Homeकोंकण - ठाणेपोलीस ठाण्यात पोलिसांना मारहाण! वादग्रस्त भाजप नेत्यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल!! /...

पोलीस ठाण्यात पोलिसांना मारहाण! वादग्रस्त भाजप नेत्यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल!! / शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांचा शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश/ आजरा तालुकास्तरीय शासकीय शालेय १४ वयोगटातील खो- खो, क्रीडा स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूलचे घवघवीत यश.

🟥पोलीस ठाण्यात पोलिसांना मारहाण!वादग्रस्त भाजप नेते मुन्ना यादव व त्यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल!!

नागपूर – प्रतिनिधी.

भारतीय जनता पक्षाचे वादग्रस्त नेते मुन्ना यादव याने धंतोली पोलीस ठाण्यात एका पोलीस हवालदाराला अश्लिल शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिसांच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. या प्रकरणात मुन्ना यादव याला शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, राजकीय दबाव आल्यामुळे त्याला मुक्त करण्यात आले होते. या प्रकारामुळे पोलीस दलात मोठी नाराजी होती. रविवारी अखेर पोलिसांनी मुन्ना यादव व त्यांचे दोन मुले करण व अर्जुन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
राज्य बांधकाम कामगार मंडळाचा माजी अध्यक्ष व भाजपचा नेता मुन्ना यादव आणि त्याचा भाऊ बाला यादव यांच्यात शनिवारी वाद झाला होता. मुन्ना यादवला राजकीय पाठबळ असल्यामुळे त्याचे दोन्ही मुले करण आणि अर्जून हे दोघेही वस्तीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
🟪शनिवारी रात्री दहा वाजता करण आणि अर्जून हे दोघेही गरबा खेळायला बाहेर पडले होते. त्यावेळी बाला यादवची दोन्ही मुले देवी दर्शनासाठी आली. त्यावेळी करण आणि अर्जून या दोघांनी काही मित्रांसोबत मिळून बाला यादवच्या मुलांवर शेरेबाजी केली. त्यामुळे चिडलेल्या त्या दोघांनी शिवीगाळ केली. त्यामुळे करण-अर्जून आणि चुलत भावंडांमध्ये वाद झाला. करणने आपल्या काही मित्रांना लगेच गोळा केले. त्यामुळे बाला यादवच्या मुलांनीही आपल्या काही साथिदारांंना घटनास्थळावर बोलावले. दोन्ही गटात हाणामारी झाली. त्यामुळे दोन्ही गटातील समर्थक आमने-सामने आले होते. दोन्ही गटातील तरुणांनी तलवारी काढल्या. एकमेकांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही कुटुंबीयांतील करणसह चौघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर न्यूरॉन रुग्णालयात उपचार सुरु आहे तर अन्य तीन जखमींवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
🔴यादव कुटुंबीय समोरासमोर आल्यानंतर दोन्ही गटातील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. काही वाहनांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जवळपास आठ ते दहा वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांना माहिती मिळताच काही युवकांना ताब्यात घेऊन धंतोली पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यापाठोपाठ दोन्ही गटातील नातेवाईकही पोहचले. मुन्ना यादवही पोलीस ठाण्यात पोहचला. त्याने पोलिसांना शिवीगाळ करीत गोंधळ घातला. पोलिसांना शिवीगाळ होत असल्यामुळे ठाणेदार अनामिका मिर्झापूरे यांनी लगेच अतिरिक्त कर्मचारी बोलावून घेतले. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

🟥हवालदाराला केली मारहाण

मुन्ना यादव हा रागातच पोलीस ठाण्यात शिरला. त्याने पोलीस हवालदार सुभाष वासाडे यांची कॉलर पकडली. त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर मारहाणही केली. त्यामुळे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता मुन्ना यादव हा उपायुक्तांवरही धावून गेला. त्यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण तापले होते.

🔴अखेर या प्रकरणात रविवारी गुन्हा दाखल

मुन्ना यादव आणि त्याचे मुले करण आणि अर्जून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र पोलिसांनी वरील तिघांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. पण याची चाहूल लागताच एक आमदार धंतोली पोलीस ठाण्यात पोहचला. आमदाराने पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन गुन्हा दाखल न करण्याची विनंती केली. मात्र, आमदाराला पोलिसांनी परत पाठवले. त्यानंतर अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी मुन्ना यादव याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, धंतोली पोलिसांनी अखेर रविवारी मुन्ना यादव आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल केला. ठाणेदार अनामिका मिर्झापुरे यांनी याला दुजोरा दिला.

🟥शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांचा शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश. 🟣डोंबिवलीत शिंदे गटाला मोठा धक्का

🛑सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि दिपेश म्हात्रे यांच्यातील वाद काही दिवसांपुर्वी चव्हाट्यावर आला होता. यामुळे दिपेश म्हात्रे हे नाराज झाले होते. आता डोंबिवलीतील ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

मुंबई :- प्रतिनिधी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहेत. त्यातच आता कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला मोठे खिंडार पडले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी सात नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

🟥गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि दिपेश म्हात्रे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. यामुळे दिपेश म्हात्रे हे नाराज झाले होते. आता डोंबिवलीतील ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाचे युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मशाल हाती घेतली. दिपेश म्हात्रेंसोबतच त्यांचे बंधू, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, रुपेश म्हात्रे, रत्नाताई म्हात्रे, सुलोचना म्हात्रे, संगीता भोईर, वसंत भगत, संपत्तीताई शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

🔴दिपेश म्हात्रे यांनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी डोंबिवलीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. हाती घेऊन मशाल, घडवू महाराष्ट्र खुशाल अशा आशयाचे बॅनर संपूर्ण डोंबिवलीत झळकले होते. दिपेश म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे स्वागत केले. तुम्ही परत आला याचा आनंद आहे. थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, जुलूमशाही लोकसभेतच गाडून टाकली असती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथे भगव्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग धुवून टाका आणि मशालीच्या रुपाने भगव्याचे तेज प्रज्ज्वलित करा. कल्याण-डोंबिवली पुन्हा शिवसेनामय करून दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

🔴पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. (💥 पोलीस पाटीलांचे मानधन शासनाने १५ हजार रुपये केले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे पोलीस पाटील संघटनेने आभार मानले.)

छत्रपती संभाजीनगर, दि.६ प्रतिनिधी.

पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात दिले.
🟥महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभ समृद्धी लॉन्स, हर्सूल सावंगी रोड येथे आयोजित करण्यात आला होता. पोलीस पाटीलांचे मानधन शासनाने १५ हजार रुपये केले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे पोलीस पाटील संघटनेने आभार मानले.
🔴या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार,शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महादेव नागरगोजे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.दीपप्रज्वलनाने मेळाव्यास सुरुवात झाली. प्रास्ताविक महादेव नागरगोजे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा पोलीस पाटील यांनी सत्कार केला.
🟥सत्काराला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीस पाटील हे प्रशासनाचे नाक कान आणि डोळे आहेत. आपल्याला २४ बाय ७ काम करावे लागते. सरकारही असेच २४ बाय ७ काम करणारे आहे.आपले हे प्रामाणिक काम असल्यानेच शासनाने आपले मानधन साडेसहा हजार रुपयांवरुन १५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. सढळ हस्ते न्याय दिला आहे.
🟪मराठवाड्याच्या विकासासाठी तसेच समाजातील विविध घटकांसाठी शासनाने राबविलेल्या योजनांचा उल्लेख करुन मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कुटुंबातील प्रत्येक घटकाला शासन लाभ देत आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिक सबलीकरण, शेतकरी अशा सर्व घटकांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.पोलीस पाटील यांनी आपल्या गावात या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या,असे आवाहन त्यांनी केले.प्रास्ताविक अध्यक्ष महादेव नागरगोजे यांनी केले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कारभारी पाटील यांनी आभार मानले.

🛑आजरा तालुकास्तरीय शासकीय शालेय १४ वयोगटातील खो- खो, क्रीडा स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूलचे घवघवीत यश.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या यामध्ये व्यंकटराव हायस्कूलच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने व मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून उज्वल सुयश संपादन केले. यामधील सहभागी खेळाडूंची नावे (मुले) आर्यन संदीप केसरकर कप्तान , वेदांत जितेंद्र नांदवडे , पार्थ महेंद्र देसाई, सार्थ संदीप वेंगुळकर , साद शफीउल्ला मुल्ला , मोहम्मद रहीम मुल्ला , नौमान इकबाल मुल्ला , सक्षम वसंत पाटील उमेर इसाक शेख , निरंजन सर्जेराव कांबळे , अब्बास शेख कबीर जुबेर मुल्ला , साकीब समीर पठाण , उमेर जावेद काकतीकर , उजेर फारूख पाथरवट. व ( मुलींचा संघ ) प्रणाली दयानंद परीट कप्तान , साक्षी बीर बहादूर ठकुल्ला , तृप्ती पांडूरंग नवार , स्मीता उदयासिंह देसाई , आर्या अंकुश पाटील , इकरा फारूख पाथरवट , आर्चना सागर इलगे, सानवी लक्ष्मण सोले , प्रतीक्षा नागेश पाटील , गौरी विजय देसाई , अंकिता संदीप देसाई , सृष्टी भिकाजी हसबे , माऊली चंद्रकांत पाटील. या सर्व जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ, प्राचार्य आर.जी.कुंभार, पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार यांचे प्रोत्साहन लाभले. व क्रीडा शिक्षक सुनील पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.