🟥विद्यार्थ्यांना एसटी पास आता शाळा कॉलेजातच मिळणार.
🟥छत्तीसगडमध्ये चकमकीत ८ नक्षलवादी ठार.- एक जवान शहीद..
मुंबई :- प्रतिनिधी.
शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.
🟥नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६% इतकी सवलत दिली आहे. म्हणजे केवळ ३३% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापकाकडून पास घेतले जात असत.
🔴यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीच्या निर्णयाचा फायद्यासंदर्भात १८ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.
🟥छत्तीसगडमध्ये चकमकीत ८ नक्षलवादी ठार.- एक जवान शहीद
रायपूर :- वृत्तसंस्था.
छत्तीसगडमधील नारायणपूरच्या अबुझमाड जंगलात झालेल्या पोलीस-नक्षलवादी चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले आहेत तर एक जवान शहीद आणि २ जखमी झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर एकूण ३८ लाखांचे बक्षीस होते.
🟥छत्तीसगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून नारायणपूर, कांकेर, दंतेवाडा आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांतील जिल्हा राखीव दल, स्पेशल टास्क फोर्स आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस जवानांचे संयुक्त पथक अबुझमाड परिसरातील कुतुल, फरसाबेदा, कोडामेटा जंगलात नक्षलविरोधी मोहिमेवर होते. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. या वेळी चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले, तर एक जवान शहीद झाला. त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यापूर्वी ७ जून रोजी नारायणपूर-दंतेवाडा येथे नक्षलवादी आणि डीआरजी जवानांमध्ये चकमक झाली होती. ज्यामध्ये सात नक्षलवादी ठार तर तीन जवान जखमी झाले होते. छत्तीसगड सरकारच्या आकडेवारीनुसार, वर्षभरात १३६ नक्षलवादी मारले गेले व ५०३ जणांना अटक करण्यात आली. ४३७ जणांनी आत्मसमर्पण केले.