🛑सर्पनाला पारपोली मध्यम प्रकल्पाची.- आम. प्रकाश आबिटकर यांच्याकडून पाहणी.
🛑टोल विरोधी आंदोलनात मी आंदोलक जनतेबरोबर.- आम. प्रकाश आबिटकर
( २४ रोजी होणार टोल विरोधी संघर्ष मोर्चा.)
🛑आजरा तालुक्याचा विकास आराखडा तयार करून कामाला लागू.- खासदार छत्रपती शाहू महाराज.
आजरा.- प्रतिनिधी.

संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्गासाठी आजरा तालुका वासियांचा मोठा त्याग आहे. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता टोल विषयी निर्णय घेतला आहे. बाधित शेतकऱ्यांच्या त्याग असतानाही टोलचे भूत आजरा तालुक्यावरच लादले जात आहे. महामार्गाचे काम परिपूर्ण झाले नसतानाही टोल नाका उभारणीचे गौड बंगाल काय तसेच टोल वसुलीची घाई का? आजरा तालुक्यातील नागरिकांनी टोलच्या विरोधात उभारलेले आंदोलन योग्यच असून या टोलमुक्तीच्या लढ्यात मी जनतेबरोबर असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा तहसील कार्यालयात टोलबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता मधाळे, भुदरगड आजरा प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला तालुक्यातील नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तालुका वासियांच्या वतीने भूमिका स्पष्ट करताना कॉ. संपत देसाई म्हणाले, महामार्गाच्या कामासाठी जर केंद्र शासनाने निधी दिला असेल तर टोल आकारणी कशासाठी? तरीही निधीचे कारण सांगून टोल आकाराने होत असेल तर राज्य शासनाने केंद्र शासनाला पैसे देऊन निधीचा विषय निकाली काढावा. आजरा तालुक्यातील नागरिक कोणत्याही परिस्थितीत टोल भरणार नाहीत. या टोलच्या संदर्भात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक होऊन टोलबाबत धोरण ठरण्याची गरज आहे. आमदार आबिटकर पुढे म्हणाले, टोलला जनतेचा विरोध आहे त्यामुळे यापुढे टोलचे कोणतेही काम करायचे नाही. टोल रद्द होण्यासाठी शासकीय पातळीवरील व कायदेशीर लढाई लढण्यासाठी देखील आम्ही सज्ज आहोत. तसेच प्रशासकीय पातळीवर देखील टोलच्या संदर्भात कोणती हालचाल करण्यात येऊ नये असे त्यांनी सांगितले. हा यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, जिल्हा बँक संचालक सुधीर, देसाई, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, भाजपचे सुधीर कुंभार, प्रभाकर कोरवी, माजी उपनगराध्यक्ष विलास नाईक, सुधीर सुपल श्री. लमतुरे यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी तहसीलदार समीर माने, आजरा साखर अध्यक्ष वसंतराव धुरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंत शिंपी, गटविकास अधिकारी ढमाळ, आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे, जनार्दन टोपले, विष्णुपंत केसरकर, भाजपचे तालुकाध्यक्ष बाळ केसरकर, दशरथ अमृते, विजय पाटील, अभिषेक शिंपी, जी. एम. पाटील, जितेंद्र टोपले, विजय थोरवत, संजय पाटील, विष्णुपंत केसरकर, जितू भोसले यांच्यासह विविध गावचे सरपंच, नागरिक, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट…
शक्तिपीठ महामार्गाबाबत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी मतदार संघातून शक्तिपीठ जावा याकरता आग्रह धरणारा मीच होतो. मात्र या शक्तिपीठाला लोकांचा विरोध सुरू झाल्यानंतर हा शक्तिपीठ थांबला पाहिजे हे सांगणारा देखील मीच आहे. मतदार संघाचा विकास करत असताना लोकांचा विरोध डावलून कोणतेही काम करण्यात येणार नाही. तसंच आजरा येथे होणारा टोल नाका हा अन्यायकारक आहे. या टोलविरोधी आंदोलनात माझाही आंदोलक सहभाग असेल असे
यावेळी आमदार आबिटकर यांनी स्पष्ट केले.
🛑आजरा तालुक्याचा विकास आराखडा तयार करून कामाला लागू.- खासदार छत्रपती शाहू महाराज.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्याचा विकास आराखडा तयार करून तालुक्यातील विकासासाठी सर्वांच्या विचारानुसार नियोजन करू असे वक्तव्य लोकसभा निवडणुकीनंतर खासदार छत्रपती शाहू महाराज आभार कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक मुकुंद दादा देसाई यांनी केले.
खास. छत्रपती शाहू महाराज बोलताना पुढे म्हणाले आजरा तालुका हा विकासापासून वंचित आहे परंतु खऱ्या अर्थाने शेतीप्रधान असलेला तालुक्यात आहे भात संशोधन, काजू प्रक्रिया केंद्र , सह वेगवेगळे उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करणार आहे मतदारसंघाचा सार्वत्रिक विकास व सर्वांच्या विचाराने, सर्व धर्म समभाव हा विचार डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे आपण मला सर्वाधिक मताधिक्याने विजय केलात व आपली सेवा करण्याची संधी दिला याबद्दल सर्वांचे आभार मानले.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा विजय आनंदोत्सव फक्त कोल्हापूर जिल्ह्यात नाहीतर राज्यात व देशात उत्सव आहे. मतदारांनी देशात घटना बदलण्याचा प्रयत्न म्हणून पडला व केंद्रावर अंकुश ठेवण्याचा मतदारांनी कौल दिला. देशात हुकूमशाही चालली होती आज लोकशाहीत जिवंत ठेवण्याचे काम मतदारांनी केले आहे. शाहू महाराजांचा विजय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचा विजय आहे. फक्त रस्ते विकास, हॉल म्हणजे विकास नाही. सामान्य माणसाला आधार द्यायचे काम व तालुक्याचा विकासातून चित्र बदलण्याचे काम होणार आहे. आपल्याला खासदारांना भेटायला कोल्हापूरला यावं लागणार नाही. आजऱ्यातच खासदारांचे कार्यालय असेल. तसेच भौगोलिक परिस्थिती बदलणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे. आपल्या आजऱ्यात चाललेल्या टोल विरोधी संघर्ष समितीला माझा पाठिंबा आहे असे बोलताना आम. श्री पाटील म्हणाले.
यावेळी कॉम्रेड संपत देसाई म्हणाले. आजरा तालुक्याला जोडलेले मतदार संघ व त्या मतदारसंघातील आमदार हे दुसऱ्या पक्षात गेलेले असताना. फक्त सर्वसामान्य पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्या जीवावर प्रचार यंत्रणा राबवून अखेर विजयापर्यंत पोहोचलो. आजरा तालुक्याच्या विकासात भर घालताना प्रथम तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत याबाबतची माहिती आम्ही वेळोवेळी देत जाईल. पण तालुक्याचा विकास व्हावा असे श्री देसाई म्हणाले.
व्ही. बी. पाटील म्हणाले या विभागात तीन आमदार असताना एकही आपल्या सोबत नसताना आपण मतदानात आघाडी घेतला. आता या तिन्ही आमदारांना जागा दाखवणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी जे उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या मागे राहून त्यांनाही विजयी करावे लागेल. असे श्री पाटील म्हणाले.
यावेळी उमेश आपटे, अंजनाताई रेडेकर, रामराजे कुपेकर, उदयराज पवार, संभाजी पाटील, युवराज पवार, जयवंतराव शिंपी, रचना होलम, संजीवनी सावंत, अशोक तरडेकर संतोष मासोळे, रवींद्र भाटले, प्रकाश मोरस्कर, शांताराम पाटील, सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट.
मुकुंद दादा देसाई – आमदार सतेज पाटील.- यांची जवळीक वाढली.
लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई व आमदार सतेज पाटील यांचे निवडणुकीच्या माध्यमातून एकत्रित प्रचार यंत्रणेचे काम वाढले तसतशी जवळीक वाढली आहे. याबाबत तालुक्यात आमदार सतेज पाटील यांची जवळीक वाढल्यामुळे.. मुकुंददादा आता चर्चेत आहेत…..
🛑सर्पनाला पारपोली मध्यम प्रकल्पाची.- आम. प्रकाश आबिटकर यांच्याकडून पाहणी.
आजरा .- प्रतिनिधी.

सर्फनाला मध्यम प्रकल्प हा हिरण्यकेशी नदीखो-यातील सर्फनाल्यावर पारपोली ता. आजरा या गावानजीक बांधण्यात आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यापूर्वी सदर प्रकल्पाची पाहणी व प्रकल्पग्रस्तांची चर्चा याबाबतचा आम. प्रकाश आबिटकर यांचा दौरा दि. २० रोजी झाला.
सदर प्रकल्प कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत ” आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता १८.९८ दलघमी असून उपयुक्त पाणीसाठा १८.१८ दलघमी इतका आहे. सदर प्रकल्पांतर्गत आजरा तालुक्यातील २० गावांतील २६४४ हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पिण्यासाठी १.८१३ दलघमी. आणि औद्योगिक वापरासाठी ०.६०४ दलघमी, पाणीवापर प्रस्तावित आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ठ्ये व
धरणाची लांबी १४४० मी.
धरणाची महत्तम उंची -३३.३२७ मी. तर साठवण क्षमता-
१८.९८ दलघमी, एकुण पाणीसाठा – जिंवत पाणीसाठा –
१८.१९ दलघमी, मृत पाणीसाठा
पाणलोट क्षेत्र – ०.९० दलघमी
बुडीत क्षेत्र – ११.८८ चौ. किमी
लाभक्षेत्र २४५.७२ हे आजरा तालुक्यातील एकुण २० गावे क्षेत्र ३३५० हे. सिचन क्षेत्र – २६४४ हे. त्याचबरोबर लभक्षेत्रातील को.प. बंधारे १) शेळप-५६५ हे. २) दाभिळ ४२३ हे. ३) देवडे ९४७ हे. ४) साळगाव ४७९ हे. ५) सोहाळे २३० हे. एकुण २६४४ हे. यामध्ये लाभक्षेत्रातील गावे पारपोली, शेळप, दाभिळ, विनायकवाडी, देवकांडगाव, कोरिवडे, हरपवडे, पेरणोली, आल्याचीबाडी, गवसे, दर्डेवाडी, मेढेवाडी, देवर्ड, वेळवट्टी, कुरकुंदे, साळगाव, सोहाळे, बाची, पारेवाडी, पेठेवाडी.
प्रकल्पाची सद्यःस्थिती – माती धरण – माती धरणाची सांडव्यासह लांबी १४४० मी. (सा. क्र. १८० मी. ते १४४० मी.) व महत्तम उंची ३३.३३ मी. आहे. (धरण माथा पातळी ७०३.५८५ मी.) कटक बांध क्र.१ व २ चे मातीकामासह अश्मपटलाचे काम पूर्ण झाले आहे. घळभरणीचे काम ३० एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करणेचे उद्दिष्ठ असुन त्यानुसार काम सुरु आहे. तसेच
सांडवा – या प्रकल्पास ओगी प्रकारचा व्दारविरहीत सांडवा असुन संकल्पनानुसार सांडव्याची लांबी ८७ मी. इतकी असून विसर्ग क्षमता ३३९.६७ घमी / सेकंद इतकी आहे. सांडव्याचे काम मे २०२४ पर्यंत पुर्ण करणेचे उद्दिष्ठ असुन त्यानुसार अंतिम टप्प्यातील काम सुरु असल्याचे पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी माहिती दिली. यावेळी उपविभागीय अभियंता …. कनिष्ठ अभियंता प्रकाश यसने, श्री. थाटब, श्री. आबिटकर, श्री. कुंभार, सह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चौकट.

यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीला भेट देण्यात आली उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे, आम. प्रकाश आबिटकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या नवीन वसाहतना भेट देत प्रलंबित विषयांबाबत चर्चा करण्यात आली. जमिनी बाबतच्या काही प्रलंबित विषयाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे यावेळी प्रांत अधिकारी सौ बारवे यांनी सांगितले. यावेळी सरपंच प्रियंका शेंडगे, उपसरपंच प्रकाश कविटकर, सह प्रकल्पग्रस्त अशोक मालव, सुरेश मिटके महादेव पाटील, प्रकाश शेंडगे, अर्जुन शेंडगे आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.
{ आम. प्रकाश आबिटकर – पारपोली सर्पनाला या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यापूर्वी सदर प्रकल्पाची पाहणी करताना व प्रकल्पग्रस्तांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटते.
२०१४ साली संघर्ष यात्रा काढली होती. त्या संघर्ष यात्रेमध्ये संकल्प केला होता. धामणी खोऱ्यासह सर्पनाला मध्यम प्रकल्प पूर्णत्वास नेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. तो घेतलेला संकल्प पूर्ण होत असल्याने व आज प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचे पाणी व पुनर्वसन झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आज खरोखरच समाधान वाटत असल्याचे आम. श्री आबिटकर यांनी बोलताना सांगितले.}
