🟥ट्रकमध्ये वरून कोळशाची राख, चोरकप्प्यात दारूचे घबाड.- ४० लाखांची प्रतिबंधित दारू जप्त.
नागपूर :- प्रतिनिधी.
ट्रकमध्ये चारही बाजूला कोळशाची राख आणि आतमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात दारूचे घबाड, अशा प्रकारे प्रतिबंधित विदेशी बनावटीच्या दारूची ‘पुष्पा स्टाईल’ तस्करी करणाच्या टोळीचा छडा राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने लावला.ट्रकसह ४० लाखांची दारू जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाची अलिकडच्या कालावधीतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
🟥मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू निर्माण केली जाते. ही दारू बनावट मानली जाते. ती आरोग्यास अपायकारक असल्यामुळे ईतर राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असते. तिला केवळ मध्य प्रदेशातच विकण्याची परवानगी असल्यामुळे त्याच ब्राण्डच्या दारूच्या तुलनेत या दारूची किंमत फारच कमी असते. त्यामुळे नागपूरसह ठिकठिकाणचे मद्य तस्कर ही दारू बोलवून बिनधास्तपणे हॉटेल, बार, रेस्टॉरेंट आणि ढाब्यावर विकतात. अशाच वेगवेगळ्या ब्राण्डच्या दारूची मोठी खेप नागपुरात येणार असल्याची टीप एक्साईजच्या स्थानिक अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे अधीक्षक सूरजकुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली एक्साईच्या पथकाने ऑटोमोटीव्ह चाैक ते कळमना मार्गावर विनोबा भावे नगरात सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ट्रक क्रमांक एमएच ४०/ सीडी २२६० टप्प्यात येताच तो थांबविण्यात आला. ट्रकची पाहणी केली असता त्यात कोळशापासून तयार झालेली राख भरून दिसली. आतमध्ये तपासले असता राखच राख दिसली. त्यामुळे तपासणी करणारे पथक चक्रावले. त्यांनी ट्रकमध्ये काहीच नसल्याचा अंदाज बांधला.
🅾️अन् चोर कप्पा आढळला
ट्रकच्या कॅबिनची कसून तपासणी केली असता चालकाच्या सीटमागे प्लायवूड लावून दिसले. संशय आल्याने ते बाहेर काढले असता त्यातून एक चोर दरवाजा आढळला. आतमध्ये ५ फुट उंच, १५ फुट लांब आणि ट्रकचा गाला ज्या आकाराचा, त्या आकाराचे एक भुयार कम लॉकर आढळले. त्यात मोठ्या प्रमाणात बियर कॅन आणि वेगवेगळ्या ब्राण्डची दारू आढळली. ती जप्त करून ट्रकचालक सतिश दिलीप सोनवणे तसेच सहायक योगेश जानरावजी धुर्वे या दोघांना अटक करण्यात आली. हा ट्रक विशाल आनंद जांबुळकर याच्या मालकीचा असून, तो फरार आहे. या टोळीत अनेक मद्य तस्करांचा सहभाग असल्याची चर्चा आहे.
🔴जप्त करण्यात आलेली बियर आणि दारू
ले माउंट ब्रण्डच्या ५०० मिलीच्या ७२० बिअर कॅन, ‘गोवा’ व्हिस्कीच्या १८० मिलिच्या १२५०० बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४८० बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४८० बाटल्या आणि इंम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलिच्या ४८० बाटल्या. ही सर्व दारू, ट्रक दोन मोबाईलसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ४० लाख, ५१ हजार रुपये आहे. एक्साईज एसपी सुरजकुमार रामोड, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितिय निरीक्षक रणधिर गार्दैडे तसेच मंगेश कावळे, शैलेश अजमिरे, मोहन पाटील, उमेश शिरभाते, योगेश यलसटवार, शिरीष देशमुख, समिर सईद, विनोद ठाकुर, प्रशांत घावळे, स्नेहा पवार, धवल तिजारे आणि देवेश कोठे यांनी ही कारवाई केली.
🟥विधानभवनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट.- एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल. राजकीय चर्चांना उधाण.
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असेल. आज पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले होते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एकाच लिफ्टने प्रवास केला. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
🟥लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यातील बदलेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू झालेलं राज्य विधानसभेचं अधिवेशन हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरणार आहे. या अधिवेशनात लोकसबा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेली सत्ताधारी महायुती आणि विजयामुळे आत्मविश्वास वाढलेली महाविकास आघाडी यांच्यात विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच घडलेल्या एका घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
🔴२०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मुख्यमंत्रिपदावरून विवाद होऊन युती तुटल्यापासून एकमेकांवर जहरी टीका करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज विधान भवनाच्या आवारात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवादही झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले होते. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे लिफ्टने जाण्यासाठी आले असता, देवेंद्र फडणवीसही तिथे उभे होते. यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्टसमोर गप्पा मारल्या. यानंतर त्यांनी तळमजला ते तिस-या माळ्यापर्यंत एकत्र प्रवास केला. दरम्यान याआधी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. संसदीय कामकाज मंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी आले असता तिथे उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी एकमेकांना ब-याच कोपरखळ्या मारल्या. यावेळी सर्वांच्याच नजरा वळल्याचे पाहायला मिळाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी अनिल परब यांचे अॅडव्हान्समध्ये अभिनंदन करत आहोत असे सांगत सर्वांच्या नजरा वळवल्या.