🛑देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मनस्थितीत?
( सरकारमधील जबाबदारीतून मोकळं कराव.- देवेंद्र फडणवीसांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. )
🛑मान्सून गोव्यातच अडखळला.- गुरुवारी तळकोकणात दाखल होण्याची शक्यता.
🟥जनतेनं एनडीएला कौल दिलाय.- इंडिया आघाडी विरोधी पक्षाची जबाबदारी निभावणार.- मल्लिकार्जुन खरगे.
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्यातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मनस्थितीत असून उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला कमी जागा मिळाल्या आहेत. राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जबाबदारीमधून मोकळ करावं, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
🟥खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आमचे मुंबईचे अध्यक्ष व राज्याचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र काम केलं. कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याचं काम केलं. मात्र जागा कमी आल्या आहेत ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले. लोकसभेच्या संपूर्ण निवडणुकीत महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व मी करत होतो. त्यामुळं जो काही पराभव झाला आहे. जागा कमी आल्या आहेत त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. मी कमी पडलो. हे मी स्वीकारतो.
🔴ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या भरून काढण्याचा प्रयत्न पुढच्या काळात करणार आहे. विधानसभेच्या तयारीसाठी मला आता पूर्णवेळ उतरायचं आहे. त्यामुळं मला सरकारमधून मुक्त करावं अशी विनंती पक्षनेतृत्वाला करणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. ‘मला पक्ष संघटनेसाठी पूर्ण वेळ देता यावा या हेतूनं मी तशी इच्छा व्यक्त करणार आहे. त्यांच्या सल्ल्यानं मी पुढं काम करेन,’ असंही त्यांनी सांगितलं. संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या प्रचाराचा जनमानसावर मोठा परिणाम झाला. मराठा आरक्षण देण्यास आलेल्या अपयशाचाही आम्हाला फटका बसला. कांद्याच्या भावाच्या मुद्द्याचाही प्रचार झाला. सरकारनं आरक्षण दिल्यानंतरही मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेगळा प्रचार झाला. त्याला आम्ही प्रभावीपणे उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा फटका आम्हाला बसला. मराठवाड्यातील निवडणुकीत ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर झालं, असंही फडणवीस म्हणाले.
🟥देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख मते मिळाली आणि महायुतीला 2 कोटी 48 लाख मते मिळाली. याचा अर्थ आम्हाला फक्त दोन लाख मते कमी मिळाली. मुंबईत महाविकास आघाडीला 24 लाख मते मिळाली आणि महायुतीला 26 लाख मते मिळाली. याचा अर्थ फक्त दोन लाख मते मविआला जास्त मिळाली. आमच्या चार जागा गेल्या आणि राज्यातील आठ जागांवर 4 टक्के मतांचा फरक राहिला. तसेच 6 जागांवर 30 हजार मते कमी मिळाली. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 27.84 टक्के मते मिळाली होती. त्यामुळे आम्ही 23 जागा जिंकलो होतो, मात्र आता आम्हाला 26.17 टक्के मिळाली आणि केवळ 9 जागा आम्ही जिंकू शकलो. तर दुसरीकडे काँग्रेसला 2019 मध्ये 16.41 टक्के मते मिळाली होती. त्यावेळी ते एक जागा जिंकलो होते. मात्र आता ते 17 टक्के मतांनी 13 जागा जिंकले आहेत, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
🔴फडणवीसांनी सांगितली पराभवाची कारणे.
दरम्यान, महायुतीच्या पराभवाची कारणे सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा काही भागात महत्त्वाचा ठरला. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र त्यानंतरही हा मुद्दा मांडण्यात आला. विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा प्रचार जोरात केला, मात्र तो खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो. याशिवाय शेतकऱ्यांचा कांद्याचा मुद्दा महत्वाचा राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन- कापूसाचे दर कमी झाले, त्यानंतर आम्ही मदत केली. परंतु आचारसंहितेमुळे तो निर्णय आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नेऊ शकलो नाही, अशी खंत देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली.
🛑मान्सून गोव्यातच अडखळला.- गुरुवारी तळकोकणात दाखल होण्याची शक्यता.
पुणे:- प्रतिनिधी.
मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. बुधवारी मोसमी पाऊस (मान्सून) तळकोकणात दाखल होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मोसमी पाऊस गोव्यातच अडखळला आहे. गुरुवारी तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
🟥हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पाऊस मंगळवारी गोव्यात दाखल झाला होता. मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे बुधवारी तळकोकणात पाऊस दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात पाऊस गोव्यातच अडखलला आहे. सिंधुदुर्गमध्ये बुधवारी ढगाळ वातावरण तयार झाले होते. तापमानात घटही झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी हलका पाऊसही झाला. पण, तो पूर्वमोसमी होता. गुरुवारी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
🅾️कोकणचा तडाखा न्यूज):-हवामान विभागाने शनिवारी आणि रविवारी रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्याच्या अन्य भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी रविवारपासून पुढील दोन दिवस मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह पश्चिम घाटात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भासह राज्याच्या बहुतेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
🟥जनतेनं एनडीएला कौल दिलाय.- इंडिया आघाडी विरोधी पक्षाची जबाबदारी निभावणार.- मल्लिकार्जुन खरगे
नवी दिल्ली :- प्रतिनिधी.
जनतेनं भाजप आणि एनडीएला कौल दिला असून इंडिया आघाडी विरोधी पक्षाची जबाबदारी निभावणार, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
🅾️यावेळी ते म्हणाले कि, आघाडीच्या नेत्यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर दोन तास चर्चा केली. अनेक सूचना मिळाल्या आणि आजच्या परिस्थितीवर चर्चा झाली. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, इंडिया आघाडीचे घटक भारतीय जनतेचे आमच्या आघाडीला मिळालेल्या उदंड पाठिंब्याबद्दल आभार मानतात. जनतेच्या जनादेशाने भाजप आणि त्यांच्या द्वेष आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय राज्यघटनेसह इंडिया आघाडी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या फॅसिस्ट राजवटीविरुद्ध लढत राहील.
🟥दरम्यान, इंडिया आघाडीची बैठक सुरू होण्याआधी मल्लिकार्जुन खरगे यांनी एक ट्वीट केलं होतं. ज्यात ते म्हणाले की, ही निवडणूक पंतप्रधान मोदींच्या नावाने आणि चेहऱ्यावर लढली गेली. जनतेने भाजपला बहुमत न देऊन त्यांच्या नेतृत्वाबद्दल स्पष्ट संदेश दिला आहे. वैयक्तिकरित्या मोदीजींसाठी हा केवळ राजकीय पराभव नाही, तर नैतिक पराभवही आहे. पण त्यांच्या सवयी आपल्या सर्वांना माहीत आहेत. हे जनमत नाकारण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करतील.
🅾️खरगे म्हणाले होते की, मी इंडिया आघाडीच्या सर्व मित्रांचे स्वागत करतो. आम्ही एकत्र लढलो, समन्वयाने लढलो आणि पूर्ण ताकदीने लढलो. तुम्हा सर्वांचे अभिनंदन. 18 व्या लोकसभा निवडणुकीतील जनमत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात असल्याचे खरगे म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या शासकीय निवासस्थानी 10, राजाजी मार्ग येथे ही बैठक झाली. खरगे यांच्याशिवाय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, राहुल गांधी, संजय राऊत, प्रियांका गांधी वढेरा, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, शरद पवार, द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे नेते उपस्थित होते.