🟥अवैध वाळू उपसा प्रकरणी दहा परप्रांतीय कामगारांवर कारवाई
मालवण :- प्रतिनिधी.

मालवण तालुक्यातील हडी कालावल खाडीपट्ट्यात अवैधरीत्या वाळू उपसा करण्यास आलेल्या दहा परप्रांतीय कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेत तहसीलदारांसमोर हजर करत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
हडी कालावल खाडी पट्ट्यात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने महसूल प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने महसूल विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेत अनेक डंपरवरही कारवाई केली.
🟥प्रांत ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष नांदोसकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत पेडणेकर, पोलीस हवालदार सुशांत पवार, महादेव घागरे, गृहरक्षक दलाचे जवान मिथुन म्हापणकर यांच्या पथकाने हडी कालावल खाडीपट्ट्यात अवैधरित्या वाळू उपसा करण्यास आलेल्या परप्रांतीय दहा कामगारांना ताब्यात घेत तहसीलदारांसमोर हजर करत प्रतिबंधात्मक कारवाई केली. यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
🟥देवली माळरानावर ५३५ ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त
मालवण :- प्रतिनिधी.
मालवण तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कठोर निर्देशानंतर महसूल प्रशासनाकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महसूल प्रशासनाने गुरूवारी सकाळी देवली माळरानावर तब्बल ५३५ ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. एकूण अकरा डेपोंवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाळूचा ताबा पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात आलेला असून जमिन मालकांचा शोध घेऊन त्यांना नोटीस बजावणी केल्यानंतर वाळूचा लिलाव करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
🟥मालवण तालुक्यात बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र गस्तीपथके तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच काही गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केल्या जात आहेत. देवली येथे मोठ्या प्रमाणात वाळू साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.
🟥तुकडेबंदी कायद्याचा भंग करून झालेले जमीन व्यवहार नियमित.- राज्य सरकारचा निर्णय!
मुंबई – प्रतिनिधी.
राज्यात तुकडेबंदी कायद्याचा भंग करून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत झालेले जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रचलित बाजारमूल्याच्या (रेडीरेकनर) ५ टक्के शुल्क आकारून नियमित करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील दोन ते अडीच कोटी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अर्धा एकर पेक्षा कमी बागायती किंवा दोन एकर पेक्षा कमी जिरायती जमीन खरेदी-विक्रीला बंदी घालणारा तसेच एक, दोन गुंठे जमीन खरेदीस प्रतिबंध करणारा महाराष्ट्र धारण जमीनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबतचा सन १९४७चा (तुकडेबंदी) कायदा आता कालबाह्य झाला आहे. या कायद्यांमुळे लोकांची मोठी अडचण होत असून तो रद्दच करावा अशी महत्त्वपूर्ण शिफारस याबाबत गठीत सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने राज्य सरकारला केली होती.
🟥जमीन महसुलाच्या अनुषंगाने राज्यातील जुनाट कायद्यांमध्ये कालसुसंगत बदल व सुधारणा सूचविण्यासाठी राज्य सरकारने दांगट यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रकांत दळवी, शेखर गायकवाड आदी सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची एक समिती गठीत केली होती. समितीचा हा अहवाल सरकारले स्वीकारला असला तरी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याच्या प्रक्रियेला विलंब लागणार असल्याने तोवर लोकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात तुकडा बंदी कायद्याचे उल्लंघन करून मोठ्याप्रमाणात जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेले असून अशा व्यवहारांच्या ७-१२ उताऱ्यावर तुकडा बंदी विरुद्ध व्यवहार अशी नोंद करण्यात आल्याने लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत झालेले जमीन हस्तांतरण किंवा विभाजन व्यवहार नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वित्त विभागाने असे व्यवहार करण्यासाठी प्रचलित बाजारमूल्याच्या २५ टक्के शुल्क आकारून नियमित करण्याची भूमिका घेतली होती. मात्र ती अमान्य करीत केवळ पाच टक्के शुल्क घेऊन हे व्यवहार नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
🟥सरकारने १२ जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार एक, दोन, तीन अशा गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्यावर निर्बंध घातले होते. मात्र लोकांच्या तीव्र विरोधानंतर यात सुधारणा करीत जिरायत जमिनीसाठी २० गुंठे, तर बागायत जमिनीसाठी १० गुंठे अशी मर्यादा ठरविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा शेत रस्त्यासाठी, घरांसाठी किंवा इतर काही कारणांसाठी एक दोन गुंठे जमीन खरेदी-विक्री करता येत नव्हती. त्यावर राज्य सरकारने १४ मार्च २०२४च्या अधिसूचनेनुसार तकुडेबंदी कायद्यात सुधारणा करीत काही बाबींसाठी गुंटेवारीची अट शिथिल केली होती. तरीही राज्यात या कायद्यास विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या निर्णयामुळे लोकाना दिलासा मिळेल असेही सूत्रांनी सांगितले.

🟥राज्याचे माजी पोलीस महासंचालक वसंत सराफ यांचे निधन!
पुणे – प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याआधी तत्कालीन द्वैभाषिक राज्याच्या पोलीस सेवेत रुजू झालेले आणि राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक वसंत केशव सराफ (वय ८६) यांचे गुरुवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. वसंत सराफ यांचा जन्म विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे झाला. त्यांचे वडीलही पोलीस खात्यात नोकरीस होते. एम़. एस्सी. पदवीनंतर सराफ हे भारतीय प्रशासन सेवा परीक्षेत पहिला वर्ग मिळवून ते उत्तीर्ण झाले. पोलीस प्रशिक्षणानंतर त्यांची १९५८ मध्ये उपसहाय्यक अधीक्षक म्हणून सूरत येथे पहिली नियुक्ती झाली. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर सराफ महाराष्ट पोलीस सेवेचा घटक झाले. १९६६ मध्ये त्यांची केंद्रीय गुप्तचर संस्थेत अधीक्षक म्हणून प्रतिनियुक्तीवर बदली झाली.१९७१ मध्ये त्यांना संशोधन आणि विश्लेषण शाखेत (रॉ)मध्ये नियुक्ती मिळाली. सीआयडीचे महानिरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९६८ मध्ये ते सीआयडीचे आयुक्त झाले. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिल्यावर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती मिळाली. १ जानेवारी १९९० रोजी ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले. ऑगस्ट १९९२ ला ते निवृत्त झाले.
🟥राज्यात आज दसरा मेळावे.- मुंबईत उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे संबोधित करणा.- बीडमध्येही पंकजा मुंडे व मनोज जरांगे घेणार दसरा मेळावा.- कोणाचा आवाज घुमणार? सर्वांचे लक्ष मेळाव्याकडे
मुंबई ;- प्रतिनिधी.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज्यात दसरा मेळावे होत आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. तर तिकडे बीडमध्येही दोन दसरा मेळावे होणार आहेत. बीडमधील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. तर बीडच्या नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा होणार आहे. त्यामुळे आजच्या राज्यात राजकीय दसरा मेळाव्यामध्ये आव्वाज कुणाचा? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. पण या मेळाव्यावर पावसाचं सावट दिसतं आहे. मागचे दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरही पाणी साचलं होतं. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष आहे. शिवसेना शिंदे गटाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे. आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भव्य असा स्टेज उभारला आहे. स्टेज च्या बाजूला 7 मोठे एलईडी स्क्रिन लावण्यात आल्या आहेत. आझाद मैदानावर सर्वत्र बॅरिकेटिंग करून, दीड ते दोन लाख शिवसैनिक बसतील एवढी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दसरा मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे काय रणशिंग फुकतील? शिवसैनिकांना कोणता कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीडमध्ये दोन दसरा मेळावे होत आहेत. भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आहे. तर मराठा आरक्षणसाठी लढा देणारे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्ह्यातील नारायण गड या ठिकाणी दसरा मेळावा घेत आहेत. रात्रीपासून या मेळाव्यासाठी लाखो मराठा बांधव नारायण गडावर जमायाल सुरुवात झाली आहे. तब्बल 200 एकर परिसरात मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरणार असल्याचं मनोज जरांगेंनी आपल्या भाषणात अनेकदा म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आजच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जरांगे काही मोठी घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
🟥बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण!एकाला पुण्यातून तर, दोघांना नागपुरातून उचललं!!
पुणे – प्रतिनिधी
शहरातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. घटनेच्या दिवसापासून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते. एवढेच नव्हे तर, आरोपींबाबत माहिती देणाऱ्यांना पोलिसांकडून 10 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता अखेर पोलिसांना या घटनेतील एका संशयित आरोपीला पुण्यातून तर, दोघांना नागपुरातून मुसक्या आवळ्यात यश आले आहे.
🔴पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका तरुणाला ताब्यात घेतले असून, येवलेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना 3 संशयित तरुण सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत. या सीसीटिव्हीद्वारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तर, दोघा संशयितांना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याचे सागितले जात आहे.
🅾️बोपदेव घाटात नेमकं काय घडलं होतं?
गेल्या आठवड्यात बोपदेव घाटामध्ये 21 वर्षे तरुणी मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून त्या तरुणीचे आणि मित्राचे फोटो काढले. त्यानंतर या तिघांनी तरुणीला कारमध्ये बसवत तिला येवलेवाडीजवळ घेऊन गेले. या ठिकाणी तिघांनी तरूणीवर अत्याचार केले आणि नंतर तिला खडी मशीन चौकात सोडून पसार झाले होते.
🅾️बोपदेव घाटात रात्रीच्यावेळी कोणीच नसते, यामुळे मदतीला कुणीच आले नाही. यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती. घडलेल्या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केचदेखील प्रसिध्द करण्यात आले आहे.
🟥ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सरकारी बांधकामे ठप्प.- ही आहेत कारणे!
मुंबई – प्रतिनिधी.
सध्या महाराष्ट्रात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुती सरकारने रोज लोकप्रिय घोषणांची मालिका सुरू केली आहे. विकासकामांच्या घोषणा केल्या जात आहेत. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. अशा परिस्थितीत सरकारकडे देणी चुकती करण्यासाठी निधी उपलब्ध नाही.
🔴राज्य शासनाकडे ४० हजार कोटींहून अधिकची देयके थकल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यभरातील सुमारे तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांनी घेतलेली शासनाची सर्व कामे थांबवली आहेत. यामुळे त्यांच्या बंद कामाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसण्याची शक्यता आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची फेब्रुवारीपासून सरासरी ४० हजार कोटींची देयके थकली आहेत. अनेकांनी कर्ज घेऊन कामे सुरू केल्याने त्यांच्यावर कर्ज परतफेडीचे संकट ओढवले आहे. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचे वेतनही थकले आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना आणि इतर संघटनांनी शासनाला निवेदन देऊन थकीत रक्कम चुकती करण्याची विनंती केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांनी शासनाची कामे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवार ११ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता राज्यातील ३५ जिल्ह्यांतील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. त्यात राज्यातील ३ लाख कंत्राटदार त्यांच्या मागण्यांचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कंत्राटदारांवर अवलंबून असलेल्या घटकांना दररोज तीन वेळा मेल करणार आहे, असे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, सरचिटणीस सुनील नागराळे यांनी कळवले आहे.
🟥किती देयके थकित
संपूर्ण राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाची विविध कामे सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रात १९ हजार कोटींची कामे मंजूर आहे, यापैकी कंत्राटदारांनी चार हजार कोटींची कामे केली असून त्याची देयके थकीत आहे. त्याचप्रमाणे, मराठवाड्यात १४ हजार कामे मंजूर असून त्यापैकी ४२०० कोटींची, पश्चिम महाराष्ट्रात १२ हजार कोटींची कामे मंजूर असून त्यापैकी २५०० कोटींची देयके थकीत आहेत. विदर्भात १६ हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी कंत्राटदारांनी केलेल्या ६५०० कोटींच्या कामाची देयके त्यांना मिळाली नाही. कोकण व मुंबई विभागातही स्थिती अशीच आहे.
🟣काय आहे मागण्या?
शासनाने १०० टक्के आर्थिक तरतूद असेल तरच कामांना मंजुरी द्यावी, कामाची विभागणी सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मंजूर संस्था आणि कंत्राटदार यांच्यात ३३:३३:३४ या प्रमाणात करावी, अशी मागणी कंत्राटदारांच्या संघटनांनी केली आहे.
🟥या घटकांवर होतो परिणाम
सरकारच्या रस्ते, पूल, इमारती बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग असतो. कंत्राटदाराच्या माध्यमातून ही कामे केली जातात. एका कंत्राटदाराकडे मजुरांपासून तर अभियंत्यांपर्यंत कर्मचारी काम करतात. कंत्राटदारांची देयक थकल्यावर कामगारांची देणीही थकते व त्याचा परिणाम त्यांच्या उदरनिर्वाहावर होते याचा विचार सरकारने करावा, अशी मागणी केली जात आहे.
🟥तामिळनाडूत रेल्वेचा भीषण अपघात.- म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेसची मालगाडीला धडक.- डब्यांना लागली आग; काही प्रवासी जखमी
चेन्नई :- वृत्तसंस्था

तामिळनाडूत शुक्रवारी रात्री भीषण रेल्वे अपघात झाला असून, यात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बागमती एक्सप्रेस ही मालगाडीला धडकली व त्यानंतर बोगींना आग लागली. तसंच काही बोगी रुळावरुन घसरल्या आहेत. म्हैसूरहून दरभांगाकडे जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसला तामिळनाडूतील कावरपेट्टाई रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला.
🔴तामिळनाडूत शुक्रवारी रात्री भीषण रेल्वे अपघात झाला. बिहारला जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसचे सहा डबे मालगाडीला धडकल्याने रुळावरून घसरले. हा अपघात ऐवढा भीषण होता की, रेल्वेच्या काही डब्यांना आग लागली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही रेल्वे म्हैसूरहून पेरंबूरमार्गे बिहारमधील दरभंगाकडे जात होती. दरम्यान, तिरुवल्लूरजवळील कवरप्पट्टाई रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला ही रेल्वेगाडी जाऊन धडकली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. कर्मचाऱ्यांनी बचवकार्यास सुरुवात केली आहे. रुग्णवाहिका आणि एनडीआरएफची पथकेही घटनास्थळी दाखल झाली आहेत.
🟥या दुर्घटनेबाबत अधिक माहिती देताना दक्षिण रेल्वेने सांगितले की, म्हैसूरहून दरभंगाकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५७८ (एमवायएस-डीबीजी) चे सहा डबे रात्री १०.३० च्या सुमारास मालगाडीला धडकून रुळावरून घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर काही जण जखमी झाले आहेत. चेन्नई सेंट्रलयेथून मेडिकल रिलीफ व्हॅन आणि बचाव पथके रवाना झाली आहेत. मालगाडी ही रेल्वे स्थानकावर थांबली होती. त्याचवेळी म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेस जोरात आली आणि थांबलेल्या मालगाडीला थडकली. ही धडक इतकी जोरात होती की लगेच काही बोगींना आग लागली व काही बोगी या रुळावरुन घसरल्या. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.