🟥ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी ४०० कोटी. ( मंत्री गिरीष महाजन
सुधारित किमान वेतनातील फरक मिळणार )
🟥लग्नाळू शेतकरीपुत्रांना लाखो रुपयांना लुबाडले.- 8 महिन्यांत 9 मुलांसोबत केले तिने लग्न..
🟥आजची रात्र आहे, आरक्षण जाहीर करा, नाही तर २० तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार.- मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा.
मुंबई :- प्रतिनिधी.

राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार किमान वेतन लागू करण्यात आले आहे.शासनाने या कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतनातील फरकाची रक्कम प्रदान करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी अर्थसंकल्पात ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
🟥सुनील भुसारा यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. महाजन म्हणाले की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व आकृतीबंधाबाबत शिफारस करण्यासाठी यावलकर समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सादर केलेला अहवाल वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीचे उत्त्पन्न व लोकसंख्येचा विचार करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी सहाय्यक अनुदानाच्या हिश्श्याची टक्केवारी ठरविण्यात आली आहे.
🔴भविष्य निर्वाह निधीची रक्कम नियमानुसार जमा करण्यात येत असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली आहे. यासाठीचे अनुदानही वेळोवेळी देण्यात येत असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
🟥लग्नाळू शेतकरीपुत्रांना लाखो रुपयांना लुबाडले.- 8 महिन्यांत 9 मुलांसोबत केले तिने लग्न..
अहमदनगर :- प्रतिनिधी.

समाजात मुलींची संख्या कमी त्यामुळे कित्येक मुले लग्नापासून वंचित राहिले आहेत. मुलाला सरकारी नोकरी हवी किंवा पुणे, मुंबईत फ्लॅट हवा, अशा भल्या मोठ्या मागण्यांमुळे गावाकडील शेतकरी कुटुंबातील शेती करणारी मुले लग्नासाठी दारोदार भटकत असल्याचे दिसून येते.मात्र, अशा लग्नाळू तरुणांना हेरुन, त्यांच्या सोबत फसवणूक करण्याच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत. अशीच एक घटना अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे घडून आली आहे.
🟥मुलीचं लग्न लावून देणाऱ्या अशाच एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका तरुणाकडून दोन लाख 15 हजार रुपये घेऊन त्याचे सिमरन या नाव असणाऱ्या मुलीशी लग्न लावण्यात आले. विशेष म्हणजे लग्नानंतर लगेचच या मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उगले कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या मुलीसह टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
🔴मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या सिमरनने आठ महिन्यांत तब्बल 9 तरुणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांना गंडवले असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर पाच अशा एकूण 7 आरोपींना अटक केले आहे. पोलिस तपासात या टोळीचे अनेक करामती समोर आल्या आहेत.
🛑यवतमाळ जिल्ह्यातील सिमरन हिने तिची आई आणि इतर 5 साथीदारांसह गुजरात, मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद आदी ठिकाणी लग्नाळू मुलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ मोठ्या रकमा घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. या टोळीने आणखी दोन तरुणांना फसविण्याचा कट रचला होता. मात्र, त्या आधीच मुंगुसगाव प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या ठगांना अटक केली. याप्रकरणी मुंगुसगाव येथील तरुणाने 28 जून रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी या टोळीचा तपास सुरू करुन टोळीला अटक केली. पोलिसांनी या टोळीकडून फसवून घेतलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, असा एकूण 13 लाख 7 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना 11 दिवसांची कोठडी दिली आहे.
🔴शेतकरी कुटुंबातील मुलांना हेरायचे आणि लग्नाचे आमिष दाखवून त्यांना फसवायचे, ही या टोळीची पद्धत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील नितीन उलगे या शेतकरी मुलाला अशाच पद्धतीने या टोळीने हेरलं आणि त्यांची फसवणूक केली. लग्न झाल्यानंतर नवरा मुलगा असलेल्या नितीनच्या आईला या टोळीवर संशय आला होता. त्या संबंधित माय लेकीवर लक्ष ठेवूनच होत्या आणि तसंच झालं. लग्नाची नोटरी करण्याच्या बहाण्याने सिमरनची आई आशा पाटील हिने नितीनच्या कुटुंबियांना श्रीगोंदा येथे नेले. आधीपासूनच तिथे असलेल्या त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने पळून जाण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, नितीनच्या आई मंदाबाई उगले यांनी हा डाव हाणून पाडला.
🟥पोलिसांनी मागितले पैसै
स्थानिक नागरिकांच्या मदतीने उगले कुटुंबियांनी आशा गौतम पाटील, शेख शाहरूख शेख फरीद, सिमरन गौतम पाटील, दीपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील ऊर्फ कर्णन गौतम पाटील , युवराज नामदेव जाधव, सचिन बलदेव राठोड ऊर्फ राजूरामराव राठोड यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी कारवाईसाठी आणि इतर आरोपींच्या शोधासाठी उगले यांच्याकडूनच पैसे घेतल्याचा आरोप अशोक उगले यांनी केला आहे.

🟥आजची रात्र आहे, आरक्षण जाहीर करा, नाही तर २० तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार.- मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
छत्रपती संभाजीनगर :- प्रतिनिधी

राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरु झाला असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आजची रात्र तुमच्याकडे शिल्लक आहे. नाही तर 20 तारखेपासून पु्न्हा उपोषण सुरु करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. आम्ही सर्व मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढील निर्णय घेणार नाही. ते पुढे म्हणाले की आजची रात्र सरकारच्या हातात आहे आम्ही सर्व मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाही. मी थेट विषयाला हात घालणार आहे. आपण आता दमलोय असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
🟥मराठ्यांनो शांत राहा. मी तुम्हाला आरक्षण मिळवून देतो. संभाजीनगरात आलात. तसंच शांततेनं जायचं आहे. कुठे काडीही मोडली नाही पाहिजे. सरकारने आज रात्रीपर्यंत विचार करा. मी उद्याच निर्णय घेणार होतो. संभाजी नगरातच निर्णय घेणार होतो. उद्याच्या उद्या निर्णय होणार होता. पण उद्या दुपारी मला माऊलीच्या दर्शनाला जायचं असल्याचे त्यांनी सांगितले.मी 16 तारखेला परत येणार आहे. 17 तारखेला माझ्या हस्ते श्रीक्षेत्र नारायण गडावर विठू रायाची पूजा ठेवली आहे. त्यामुळे 17 तारीख गेली. आता 18 आणि 19 तारीखच माझ्या हाती आहे.
🔴मला राजकारणात जायचं नाही. आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचं आहे. आम्हाला आरक्षण द्या. तुमच्या राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नसल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. आम्हाला आज रात्री आरक्षण दिलं नाही तर 20 तारखेला मी आमरण उपोषण करणार आहे. मेलो तरी चालेल. पण मराठ्यांच्या अंगावर गुलाल उधळणार आहे. 20 तारखेला स्थगित केलेलं उपोषण सुरू होणार आहे.20 तारखेला मराठ्यांनी 288 उमेदवार उभं कारायचे की पाडायचे याची तारीख जाहीर करू. 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी करतोय की मला सरकारला संधी द्यायची आहे. नाही तर उमेदवार पाडणार असा निर्वाणीचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.