शेतक-यांना देशोधडीला लावणा-यांनी मला शिकवू नये
( अथर्व – दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे.- मजरे कारवे येथील तोडणी, वाहतुकदार मेळाव्यातून – आम. राजेश पाटलांच्या वक्तव्याचे उत्तर. )
चंदगड (प्रतिनिधी)
अपघाताने आमदार झालेल्या आणि संघात बसून राजकारण करणा-यांनी दौलतचा राजकीय अड्डा बनवण्याची भाषा करू नये. आजपर्यंत दौलतचा राजकीय अड्डा कोणी बनवला हे सगळ्यांना माहित आहे. आज मी माझ्या पैशावर राजकारण करतोय, सभासदांच्या पैशावर डल्ला मारून नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरकडून टक्केवारी घेणा-यांनी मला राजकारण शिकवू नये असा हल्लाबोल अथर्व – दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केला. मजरे कारवे येथे आयोजित तोडणी, वाहतुकदार यांच्या मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ■ श्री. खोराटे पुढे म्हणाले की,

दौलतमध्ये राजकारण कधीही घुसू देणार नाही. आजही कारखान्यात नवीन मशीनरी बसवली जात आहे. त्यामुळे दौलत हा सुरळीतच सुरू राहणार, तरी राजकारणाबद्दल या अपघाती आमदारांनी मला सांगायचा अजिबात अधिकार नाही. आज मी राजकारणात सामान्य माणसाचं भल व्हावं म्हणून आलो आहे. मला काही आमदारकी मिरवायची नाही. आज माझ्याकडे जे पैसे आहेत ते कष्टाचे आहेत, कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरकडून टक्केवारी घेतलेली नाही. त्यामुळे दौलत अडचणीत आणून शेतक-यांना देशोधडीला लावणा-यांनी मला शिकवू नये.
यावेळी जगन्नाथ हुलजी म्हणाले, स्वाभिमानीचं काम करणारे आम्ही लोक असून शेतक-यांसाठी काम करणा-या माणसाच्या पाठीशी असतो. खोराटे यांनी सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी राहावं. शेतक-याच्या मुलांनी शेतक-यांसाठी चालवलेला हा लढा आहे, त्यामुळे आता रात्रीचा दिवस करून खोराटे यांना आमदार करूयात असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी ह. भ. प. संजय पाटील म्हणाले, केवळ स्वार्थापोटी, स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी एक भाकरी अपेक्षा करणाऱ्या कामगार, शेतकऱ्यांचा उपयोग करून घेतला.चंदगड दौलत-अथर्व साखर कारखाना तोडणी, वाहतुकदार मेळाव्यात चेअरमन मानसिंग खोराटे यांनी मार्गदर्शन केले. बी. एम. पाटील म्हणाले, आपण संकल्प करूया आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व विधानसभेत पाठवूया. आज मी खोराटे यांच्यासाठी राजकीय भूमिका अर्पण करतोय, तुम्हीही त्यांच्या साठी रात्रीचा दिवस करून त्यांच्यासाठी काम करूया. मुळात दौलत कर्मचारी, अधिकारी, तोडणी वाहतूकदार यांच्यावर टीका करणाऱ्यांना अधिकारच नाही, कारण जेव्हा कारखाना बंद होता, तो सुरू करण्याची तुमच्या धामकच नव्हती, त्यामुळे यावर तुम्ही बोलू नका असा इशारा अनिल होडगे यांनी प्रास्ताविकातून दिला.
यावेळी संजय सुरुतकर, कृष्णा नाईक, सुधाकर पाटील, नारायण तेजम, विश्वनाथ ओऊळकर यांनी मनोगतातून खोराटे यांच्या विजयाचा संकल्प मांडला. यावेळी बळाराम फडके, राजवर्धन शिंदे, बाळासाहेब हळदनकर, सुरेश कुद्रे, बाळु पेडणेकर, अन्सार शेख, प्रभाकर कोरवी, सुनील नाडगौडा, विश्वनाथ ओऊळकर, बापू शिरगावकर यांच्यासह तोडणी, वाहतुकदार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट.
तुम्ही फक्त तालुक्याचं शोषण केलं- अॅड. मळवीकर
चेह-यावर आहे त्यातून कळतय की, ही एका क्रांतीची सुरुवात आहे. दौलत सुरू करण्यासाठी कामगार, शेतकरी मिळून प्रयत्न केले आणि आज ही दौलत सुरळीत सुरू झाली. आजपर्यंत के.डी.सी.सी बँकेत एकच घराण्याची सत्ता आहे, पण, त्यांना शेतक-यांची कधी काळजी केली का? किमान दौलतवरील व्यज कमी करण्यासाठी तरी प्रयत्न केले का? तुम्ही फक्त तालुक्याचं शोषण केलं. आज खोराटे एक सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून पुढे आलेलं आहे, आज शेतकरी, कामगार, सर्वसामान्य लोक खोराटे यांच्या पाठीशी आहेत. ते उच्चशिक्षित असून शेतकरी, सामन्यांची काळजी घेणारे आहेत. त्यामुळे त्यांना आपण विधानसभेत पाठवूयात असे आवाहन अॅड. संतोष मळवीकर यांनी केले.