विशाळगडावर घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध..
हल्लेखोरांवर कडक कारवाई करा… आजरा पुरोगामी पक्ष संघटनांची मागणी..
आजरा- प्रतिनिधी.
काल विशाळगड येथे घडलेली घटना ही कायदा धाब्यावर बसवणारी असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी पत्रकाद्वारे आजरा तालुक्यतील पुरोगामी पक्ष संघटनांनी केली आहे.
खरंतर विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा एक महत्वाचा साक्षीदार आहे. त्याचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभागाबरोबर शासनाचीही आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण असू नये असे आमचेही मत आहे. ते अतिक्रमण पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्तीतपणे कायदेशीर मार्गाने काढणे गरजेचे होते. पण पुरातत्व विभागाने आणि शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले कि काय अशी आम्हाला शंका येते. खरतरं संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने त्यांच्याशी संवाद करणे गरजेचे होते. पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आंदोलन गांभीर्याने घेतले नाही. याचाच फायदा घेत कांही समाजकंटकांनी कायदा हातात घेत विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या मुस्लीम व इतर समाजातील कुटुंबावर हल्ला केला.
खरतर गजापूर या गावाचा अतिक्रमणाशी अर्थाअर्थी कांही संबंध नसतांना आंदोलनाचा गैरफायदा घेत हे कृत्य घडवलं गेलं. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करतो. हा किल्ला जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार तर तसाच तो हिंदू-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मलिक रेहान बाबाच्या दर्ग्यासाठीही प्रसिध्द आहे. लाखो हिंदू भाविक देखील या दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे या गडाचे संवर्धन आणि जतन करणे महत्वाचे आहे. त्यासाठी अतिक्रमण मुक्त विशाळगड झाला पाहिजे, यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून हे अतिक्रमण काढून टाकले पाहिजे. कालची घटना ज्या पध्दतशीरपणे घडवली गेली त्यामागे कोणाचा हात आहे हे सुध्दा पोलीस प्रशासनाने शोधले पाहिजे. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या आणि कायदा हातात घेऊन हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशा मागणी कॉ संपत देसाई, डॉ नवनाथ शिंदे, कॉ शांताराम पाटील, संतोष मासोळे, प्रकाश मोरुस्कर, प्रकाश मोरुस्कर, संजय घाटगे, काशिनाथ मोरे, अजय देशमुख, शिवाजी सम्राट, डी के कांबळे, दशरथ घुरे, व्ही डी जाधव, नारायण भडांगे, बाळू जाधव, शिवाजी भगूत्रे इत्यादींनी पत्रकाद्वारे केली आहे.