🛑राजकीय पक्षांना बंद करण्याचा अधिकार नाही.- महाराष्ट्र बंदला परवानगी नाही.- बंद पुकारला तर कायदेशीर कारवाई करणार. – मुंबई हायकोर्टाने दिले आदेश.
(🛑महाराष्ट्र बंद’ विकृती विरुद्ध संस्कृती.- “दुपारी दोनपर्यंत कडकडीत बंद पाळा” – उद्धव ठाकरे – महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस.)
मुंबई :- प्रतिनिधी.

बदलापूर शहरातील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने सदर बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसून जे लोक बंद पुकारतील त्यांच्याविरोधात कारवाई करा, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.
🔴महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या नेत्यांनी राज्यातील जनतेला उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र बंद’ विकृती विरुद्ध संस्कृती. “दुपारी दोनपर्यंत कडकडीत बंद पाळा”.- उद्धव ठाकरे
उद्याचा महाराष्ट्र बंदहा विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. कुठल्या राजकीय नेत्यांच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही.”हा बंद महाराष्ट्राच्या जनेतसाठी आहे. हा बंद महाविकास आघाडीचा बंद नाही तर सर्व जनतेचा बंद आहे. सर्वांनी या बंदात सहभागी व्हा..तसेच उद्याचा बंद कडकडीत असावा.तसंच या बंदवेळी अत्यावश्य सेवा कायम ठेवण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत. त्यामध्ये सर्व अत्यावश्यक सुरू राहतील. त्यामुळे कुणी या बंदला राजकीय समजू नये.काही पेपरमध्ये बातम्या आल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापिकेने प्रश्न केला की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील.कोर्टानेही काल बदलापूर प्रकरणावर ताशेरे ओढले आहेत. रोज घटना घडत आहे. १३ ऑगस्टला बदलापूर,. १५ पुणे, २० ऑगस्ट लातूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये या घटना घडल्या आहेत. सरकारला आरसा दाखवत आहे. एवढं सर्व चालू असताना एवढं निर्ढावलेपणे बहिणीची किंमत पैशात करत असाल तर बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका. बहिणीचं रक्षण करा. सुरक्षित बहीण फार महत्त्वाचं आहे. बातम्या वाचून संतापाचा कडेलोट होतोय” बदलापूर प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत. नाहीतर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही, पण सुरक्षित बहीण महत्त्वाची आहे. आता संतापचा कडेलोट होत आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.त्याचप्रमाणे उद्या 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे.दुकानदारांनाही उद्या बंद पाळावा,” मात्र, आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी सर्व पालकांनी, भावांनी आणि आजोबांनी यामध्ये सहभागी व्हाव असेही आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते. ते दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुण्यात मोर्च्याचे आयोजन
बदलापूर, अकोला, पुणे, नाशिक, कोल्हापूर आदी ठिकाणांवर महिला आणि मुलींवर अत्याचारांच्या घटनांचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे तर्फे लाल महाल येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांना वंदन करून लाल महाल ते अलका चौक मोर्चा काढण्यात येणार आहे. संवेदना जिवंत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे, आपल्या परिसरातील सर्व दुकानदारांना व व्यापाऱ्यांना शांततेच्या मार्गाने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता लाल महाल येथे उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.
मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं?
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. महाधिवक्ता देवेंद्रकुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाचे हे आदेश दिले आहेत. कोर्टाचा हा आदेश महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे. तरीही महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं तर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस
मुंबई हायकोर्टाच्या या आदेशानंतर आता मुंबईत पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस जारी करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कदाचित काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील केली जाऊ शकते. तशी शक्यता नाकारता येत नाही. अर्थात या प्रकरणी काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
🟥आम्ही शांततेत आंदोलन करणार.- पृथ्वीराज चव्हाण
दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी त्यांनी लोकशाहीमध्ये आम्हाला आमचं म्हणण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. चव्हाण यांच्या या प्रतिक्रियेवर काँग्रेस नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. विरोधकांना आता राजकारण करायचं आहे. बदलापूरची घटना वाईट आहे. आरोपीवर कारवाई होत आहे. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही विरोधक त्या आदेशाला जुमानत नसल्याचा आरोप दरेकर यांनी दिला आहे.
🟥बंदमुळे जनजीवन विस्कळीत होणार, सर्वसामान्य जनतेला त्रास होणार
वकील सुभाष झा न्यायालयात युक्तीवाद करताना म्हणाले, या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होणार आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास होणार आहे. राजकीय पक्षांनी पुकारलेले बंद असंवैधानिक ठरवण्याचा हायकोर्टाला अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण दावा बंदविरोधातील याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ देत युक्तिवाद सुरू आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत भीमा कोरेगाव, मराठा आरक्षण या प्रश्नांबाबत झालेल्या आंदोलनांत प्रशासन व्यवस्था ठप्प झाली होती. यात राज्यासह बाहेरून येणार्या नागरिकांना बंदचा मोठा फटका बसेल. सरकार असे बेकायदेशीर बंद रोखत नसेल तर कोर्टानं हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी अॅड सुभाष झा यांनी केली आहे.
🔴कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारने पार पाडलीच पाहिजे
पुढे बोलताना सुभाष झा म्हणाले, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणाऱ्या लोकांविरोधात सरकारने प्रतिबंधक पावले उचलली पाहिजेत. कोणालाही सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करण्याचा अधिकार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारने पार पाडलीच पाहिजे. कोणतंही विरोध प्रदर्शन हे कायदेशीरच मानलं पाहिजे. बदलापुरातील ज्या घटनेसाठी विरोध होतोय तो योग्यच आहे. दोन लहान मुलींच्या बाबतीत जे काही घडलं त्यासाठी आरोपीला फाशीच झाली पाहिजे. पण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचंय, त्यासाठी संपूर्ण राज्याला वेठीस धरणं चुकीचं आहे. बदलापुरात त्या दिवशी 10 तास लोकांनी रेल रोको केला, पोलिसांवर जमावानं दगडफेक केली.मात्र अश्या मुद्यांवर राजकारण होणं हे चुकीचं आहे. उद्याच्या बंदसाठी राज्यातील विरोधी पक्षानं कार्यक्रम जाहीर केलाय. लोकल ट्रेन, बससेवा, रस्ते कसे बंद करायचे याचं नियोजन केलं गेलंय. विरोध करण्याचा हा मार्ग राज्याच्या हिताचा नाही. यामुळे शाळा, महाविद्यालय, रूग्णालय यांना मोठा फटका बसेल. तसेच राज्याचा एका दिवसाचा कितीतरी मोठा महसुलही बुडेल.

🛑राज्य सरकारनं SIT स्थापन केली आहे, मग हा बंद कशाला? – सदावर्तेंचा सवाल
याचिकाकर्त्यांच्या वतीनं डॉ. गुणरत्न सदावर्ते यांचा देखील युक्तिवाद सुरू आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात बंदविरोधात आक्रमक युक्तिवाद केलाय. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. दोषी पोलिसांवर सरकारनं कारवाई केली आहे. राज्य सरकारनं SIT स्थापन केली आहे. मग हा बंद कशाला? बदलापूर स्थानकावर झालेल्या दगडफेक घटनेचे, फोटो सदावर्ते यांनी हायकोर्टात सादर केले. अश्या प्रकारच्या दगडफेकीचे समर्थन कसं करणार? असा सवाल सदावर्तेंनी केलाय.
🟥दरम्यान, मुंबई हायकोर्टाकडूनच आता हा बंद बेकायदेशीर असल्याची टिपण्णी करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.