🟥नेरूळ स्थानकात तांत्रिक बिघाड.-हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत.- प्रवाशांना मनस्ताप.
🟥बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी महिला पोलिसाची नदीत उडी.- महिला पोलीस ठरली देवदूत
नवी मुंबई:- प्रतिनिधी.
पहाटेच्या वेळी हार्बर लाईनवरील लोकलसेवा अचानक ठप्प झाल्याने प्रवाशांना कामाला जाण्याच्या वेळी मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. पहाटे ५ वाजल्यापासून पनवेल स्थानकातून एकही लोकल सुटलेली नव्हती, सगळ्या गाड्या प्लॅटफॉर्मवर उभ्या होत्या. नेरुळ स्थानकादरम्यान काही तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे हार्बर मार्गावरील स्थानकांमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर तब्बल दीड ते दोन तासांनंतर पनवेल येथून पहिली लोकल ट्रेन सुटली. सध्या हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे.
🟥पहाटे हार्बर मार्गावरील वाहतुकीला अचानक ब्रेक लागला. पनवेल स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी ५.१७ ची लोकल ६.३० झाले तरी स्थानकातच थांबलेली होती. यादरम्यान, स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी जमली. ट्रेन लेट असल्याने प्रवाशांना कामावर जाण्यास उशीर होत होता. परिस्थिती पाहून काही जण परत घरी परतली तर काही स्थानकातच लोकल सुरु होण्याची वाट बघत उभे होते. त्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. नेरूळ स्थानकादरम्यान अप डाऊन मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने हा खोळंबा झाल्याची माहिती आहे.
नेरूळ स्थानकादरम्यान विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर तांत्रिक बिघाड सोडविण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरू होते. पण, तब्बल दीड ते दोन तास गाड्या एकाच जागी उभ्या होत्या. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरू होते. अप डाउन दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. सीएसएमटी तसेच ठाण्याला जाणारी वाहतूकही ठप्प होती. त्यामुळे कामावर जायच्या वेळी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर लोकल वाहतूक अखेर सुरु करण्यात आली आणि पनवेल स्थानकातून पहिली गाडी सुटली. सध्या सीएसएमटी आणि गोरेगाव-अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुरु झाली आहे. पण, ठाण्याल जाणाऱ्या गाड्या अद्यापही रखडलेल्या आहेत. त्यामुळे आज अनेकांना कामावर लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.

🟥बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी महिला पोलिसाची नदीत उडी.-
महिला पोलीस ठरली देवदूत
जळगाव:- प्रतिनिधी.
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीदवाक्य, त्याच वाक्याला जागत पोलिस रात्रंदिवस जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. असाच काहीस प्रकार जळगावमध्येही दिसून आला. पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी एका महिला पोलिसाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करत नदीत उडी मारली आणि त्या मुलाचे प्राण वाचवले. अवघ्या ११ वर्षांचा मुलगा काठावरून पाय घसरून पाण्यात पडला होता. ते पाहून एकच कल्लोळ माजला, वाचवा, वाचवा च्या हाका सुरू झाल्या, मात्र बघ्यांपैकी कोणीच त्याच्या मदतीसाठी धाव घेतली नाही. मात्र तेथेच कर्तव्यावर असलेल्या महिला कॉन्स्टेबलने जीवाची जराही पर्वा न करता नदीच्या पाण्यात धाडकन उडी मारली आणि त्या मुलाचा जीव वाचवला. नदीत बुडणाऱ्या मुलासाठी देवदूत ठरलेल्या कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.
🔴मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील गिरणा नदीच्या तीरावर ही घटना घडली. ऋषिपंचमी निमित्त हजारोंच्या संख्येने महर्षी कण्वाश्रमात व नदीकाठावर महिलांची वर्दळ होती. महिला आश्रमाला लागून असलेल्या घाटावर आंघोळ करत असताना एक 11 वर्षीय मुलगा गिरणा नदीपात्रात पूजेचे पैसे उचलण्यासाठी गेला असताना. मात्र तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि तो काठावरून खाली पाण्यात पडला. ते पाहून एकच गोंधळ झाला. मात्र त्याला वाचवण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. तेथेच ड्युटीवर तैनात असलेल्या कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांनी ही घटना पाहिली. वर्दीवर असतानाही त्यांनी काहीही विचार न करता, जीवाची पर्वा न करता क्षणार्धात गिरणेत उडी घेऊन त्या मुलाला सुखरूप बाहेर काढले.
🟥अचानक हा मुलगा नदी काठावर गेला असताना पाय घसरून पडला व नदीमध्ये बुडू लागला. महिलांनी केलेला आरडाओरडा ऐकून बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी तेथे आल्या. मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अंगावरील वर्दीवरच स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली आणि त्या मुलाला सुखरूप बाहेर काढत त्याचे प्राण वाचविले. याप्रसंगी या महिला कर्मचाऱ्याने दाखवलेल्या धाडसाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी त्यांचा सत्कार करून गौरव केला. महिला व परिसरातील लोकांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.