे ओरबाडू अशी वृत्ती आहे असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राची अशी परिस्थिती कधीच झाली नव्हती
आज राज्यातल्या जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद होणार हे विसरु नका. अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती, असंही राज ठाकरे म्हणाले. काही निष्ठा वगैरे प्रकार आहे की नाही? महाराष्ट्राची अवस्था खूप वाईट झाली आहे. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.