🟥 अखेर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत विधानसभेसाठी ठरली रणनीती
( या दिवशी मुंबईत मेळावा घेऊन मविआ प्रचाराचा करणार शुभारंभ.)
मुंबई :- प्रतिनिधी
पुढील काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यात आली आहे. येत्या १६ ऑगस्टला मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये मविआच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
🔴या बैठकीनंतर मविआ नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज मविआच्या तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत धोरणात्मक चर्चेवर अधिक भर होता. तिन्ही पक्षांनी मिळून राज्यात उत्तम सरकार दिले हे जनतेला ठाऊक आहे. संकटाच्या काळात मविआ सरकारने जे काम केले त्याची नोंद देशाने घेतली हेदेखील सर्वांना माहिती आहे. मविआच्या तिन्ही पक्षातील नेत्यांनी धोरणात्मक चर्चा केली. किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात जाहिरनाम्याचं काम जोरात सुरू आहे. १६ ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा होईल.
🟥त्याचसोबत २० ऑगस्टला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी बैठकीचं आणि मोठ्या रॅलीचं आयोजन आम्ही केले आहे. या कार्यक्रमात मविआच्या मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती आम्ही केली आहे असं त्यांनी सांगितले. त्याशिवाय १६ तारखेच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील. एक उत्तम सरकार देण्याच्या दृष्टीने त्याचा शुभारंभ महाराष्ट्रात या मेळाव्यातून होणार आहे. आज झालेली चर्चा मविआ सरकार आणण्याचं ध्येय ठेवून सकारात्मक चर्चा घडली. पुढची बैठक लवकरच होईल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.