बारामतीचा सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीजन ५ चा विजेता..
मुंबई :- प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बिग बॉसच्या पाचव्या सीजनचा निकाल लागला असून बारामतीचा सूरज चव्हाण विजेता ठरला आहे. सुरवातीपासून अनेकांची नाराजी ओढावून घेणारा, ज्याला बिग बॉसचा गेम समजत नाही अशी टीका होत असलेला सूरज चव्हाणने अखेर बाजी मारली आहे. सूरज चव्हाणवर आता बक्षीसांचा वर्षाव झाला असून एका क्षणात तो लखपती झाला. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली.
🟥मूळचा बारामतीचा असलेला सूरज चव्हाण हा टीकटॉकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. रिल स्टार असलेला सूरज चव्हाण हा यापूर्वीच गावा गावात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचला होता. सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलं आहे. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.
🔴बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रील्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला. त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. पण शेवटी बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं. त्यानंतर आता सूरजने थेट बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
🟥निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सूरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं. अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता केलं. बिग बॉसचा अंतिम विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.
🟥भारतापुढे बांगलादेशचे लोटांगण.- यंग ब्रिगेडने साकारला दणदणीत विजय
ग्वाल्हेर :- वृत्तसंस्था
भारताच्या यंग ब्रिगेडने धडाकेबाज कामगिरीचा नमुना पहिल्याच टि-20 सामन्यात पेश केला आणि त्यांच्यापुढे बांगलादेशला लोटांगण घालावे लागले. भारतीय संघाने अचूक आणि भेदक मारा करत बांगलादेशच्या संघाला १२७ धावांवर ऑल आऊट केले. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करत संघाला सहजपणे विजय मिळवून दिला. भारतीय संघाने यावेळी ७ विकेट्स राखत पहिला सामना जिंकला. या विजयासह भारताने या टी २० मालिकेत आता १-० अशी आघाडी घेतली आहे. हार्दिकने अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फटकेबाजी करत नाबाद ३९ धावांची खेळी साकारली.
🟥भारताच्या गोलंदाजांनी फलंदाजांचे काम हलके केले. कारण भारताला विजयासाठी १२८ धावांचे माफक आव्हान होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताला दुसऱ्याच सामन्यात पहिला धक्का बसला तो अभिषेक शर्माच्या रुपात. अभिषेक शर्माने यावेळी फक्त सात चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १६ धावा फटकावल्या होत्या. अभिषेक बाद झाल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आणि भारताच्या धावगतीला चांगलाच वेग मिळाला. सूर्याने यावेळी बांगलादेशच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. सूर्याला यावेळी मोठी खेळी साकारता आली नसली तरी तो आपले काम चोख बजावून गेला. सूर्याने यावेळी १४ चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर २९ धावांची खेळी साकारली. सूर्या बाद झाल्यावर संजू सॅमसनने काही आक्रमक फटके खेळले, पण त्याला संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करता आले नाही. संजूने यावेळी १९ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर २९ धावांची खेळी साकारली. संजू बाद झाला आणि त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने नितीश कुमार रेड्डीच्या साथीने दमदार फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
🔴 केंद्रात अन् राज्यात तुमचं सरकार, मग छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक का झालं नाही- संभाजीराजे छत्रपतींचा राज्य सरकारला सवाल
मुंबई :- प्रतिनिधी.
अरबी समुद्रामध्ये २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पार पडले होते. मात्र, त्यानंतर अद्यापही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम झाले नसल्यामुळे आता स्वराज्य पक्षाचे नेते, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. आज ते स्मारकाची पाहणी करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी काही सवाल करत सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रात तुमचं सरकार, राज्यात देखील तुमचं सरकार, स्मारकाचं जलपूजनही तुम्हीच केलं. मग स्मारक का झालं नाही? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे.
🟥आम्ही कोणतेही आंदोलन करण्यासाठी मुंबईत आलेलो नाहीत. खऱ्या अर्थाने आपल्याला अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा विषय हा राज्यातील १३ कोटी जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे. कोणत्याही प्रकारे आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही. कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतीही गोष्ट आपल्याला करायची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते आपले गडकोट किल्ले व्यवस्थित राहिले पाहिजे. त्यामुळे माझा १५ ते २० वर्षांपासून प्रयत्न सुरु आहे. रायगड किल्ल्यावर रायगड प्राधिकरण स्थापन झालं. त्यासाठी मी सरकारला भाग पाडलं. ७५ वर्षांत पहिल्यांदा रायगड किल्ल्याचं सवर्धन सुरु झालं, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
🔴मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक व्हावं ही त्यावेळी सर्व नेत्यांची इच्छा होती. २०१० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला हवं. त्यानंतर २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने घोषणा केली की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात करणार आहोत. पुढे २०१६ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या अगदी आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आलं. पंतप्रधान मोदी ज्यावेळी जलपूजन करण्यासाठी येतात, याचा अर्थ तुमच्याकडे सर्व परवानगी आहे. त्याशिवाय देशाचे पंतप्रधान जलपूजनासाठी येणार नाहीत. तेव्हा मी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो. मलाही कौतुक वाटलं. मग ज्या प्रकारे सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभा राहिलं. मला तुलना करायची नाही. मात्र, २०१६ मध्ये स्मारकासाठी जलपूजन झालं आणि त्यासाठी एक समितीही स्थापन झाली. मात्र, त्यानंतर पुढे काय झालं? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.
🟥छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशीही माझी चर्चा झाली. त्यानंतर आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझी चर्चा झाली. सर्वांना विचारलं की हे स्मारक का उभा राहीलं नाही? तर सर्वांचं उत्तर एकच आलं की पर्यावरणाच्या अडचणी निर्माण झाल्या आणि पुढे हा विषय न्यायालयात गेला. त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही, असं सांगण्यात आलं. मग आता माझा या सरकारला प्रश्न आहे की, तुमचं केंद्रात सरकार, तुमचं राज्यात सरकार, तुम्हीच घोषणा केली, तुम्हीच स्मारकाचं जलपूजन केलं. मग स्मारक का झालं नाही? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.
🟥संतापजनक.
🛑निर्दयी बापाने पोटच्या चिमुकल्या मुलींना फेकले नदीत.- दोघींचा मृत्यू; निर्दयी बापाला अटक
अकोला :- प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील बाळापुर येथे एका निर्दयी पित्याने आपल्या पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकून त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नदी शेजारी गर्दी केली होती. ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून रात्री शोध कार्य घेतल्यावर दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.
🟥आलिया परवीन आणि सदफ परवीन असे, या दोघी मृत बहिणींचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात ७ आणि ५ वर्षीय बहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलिस तपास घेत होते. यावेळी अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे एकाने पूलावरून नदीत दोन महिलांना फेकून दिले. त्यानंतर भीमकुंड नदीत शनिवारी पोलिसांनी मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान रात्री उशिरा दोघींचे मृतदेह पोलिसांना सापडले. दरम्यान, दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून निर्दयी बापाला अटक करण्यात आली आहे.
🔴शेख हरून याला चार मुली आहेत. कोणता विचार किंवा कुठला वाद उफाळून आला याचं नेमकं कारण सांगता येणार नाही. सध्या पोलीस कारणाचा तपास करत आहेत. चार मुलींपैकी त्याने आलिया परवीन व सदफ परवीन या दोघींना बाळापूर जवळ असलेल्या भीमकुंड नदीपात्रात फेकून दिले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर संशय येऊ नये म्हणून त्याने मुली हरवल्याची तक्रार हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली. मात्र पोलिसांना संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी निर्दयी बापाला ताब्यात घेतले, पोलीसी खाक्या दाखवताच निर्दयी बापाने मुलींना नदीत फेकल्याची कबुली दिली.