🟥मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस.- मुंबईकरांची तारांबळ
मुंबई :- प्रतिनिधी.
मुंबईसह परिसरात गेल्या दि.१० रोजी तासाभरापासून तुफान पाऊस झाला. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, पश्चिम उपनगर, कुर्ला या भागात विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच या पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
🔴महाराष्ट्रात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली शहरांतही आज प्रचंड वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह प्रचंड पाऊस पडला. तसेच मुंबईत आताही मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे ऑफिसचे कामकाज पूर्ण करुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं.
🔴कल्याणमध्ये सकाळी ढगाळ वातावरण होते. तर दुपारी कडक ऊन होतं. रात्री आठ वाजता अचानक ढगांच्या आणि विजेच्या कडकडाटासह कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सध्या पावसाचा जोर कल्याणसह मुंबईमध्ये कमी झाला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट कल्याण डोंबिवलीत होत असून रात्री पावसाचा जोर वाढला तर कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🟥अहिल्यानगर शहर आणि परिसरात सायंकाळी सात वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दीड ते दोन तास सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. हवामान विभागाकडून 14 तारखेपर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. अहिल्यानगरमध्ये आज दिवसभर वातावरणामध्ये प्रचंड उकाडा आणि ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी आलेल्या पावसाने गारवा निर्माण झाला. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रब्बी पिकांसाठी हा पाऊस लाभदायक असून या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.