🟥बदलापूर घटनेतील पीडितेच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल? – अफवा पसरवू नका.
(💥अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.- पोलीसांचे आवाहन.)/ देशात रोज बलात्काराच्या 90 घटना.- कठोर कायदा करा,*
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधानांना पत्र.
बदलापूर :- प्रतिनिधी.

बदलापूरात शाळेत साडेतीन वर्षांच्या चिमुकलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. तसेच या घटनेवरुन बदलापुरात मोठा राडा झालेला बघायला मिळाला. घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी थेट बदलापूर रेल्वे स्टेशनचं कामकाज ठप्प केलं होतं. आंदोलकांनी दिवसभर रेल्वे ठप्प करुन ठेवली होती. अखेर संध्याकाळी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला होता. या घटनेनंतर सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि अफवा पसरवल्या जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
🟥बदलापूर येथील अल्पवयीन पीडितेच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या प्रकृतीविषयी चुकीची आणि गैरसमज पसरवणारे मेसेजेस सोशल मीडियावरून पसरवले जात होते, असं पोलिसांच्या लक्षात आलं. या प्रकरणी चुकीची माहिती पसरवून समाजामध्ये असंतोष पसरवणाऱ्या व्यक्तीचा ठाणे आयुक्तालयातील सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने शोध घेतला आहे. या प्रकरणात एका २१ वर्षीय तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संबंधित तरुणी अंबरनाथ येथे वास्तव्यास आहे. या तरुणीवर अफवा पसरवून समाजात अशांतता पसरवण्याच्या संदर्भाचा गुन्हा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणीचे इन्स्टाग्रामवर साडेपाच लाख फॉलोअर्स असल्याने तिने शेयर केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी कोणीही कोणत्याही स्वरुपात अफवा पसरवू नयेत आणि कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.
🟥देशात रोज बलात्काराच्या 90 घटना.- कठोर कायदा करा,*
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधानांना पत्र.
नवी दिल्ली.- वृत्तसंस्था

देशात रोज बलात्काराच्या 90 घटना घडत आहेत. हे अत्यंत भयंकर असून बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा करायला हवा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. बलात्काराच्या घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालवून सुनावणी 15 दिवसांत पूर्ण व्हायला हवी,असेही ममता बॅनर्जी यांनी पत्रात नमूद केले आहे.
🔴कोलकात्यातील आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शने होत आहेत. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आता पंतप्रधानांना पत्र लिहून या विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले आहे.
🟥विशेष न्यायालये स्थापन करा!
महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी बलात्काराच्या, हत्येच्या घटना थांबवणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. अशा संवेदनशील मुद्दय़ांवर केंद्रीय कायद्याच्या माध्यमातून लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. अशी प्रकरणे फास्ट ट्रक न्यायालयात चालवण्यासाठी विशेष न्यायालयेदेखील स्थापन करण्याचा विचार व्हायला हवा, असे ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे.
