आजरा महाविद्यालयात काॅ.संपत देसाई यांची प्रकट मुलाखत.
(मराठी विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन)
आजरा. – प्रतिनिधी.
श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक आणि डाव्या पुरोगामी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते काॅ. संपत देसाई यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि.८ ऑगस्ट रोजी आजरा महाविद्यालयाच्या सभागृहात मराठी विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सदरची मुलाखत संपन्न होणार आहे. प्रा.एकनाथ पाटील, काॅ. देसाई यांचेशी संवाद साधणार आहेत. पुस्तक रुपाने प्रकाशित झालेल्या एका लोकलढ्याचा पट या निमित्ताने उलगडला जाणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार बी.ए.भाग तीनच्या मराठी विषयाच्या वर्गासाठी तयार करण्यात आलेल्या सुधारित अभ्यासक्रमात काॅ. संपत देसाई यांच्या ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या अनुभवकथनपर पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. चित्री प्रकल्पातील विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरील संघर्षावर आधारित सदरचे पुस्तक आहे. शिवाजी विद्यापीठ आणि जनता एज्युकेशन सोसायटीचे आजरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या नव्या अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने याच कार्यशाळेच्या एका सत्रात सदरची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डाॅ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डाॅ नंदकुमार मोरे यांचे बीजभाषण होणार आहे. शिविमचे अध्यक्ष डाॅ .भरत जाधव यावेळी प्रमुख उपस्थित असतील. डाॅ. अरुण शिंदे, डाॅ. श्यामसुंदर मिरजकर कार्यशाळेच्या वेगवेगळ्या सत्रात विविध विषयांवर मांडणी करणार आहेत. शिविमचे उपाध्यक्ष डाॅ. जयवंत दळवी समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे आहेत. प्राचार्य डाॅ अशोक साबळे समारोप सत्राचे अध्यक्ष असतील. डाॅ. मांतेश हिरेमठ यावेळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. मराठी विभाग प्रमुख डाॅ. आनंद बल्लाळ, डाॅ. आप्पासो बुडके, प्रा. बाळासाहेब कांबळे आणि योगेश पाटील कार्यशाळेचे संयोजन करीत आहेत.