🛑धक्कादायक.- सांगलीतील कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकम याने गळफास घेत संपवले जीवन. (शनिवारी दुपारी सुरज निकम याच्यावर होणार अंत्यसंस्कार.)
🟥भाजपमध्ये हालचालींना वेग.
मुंबईत आज महत्त्वाची बैठक.
( दिवसभर चिंतन, मंथन आणि खलबतं होणार.)- भाजपचे केंद्रीय नेते मुंबईत दाखल
🟥समृद्धी महामार्गावर जालन्याजवळ दोन कारचा भीषण अपघात.- ७ जण ठार; ४ जण गंभीर जखमी.
सांगली :- प्रतिनिधी.
अत्यंत कमी वयात आणि अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावचा सुप्रसिद्ध कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल पैलवान सुरज जनार्दन निकम (वय-३०) याने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
🔴नागेवाडी ( नागनाथनगर) येथील सुपुत्र सुरज निकम याने अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात चांगली कामगिरी करुन आपला दबदबा निर्माण केला होता. कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लाना आस्मान दाखवले होते. त्याने अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात नावलौकिक निर्माण केला होता. गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याने कुमार महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. सुरज निकम हा वडिलांच्या निधनानंतर व्यथीत होता.शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नागेवाडी येथील जुन्या राहत्या घरातील एका खोलीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याचे मामा भास्कर जोतीराम जाधव यांनी पै. सुरज याला विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकम याचा विवाह दीड महिन्यापूर्वी झाला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह संपूर्ण खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. विटा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पैलवान सुरजचा भाऊ आसाम येथे व्यवसायनिमित्त असल्याने ते आल्यानंतर आज शनिवारी दुपारी सुरज निकम याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, या घटनेची नोंद विटा पोलिसात झाली आहे.
🟥भाजपमध्ये हालचालींना वेग.
मुंबईत आज महत्त्वाची बैठक.
( दिवसभर चिंतन, मंथन आणि खलबतं होणार.)- भाजपचे केंद्रीय नेते मुंबईत दाखल
मुंबई.- प्रतिनिधी.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आज भाजपची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाची मिमांसा करतानाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्लॅनही आखण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीसाठी केंद्रातील दोन महत्त्वाचे नेतेही आले आहेत. दिवसभर प्रदेश कार्यालयात चिंतन, मंथन आणि खलबते केली जाणार आहेत. या बैठकीनंतर जुलैमध्ये भाजपची दोन दिवसाची चिंतन बैठक होणार आहे.
🟣भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार आहेत. या बैठकीला भाजपचे केंद्रीय नेते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उपस्थित आहेत. भूपेंद्र यादव हे निवडणूक प्रभारी म्हणून तर वैष्णव हे निवडणूक सह प्रभारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते प्रदेश कार्यालयात जमले आहेत. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. राज्यभरातील महत्त्वाचे एकूण 21 सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
🟥भाजप प्रभारी जयभानसिंह पवैय्या, सहप्रभारी श्याम धुर्वे आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश यांचीही प्रमुख उपस्थित आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, मंत्री अतुल सावे, खासदार धनंजय महाडिक, भाजप नेते गणेश नाईक, आमदार श्रीकांत भारतीय यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
🔴आज होणाऱ्या बैठकीत निवडणूक हा अजेंडा असेल. लोकसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा होणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यासाठी आजपासूनच कामाला लागण्याचे आदेश दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय विधान परिषदेच्या पाच जागांवरही या बैठकीत चर्चा होणार असून या जागांसाठीची नावे ठरवली जाणार आहेत. काही पराभूत उमेदवारांवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे.
🅾️विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. पक्षातील हेवेदाव्यांवरही चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जातं. तसेच मित्र पक्षांनी लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात सहकार्य केले नाही, त्याचीही चर्चा या बैठकीत होणार असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आता महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर असल्याचे संकेतही या बैठकीतून देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
🟥समृद्धी महामार्गावर जालन्याजवळ दोन कारचा भीषण अपघात.- ७ जण ठार; ४ जण गंभीर जखमी.
जालना :- प्रतिनिधी.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. महामार्गावरील जालन्यामधील कडवंची गावाजवळ दोन कार एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यामधील कडवंची गावाजवळ रात्री ११ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नागपूरकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या इर्टिगा कारला राँग साईडने येणाऱ्या लिफ्ट डिझायर कारने धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला, अशी माहिती समोर आली आहे.
🛑मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या इर्टिगाला राँग साईडने येणाऱ्या सिफ्टची धडक बसून हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, स्विफ्ट कारनं धडक दिल्यामुळं इर्टिगा कार आणि स्विफ्ट कार महामार्गावरचे बॅरिकेड मोडून थेट खाली पडली. या भीषण धडकमेमुळे ७ जणांचा मृत्यू झाला. तर चौघे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजते. नागपूरवरून येणाऱ्या कारमधील चौघांचा मृत्यू झाला तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारमधील दोघांनी जीव गमावला. तर आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.
🅾️विरुद्ध दिशेने येणारी ही कार स्थानिक लोकांची होती, अशी माहिती मिळत आहे. गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी ते विरुद्ध दिशेने येत होते. तर नागपूरहून मुंबईच्या दिशेने येणारी कार अतिशय वेगात होती. दोन्ही कारची जोरदार टक्कर झाली. हा अपघात अतिशय भीषण होता. त्यामध्ये कारचाही अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यामध्ये सह जणांना जीव गमवावा लागला. तर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं. मात्र अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस आणि इतर मदतकार्य घटनास्थळी पोहचायला उशीर झाला. त्यामुळं मृतांची संख्या वाढल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्यानं मृतांची ओळख अजून पटली नसून या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.