🟥राजकोट पुतळा प्रकरणी जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी…
तर संशयित आरोपी डॉ.चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी…
🟥उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता.
🛑सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी.- कर्जतमधील नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा.- भावाला पोलीसांनी केली अटक?
🟥पोलीस चालक भरतीतील बनावट कागदपत्र प्रकरणी कसबा तारळ्यातील दोघांवर गुन्हा दाखल.
मालवण :- प्रतिनिधी.
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यात जयदीप आपटे याला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर डॉ.चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात येणार आहे.
🟥राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने या दोघांनाही कडेकोट पोलीस बंदोबस्तात येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची अजून चौकशी करायची असल्याने ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी त्याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
🟥सरकारी अभियोक्ता ॲड. तुषार भणगे म्हणाले, राजकोट किल्ला येथील पुतळा कोसळल्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची पूर्ण चौकशी झालेली नाही. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा पोलिसांकडून तपास व्हायचा आहे. तसेच लॅपटॉप अन्य साहित्य जप्त करायचे आहे. यांसह अन्य बाबींवर युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने जयदीप आपटे याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी पोलीस या प्रकरणाच्या तपासासाठी त्याला पुन्हा ताब्यात घेऊ शकतात असेही ॲड. भणगे यांनी स्पष्ट केले.
🟥उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता.
पुणे :- प्रतिनिधी.
हवामान विभागाने आज उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, सिंधुदु्र्ग, जळगाव, गडचिरोलीसह अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर येथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
🟥दरम्यान, महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतल्याने अनेक भागांत उन्ह उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मंगळवारी नागपूर आणि जेऊर येथे ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, बहुंताश ठिकाणी तापमानाचा पारा ३० ते ४० अंशाच्या दरम्यान आहे. मंगळवारी राजधानीच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने दिवसभर शहरातील रस्त्यांवरील वाहतूक मंदावली आणि शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले. भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी शहरात आणखी पाऊस आणि ताशी ३० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली असून शुक्रवारपर्यंत यलो अलर्ट जारी केला.
🛑सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी.- कर्जतमधील नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा.- भावाला पोलीसांनी केली अटक?
कर्जत :- प्रतिनिधी.
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाची उकल करण्यात रायगड पोलीसांना यश आले आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावानेच ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ३६ तासांच्या चौकशीनंतर या प्रकरणातील आरोपी हनुमंत जैतु पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी चिकनपाडा येथे राहणाऱ्या मदन जैतु पाटील (वय ३५), अनिशा मदन पाटील (वय ३०) आणि विनायक मदन पाटील (वय १०) अशा तिघांचे मृतदेह घराच्या मागील भागात असलेल्या ओढ्यात आढळून आले होते. तिघांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खूणा होत्या. त्यामुळे तिघांची हत्या करून त्यांचे मृतदेह नदीपात्रात टाकण्यात आल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🔴तिहेरी हत्याकांडाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांना या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे निर्देश दिले होते. नेरळसह, कर्जत आणि खोपोली येथील पोलीस पथकांना या गुन्ह्याच्या तपासासाठी बोलविण्यात आले होते. तपासा दरम्यान मयत मदन जैतु आणि भाऊ हनुमंत यांच्यात राहते घराची जागा आणि रेशन कार्ड वरील नावे कमी करण्यावरून वाद सुरू असल्याचे समोर आहे.
यातून हनुमंत याने मदन आणि त्याची पत्नी यांस मारहाणही केली होती अशी बाब समोर आली. तिहेरी हत्याकांड घडले त्या दिवशी हनुमंत आणि त्याची पत्नी घरी नसल्याची बाब समोर आली त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. त्यानी हनुमंत याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र तो पोलीसांना उडवा उडवीची उत्तरे देत होता. प्रत्येक वेळी पोलीसांना वेगवेगळी महिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. अखेर ३६ तासांच्या चौकशी नंतर त्याने आपल्या कृत्याची कबूली दिली. मालमत्तेच्या वादातून भाऊ, त्याची गर्भवती पत्नी, आणि दहा वर्षाच्या मुलाची डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. नंतर तिघांचे मृतदेह घरामागील ओढ्यात नेऊन टाकले.
🟥आरोपी हनुमंत याने सख्खा भाऊ आणि त्याच्या कुटूंबाचा नियोजनबध्द पध्दतीने काटा काढण्याचे ठरवले होते. त्यासाठी पूर्व तयारी केली होती. स्वतःवर संशय येऊ नये यासाठी खबरदारी घेतली होती. हत्याकांड करण्यापूर्वी आरोपीने त्याच्या पत्नीला माहेरी पाठवून दिले होते. स्वता चूलत मामाच्या घरी जाऊन बसला होता. रात्री उशीरा सगळे झोपल्यावर तो मामाच्या घरून बाहेर पडला. भावाच्या कुटूंबाची हत्या करून पुन्हा घरी येऊन झोपला. पण त्याच्या रात्रीच्या हालचाली एका शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या, तर हनुमंतने रात्री घातलेला पांढरा शर्ट सकाळी बदललेला असल्याचे तपासात समोर आले. याबाबत विचारणा करताच त्याने आपल्या कृत्याची कबूली दिली. दरम्यान पोलीसांनी हनुमंत जैतु याला अटक केली असून, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
🟥पोलीस चालक भरतीतील बनावट कागदपत्र प्रकरणी कसबा तारळ्यातील दोघांवर गुन्हा दाखल
🔴कागदपत्रात फेरफार करणाऱ्या एकास अटक
कोल्हापूर – प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्हा पोलीस चालक भरतीमध्ये बनावट कागदपत्र दाखल केल्याप्रकरणी कसबा तारळे (ता.राधानगरी) च्या स्वरुप गुरव व विशाल कांबळे या दोघांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या कागदपत्रात फेरफार करणाऱ्या विशाल काबळे यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी फिर्याद पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी संतोष मारुती पानकर यानी शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
🟥कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात १९ ते २७ जून या कालावधीत १५४ पोलीस शिपाई तर ५९ पोलीस चालक या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.यात पोलीस शिपाई पदासाठी ६ हजार ७७७ तर चालक पदासाठी ४ हजार ६६८ इतके अर्ज आले होते.यात पोलीस चालक शिपाई पदासाठी २४ ते २६ जून तर महीला व माजी सैनिक याची २७ जून रोजी चाचणी झाली होती. या चालक भरती मध्ये कसबा तारळे राधानगरी येथील स्वरुप संतोष गुरव याने इतर मागास प्रवर्गातून अर्ज भरला होता.
भरती प्रक्रियेत मैदानी व लेखी चाचणीत पात्र झाल्यानंतर गुरव याने आपली मुळ शैक्षणिक, समांतर आरक्षणाची कागदपत्रे,जात प्रमाणपत्र, नाॅन क्रीमिलेयर प्रमाणपत्र घेऊन पोलीस दलाच्या वतीने त्याची पडताळणी करण्यात आली यात दाखल केलेली कागदपत्र ही खोटी असलेच व ती खरी म्हणून दाखल केल्याने स्वरुप संतोष गुरव.रा.कसबा तारळे.ता.राधानगरी व ही कागदपत्रे शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने दुसर्याचा आयडी वापरुन इतर व्यक्तीच्या मुळ दाखल्यामध्ये फेरफार करून त्यावर शासनाचे खोटे व बनावट शिक्के तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी विशाल विष्णु काबळे.व.व २८ रा.कसबा तारळे ता.राधानगरी यास शाहुपुरी पोलीसांनी अटक केली असून त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.या भरती प्रक्रियेसाठी प्रथमच अचूक वेळ मोजण्यासाठी व डमी उमेदवार होऊ नये म्हणून अधुनिक पद्धतीचे आयएफआयडी व फेस रिकग्नायझेशन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.
