🛑खाजगी बसेसचे मालक त्यांच्या दरांमध्ये मनमानी पद्धतीने वाढ.- बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने होणार आजऱ्यात आंदोलन.
🛑टोल बाबत आंदोलनाची पुढील दिशा लवकरच ठरणार.- टोल विरोधी संघर्ष समितीची बैठक संपन्न.
आजरा – प्रतिनिधी.

आजरा एमआयडीसी येथे झालेला अन्याय कारक टोल नाका याबाबत पुढच्या शुक्रवारी २७ सप्टेंबरला आजरा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन चळवळीची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय आज आजरा येथे झालेल्या टोल मुक्ती संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सुरवातीला कॉ संपत देसाई यांनी आतापर्यंतच्या आंदोलनाचा आढावा घेतला. ते म्हणाले की आपले दोन मोर्चे आणि धरणे आंदोलनानंतर प्रशासनाने उच्चपदस्थ अधिकर्यांनासोबत बैठक घेण्याचे लेखी पत्र दिले होते. त्यांच्यशी संपर्क झाला असून पुढील आठवड्यात आपल्याला बैठकीची तारीख आणि वेळ समजेल. बैठकीत काय निर्णय होतोय, याबरोबर केंद्र शासनाने अलीकडे टोल संदर्भात घेतलेला निर्णयाचा जी आर काय निघतो ते बघून पुढील दिशा ठरवूया.
यावेळी परशुराम बामणे म्हणाले की तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची व्यापक बैठक शुक्रवारी २७ तारखेला बोलावून या आंदोलनाबाबत त्यांची भूमिका समजावून घेऊया.
तानाजी देसाई म्हणाले की हे आंदोलन केंद्र आणि राज्याच्या धोरणाविरोधात असल्याने कुणी सहज घेऊ नये. त्यासाठी खूप ताकद लावावी लागणार आहे.
यावेळी प्रकाश मोरुस्कर, रवींद्र भाटले, काशिनाथ मोरे, डॉ धनाजी राणे, यशवंत चव्हाण, पांडुरंग सावर्तकर, संजय घाटगे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
🛑खाजगी बसेसचे मालक त्यांच्या दरांमध्ये मनमानी पद्धतीने वाढ.- बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने होणार आजऱ्यात आंदोलन.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील खाजगी ट्रॅव्हल्स मालकांचा दराबाबत मनमानी कारभार याबाबत बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील अनेक नागरिक नोकरी निमित्त अथवा विद्यार्थी शिक्षणानिमित्त मुंबई पुण्यामध्ये वास्तव्यास राहण्यास गेलेले आहेत. तसे असले तरीही त्यांचे आई वडील व इतर कुटुंबीय अजूनही आजऱ्यातील खेडेगावांमध्ये राहायला आहेत. शेतीची कामे व अन्य कामांसाठी ही त्यांना निरंतर गावी यावे लागते. यात्रेच्या वेळी सणासुदींच्या वेळी तर आजऱ्याला येणाऱ्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात असते.
आपल्या भागामध्ये मुंबई साठी खाजगी ट्रॅव्हल्स सुरू झालेल्या असल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे खाजगी बसेसचे मालक त्यांच्या दरांमध्ये मनमानी पद्धतीने वाढ करत असतात. कधी कधी तर यात्रांच्या वेळी, गणपतीच्या वेळी व इतर सणांच्या वेळी एका एका तिकिटाची किंमत २०००/- ते ३०००/- रु च्या घरात जाऊन पोहोचते. यामुळे नागरिकांची खूपच आर्थिक लूट होत आहे. प्रत्येक क्षेत्रात किती दर आकारला पाहिजे यावर काही निकष, काही मर्यादा असणे आवश्यक आहे. सदर खाजगी बसेसनाही पूर्ण वर्षभर एकच दर असावा जेणेकरून नागरिकांची आर्थिक लूट होणार नाही. आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने परिवहन महामंडळ तसेच आपल्या शासन, प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणू इच्छितो. आपल्या पूर्ण वर्षभर एकच दर निश्चित केल्याने लोकांनाही प्रवासास अडचण होणार नाही व प्रवाशांची फसवणूक सुद्धा होणार नाही. याशिवाय खाजगी बस वाहतूक करणारे कर्मचारी प्रवाशांच्या किरकोळ सामानासाठी सुद्धा अवाजवी दर आकारात असतात.
तरी आपण या खाजगी ट्रॅव्हल्स मालकांच्या कारभाराला आळा घालावा व नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी यासंबंधी आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आपणास निवेदन सादर करत आहोत. याविषयी आपण सर्व बस मालकांना बोलावून “एकच दर, पूर्ण वर्षभर” लावण्यासाठी काही प्रक्रिया करावी जेणेकरून नागरिकांना योग्य दराची व प्रवासाची हमी देता येईल..
निश्चितच आपण आमच्या या निवेदनाची दखल घेऊन यावर कारवाई कराल ही आशा आहे. सदर निवेदनानंतर आपल्याकडून यावर कोणतीही कारवाई न झाल्यास आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी शुक्रवारी एक दिवसीय धरणे आंदोलन आपल्या कार्यालयासमोर करणार आहोत. त्यानंतर होणाऱ्या सर्व परिस्थितीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल याची दखल घ्यावी.. या आशयाचे स्मरणपत्र तहसीलदारांना देण्यात आले. यावर नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी येत्या तीन-चार दिवसात सर्व ट्रॅव्हल्स मालकांसोबत बहुजन मुक्ती पार्टीची मीटिंग लावतो असे आश्वासन दिले.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष किरण के के, राहुल मोरे, रवी देसाई, काशीनाथ मोरे शरद कुंभार, अमित सुळेकर, प्रसाद पिळणकर, अरविंद लोखंडे, संजय घाटगे, द्वारका कांबळे, सुमन कांबळे, डॉ. धनाजी राणे, तुकाराम कांबळे इत्यादी वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते..