आजचे काही दिनविशेष ..चला तर स्मृती जपूया…👇
🛑स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा जन्मदिन.
🛑नेते एन. टी. रामाराव यांचा जन्मदिन.
🛑अहमदनगर स्थापना दिन
आज अहमदनगर शहराचा स्थापना दिन..
🛑जागतिक महिला आरोग्य दिन.
🛑जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन.
आजचा स्मृती दिवस.
महिला बालविकास विभाग आणि युनिसेफ आयोजित जागतिक आरोग्य संघटने कडून २८ मे हा दिवस
‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मासिक पाळीतील स्वच्छता आणि व्यवस्थापन उपक्रमाची माहितीचा प्रसार तसेच जनजागृती करण्यात येणार आहे.
तसेच २८ मे ला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सुरूवात होणार असून या कार्यक्रमासाठी महिला व बालविकास राज्यमंत्री
विद्या ठाकूर,
ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार
अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय राज्यातील जिल्हा परिषदांचे वरिष्ठ अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी आदी सहभागी होणार असून राज्यभरात मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाची माहिती, प्रसार तसेच जनजागृती होण्याच्या दृष्टीने कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे.
मुली मध्ये मासिक पाळी विषयी जनजागृती होण्यासाठी तसेच मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी कशाप्रकारे घ्यावी याविषयी मार्गदर्शन होण्यासाठी महिला दिनाच्या धर्तीवर
२८ मे हा दिवस ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन’ म्हणून साजरा करण्याचे विभागाच्या वतीने ठरविण्यात आले आहे.
🛑जागतिक महिला आरोग्य दिन.
आज जागतिक महिला आरोग्य दिना निमित्ताने महिलांच्या आरोग्या विषयी माहिती घेऊया.
आपल्याकडे स्वयंपाक ही घरोघर महिलांचीच जबाबदारी.
त्यामुळे एक दिवस जरी चारीठाव स्वयंपाक करायला जमलं नाही किंवा मुलं उपाशी राहिली किंवा त्यांना बाहेरून मागवून जेवावं लागलं तरी तिला याची रुखरुख लागते, अपराधी वाटतं.
मात्र या साऱ्यात आपण आपल्या खाण्यापिण्याकडे, आरोग्याकडे किती लक्ष देतो हा साधा प्रश्न तिला पडत नाही. आजही तिच्या आरोग्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी कुणी तिला सांगताना दिसत नाही. बाळंतपणानंतर पोट सुटू नये म्हणून
‘तू तीन महिने पोटपट्टा बांध’
असं डॉक्टर किंवा घरचेही तिला सांगत नाहीत.
तसंच गर्भपिशवी खाली उतरू नये म्हणून साधे सोपे व्यायाम प्रकार आहेत,
पण त्याबद्दलही ती अनेकदा अनभिज्ञ असते.
वेळच मिळत नाही म्हणते.
दुसरीकडे इंटरनेट, स्मार्टफोनचा जमाना असल्यामुळे बाळासाठी काय खावं ?,
काय करावं ?
याचाच ती शोध घेते. ते सारं करते,
पण स्वत:च्या आरोग्याविषयी किमान काही गुगलून ते करावं असं तिला वाटत नाही कारण ती आजही स्वत:च्या आरोग्याला अजिबात महत्त्व देत नाही,
असं सावित्रीबाई फुले स्त्री संसाधनच्या सचिव डॉ. कामाक्षी भाटे सांगतात.
खरंतर रोज स्वत:साठी थोडा वेळ काढून तिनं व्यायाम केला पाहिजे. स्वत:च्या आरोग्यासाठी सकस, योग्य आहार घेतला पाहिजे.
पण अन्न फुकट वाया जाईल म्हणून ती उरलेलं,
रात्रीचं अन्न निमूट खाते.
त्यातील पोषक तत्त्वे कमी झालेली असतात आणि मेद वाढलेला असतो.
पण घरात कुणाला शिळं खाऊन तब्येत बिघडायचा त्रस नको आणि अन्नाची नासाडी नको म्हणून ती स्वत:च ते खाऊन टाकते.
नोकरी करताना वेळ नाही
हे पालुपद फक्त स्वत:च्या संदर्भात, बाकी इतरांसाठी धावतपळत ती सगळी कामं करतच असते.
एवढंच कशाला, नोकरी करून निवृत्त झाल्यावर सुद्धा ती घरातली सारी कामं स्वत:वर ओढून घेते. इतकी वर्ष माझं तसं घराकडे दुर्लक्षच झालं म्हणत पोळ्या करणाऱ्या बाईला सुटी देते.
आपण आहे ना काम करायला,
मग कशाला पैसे खर्च करा म्हणत कामच करते.
स्वत:वर पैसे खर्च करण्या आधी दहादा विचार करते.
स्वत:च्या ‘फिटनेस’ साठी तर एक पैसा खर्च करायलाही तयार होत नाही.
ती विचार करते, त्यापेक्षा मी घरात थोडं जास्त काम करेन.
भाजी आणायला गेल्यावर थोडं जास्त चालायला जाईन. पण हे एवढंच करून ती फिट राहू शकत नाही.
त्यासाठी रोज वेगळा वेळ काढून व्यायामच करायला हवा.
आणि स्वत:कडे अजिबात दुर्लक्ष न करता स्वत:साठी वेळ काढायलाच हवा.
स्वत:च स्वत:च्या आरोग्याचा विचार प्राधान्यानं करणं बायकांसाठी फार गरजेचं आहे,
असं डॉ. भाटे आवर्जून सांगतात. आणि हीच कारणं असावीत की,
वरवर साऱ्या सोयीसुविधा बायकांच्या हाती दिसत असल्या,
तरी आजही शहरासह खेड्यापाड्यात महिलांच्या आरोग्याचे प्राथमिक प्रश्न पूर्वी होते तसेच आहेत. आजही ५ % टक्के महिला ‘अॅनिमिक’ आहेत.
म्हणजे त्यांच्या शरीरात रक्त कमी आहे.
गर्भारपणात हे प्रमाण ८ % टक्क्यांवर जातं. याप्रश्नी महिलांनी काय करायला हवं असं विचारलं तर स्त्रीआरोग्यतज्ज्ञ डॉ. शिरीष पटवर्धन सांगतात,
महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन मूलभूत गोष्टींचा सखोल विचार व्हायला हवा.
एक म्हणजे हिमोग्लोबिन आणि दुसरं म्हणजे पोटाचा घेर.
या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. निरोगी आरोग्यासाठी एक मंत्र महिलांनी कायम लक्षात ठेवून आचरणात आणायला हवा.
‘खरी भूक लागल्यावर प्रसन्न चित्तानं सावकाश खा आणि पोट भरायच्या आधी थांबा’ हा मंत्र लक्षात ठेवला तर आपसुकच पोटाचा घेर आटोक्यात येतो. महिलांच्या पोटाचा घेर हा अधिक असू नये एवढं पथ्य जरी सांभाळलं तरी आरोग्याचे अनेक प्रश्न आटोक्यात येतील. तेच हिमोग्लोबिनचंही.
हिमोग्लोबिनचं योग्य प्रमाण महिलांमध्ये १२ ते १४ ग्रॅम इतकं असावं.
हिमाग्लोबिन योग्य प्रमाणात असल्यास मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता चांगली राहते. चिडचिड होत नाही. उत्साह, आनंदी राहता येते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अत्यंत सोप साधे घरगुती उपाय आहेत. पण अनेकदा फॅशनेबल जगात ते पटत नाहीत. स्वयंपाक करताना लोखंडी तवा, कढई, उचटणं वापरल्यास रोज चार मिलिग्रॅम लोह शरीराला मिळतं. याचाही शरीराला खूप फायदा होतो.
डाएट फूडपेक्षा नाचणीचे आंबिल, उकड खाल्ल्यास त्याचाही हिमोग्लोबिन वाढण्यास फायदा होतो.
आपलं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असल्यास हे घरगुती साधे सोपे उपाय करावेत. हिमोग्लोबिन प्रमाणात आणि पोटाचा घेर कमी राहिल्यास डॉक्टरांकडे जायची आवश्यकता फारशी उरणार नाही.
पण हे सारं करायचं तर आपल्या प्राधान्यक्रमावर आपला क्रमांक वरचा हवा.
आपली तब्येत धडधाकट ठेवून स्वत:कडे लक्ष देणंही गरजेचं आहे हे बायकांनीच मान्य करायला हवं.
जग बदलण्यापूर्वी आपलीच मानसिकता बदलणं गरजेचं आहे, हे आरोग्य दिनानिमित्त आपण मान्य केलं तरी खूप मोठं काम होईल. सुशिक्षित महिला या अचाट शक्तिशाली होण्याच्या जाळ्यात अडकत आहेत.
या महिलांना ऑफिस मध्ये चांगले काम करायचं असतं. तिथे सर्वोत्तम काम करताना मिळवलेली थाप त्यांना घरच्यांकडूनही अपेक्षित असते.
पण त्यांना ही थाप ऑफिसच्या कामासाठी नव्हे,
तर घरच्या कामासाठी हवी असते.
म्हणजे दिवाळीत उत्तम चकल्या करते, तिच्या हाताला चव आहे असं घरी ऐकायचं असतं आणि प्रेङोण्टेशन उत्तम होतं म्हणून प्रमोशन,
हे ऑफिसात ऐकायचं असतं. एकाच वेळी त्यांना चांगली कर्मचारी, आई, सून, बायको व्हायचं असतं.
आणि आपण तशा आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात स्वत:च्या आरोग्यावर येणाऱ्या ताणांकडे त्या दुर्लक्ष करतात, स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात, मनावरही ताण येतोच त्याच्याकडे काणाडोळा करतात. या साऱ्याचा ताण, त्याचे दुष्परिणाम त्यांच्या मनावरही येत आहे.
स्मार्ट आयुष्य जगण्याच्या आभासी वातावरणात आपण आपल्याकडेच लक्ष देणं बंद करतो आहोत का?
याचा विचार महिलांनी करायलाच हवा.
🛑अहमदनगर स्थापना दिन
आज अहमदनगर शहराचा स्थापना दिन..
२८ मे १४९० रोजी कोटबाग निजाम हा राजवाडा बांधून नगरची स्थापना झाली.
मलिक अहमदशहा बिहरी याने १४९० मध्ये सीना नदीकाठी वसाहत स्थापन केली.
तेथेच अहमदनगर वसण्यास सुरवात झाली. अहमदशहाच्या नावावरूनच अहमदनगर हे नाव पडले.
अहमदनगर जिल्ह्याचा हा राजकीय इतिहास अत्यंत पुरातन व रोचक आहे.
नगरची भूमी संतांची.
तसेच योद्ध्यांचीही. विविध राजवटीच्या रक्ताने माखलेल्या या भूमीचा इतिहासही तसा रक्तरंजीत म्हणावा लागेल. कारण अनेक लढाया या मातीने झेलल्या. अंगाखांद्यावर योद्ध्यांनी आपले कसब पणाला लावले.
गतप्राण झाले अन् अनेक जिंकलेही. संघर्षमय इतिहास असलेल्या या जिल्ह्याला पौराणिक संदर्भही आहेत. अगदी रामायण, महाभारतापासून ते राष्ट्रकुट वंश, चालुक्य, निजामशाही, मराठ्यांचे राज्य, इंग्रजी राजवटीची झालर त्याला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथील उत्खननातून सिंधू संस्कृतीचे अस्तित्व येथे असल्याचे सिद्ध झाले.
नवनाथ संप्रदाय याच जिल्ह्याच्या भूमीत अनेक काळ वास्तव्यास राहिला. गोरक्षनाथांची कर्मभूमी, कानिफनाथांची समाधी याच भूमीत आहे.
नाथांनी ठिकठिकाणी वास्तव्य केल्याच्या खूना आहेत.
संत ज्ञानेश्वर,
संत एकनाथांचे वास्तव्य,
ज्ञानेश्वरीची रचना आदी संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी नगर जिल्हा राज्यभरात प्रसिद्ध आहे.
१५०८ मध्ये अहमदशहाचा मृत्यू झाला.
त्याचा मुलगा पहिला बुऱ्हाणशहा सात वर्षांचा असताना गादीवर आला.
त्याचे बहुतेक आयुष्य लढण्यात गेले.
१५५३ मध्ये त्याचा मृत्यू झाला.
त्याला पाच मुले होती.
त्यातील थोरला मुलगा हुसेनशहा पहिला हा गादीवर आला.
या वेळी त्याच्याशी त्याच्या भावांचे भांडण सुरू झाले. याच काळात गोवळकोंडा व विजापूर येथील राजांनी नगरला वेढा दिला.
या वेळी तह झाला. पुढील एका लढाई नंतर त्याचा मृत्यू झाला.
चांदबीबी ही हुसेनशहाचीच मुलगी. तिचा विवाह आदिलशहाशी झाला. १५५५ मध्ये चौथा निजाम मुर्तझा हा गादीवर आला.
त्याने सलाबतखान (दुसरा)
याची वजीर म्हणून नेमणूक केली. सलाबतखानाने नगरला पाण्यासाठी खापरी नळ योजना तयार केली.
त्याचे काम पाहून प्रजेला तो आवडत असे.
त्यानेच शहा डोंगरावर अष्टकोनी महाल बंधला.
चांदबिबीचा महाल म्हणून तो आजही सुस्थितीत आहे. सलाबतखानाच्या मृत्यू नंतर महालात त्याची कबर करण्यात आली.
चांदबीबी ही अहमदनगरचा निजामशहा पहिला हुसेनशहाची मुलगी. विजापूरच्या पहिल्या आदिलशहाची पत्नी. तिला अरबी, फारसी, मराठी, कन्नड, तुर्की या भाषा अवगत होत्या. आदिलशहाच्या मृत्यूनंतर (१५८०) आदिलशाहीत अंतर्गत संघर्ष सुरू झाला.
सुमारे दहा वर्षे हा संघर्ष चालला. आदिलशाहीची थोडी घडी बसविल्या नंतर चांदबीबी अहमदनगरच्या निजामशाहीत परत आली.
हुसेनचा मुलगा मुर्तझा पहिला हा लहानपणीच गादीवर
(१५८६ ते ८९) बसला.
त्याचा मुलगा मिरनशहा याला गादीवर बसविले.
तो व्यसनी असल्याने त्याचा चुलतभाऊ इर्सल शहाला १५८९ मध्ये गादीवर बसविले.
मुर्तझाच्या बुऱ्हाण नावाच्या भावाचा हा इर्सल शहा मुलगा. इर्सलचा मृत्यू १५९४ मध्ये झाल्या नंतर त्याचाच भाऊ इब्राहिम शहाने सूत्रे हाती घेतली.
त्याच्या दरबारात दुफळी झाल्याने विजापूरकरांशी त्याचे युद्ध झाले.
युद्धात त्याचा मृत्यू झाला.
फक्त चारच महिने त्याला राज्य करता आले.
त्यानंतर वजीर मियान अंजू याने अहमद नावाचा आपला मुलगा गादीवर बसविला. १५९५ मध्ये हा अहमद गादीवर बसला.
तो निजामाचा वारीस नव्हता.
हा वाद प्रजेत सुरू झाला.
त्यामुळे त्याने दिल्लीकर अकबराचा मुलगा मुराद याच्या मदतीने नगरास वेढा दिला.
या वेळी अहमद शिवाय इतर तिघेजण निजामशाही राज्यावर आपला हक्क सांगत होते.
त्यापैकी बहादूर नावाच्या हक्कदारास चांदबीबीचा पाठिंबा होता.
मुरादने वेढा दिला, त्यावेळी चांदबीबीनेही युद्धात भाग घेऊन १५९५ मध्येच सत्ता ताब्यात घेतली.
चांदबीबीने इब्राहिमचा पुत्र बहादूरशहाला गादीवर बसविले आणि स्वतः कारभार हाती घेतला.
तिच्याच राज्यातील महंमद नावाच्या वजिराने मुरादला पुढे करुन तिच्या विरोधात कट कारस्थाने सुरू केली.
याच दरम्यान चांदबीबी व वजीर नेहंगखान यांच्यातही वाद सुरू होता.
मुराद नगरवर चाल करणार होता;
परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. १५९९ मध्ये अकबराने दानियल यास नगरवर चाल करण्यास पाठविले. तो आल्या नंतर चांदबीबीचा वजीर नेहंगखान पळून गेला.
त्यामुळे चांदबीबी एकटी पडली.
याच काळात हमीद खोजा व त्याच्या मंडळींनी चांदबीबीचा खून केला.
त्यामुळे नगरचे राज्य मोगलांना आयतेच मिळाले. बहादूरशहाला अकबराने कैद केले आणि नगरचा कारभार दानियल याच्याकडे १६०० मध्ये सोपविला.
🛑स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा जन्मदिन.
⭕जन्म – २८ मे १८८३ (भगूर,नाशिक)
⭕स्मृती – २६ फेब्रुवारी १९६६ (मुंबई)
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ,
विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. सावरकर हे लहानपणा पासूनच अत्यंत बुद्धिमान होते.
वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते.
जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका,
स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. सावरकर १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य.
त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले.
ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली.
त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला.
नाशिकच्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.
ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना लंडनला अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता.
दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता.
फ्रान्सच्या भूमीवरून ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता.
पण तसे घडले नाही. मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्या समोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य. तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते.
बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन,
असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात.
पहिल्या भागात आक्रमक,
क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर,
धगधगते लेखन करणारे सावरकर, असे त्यांचे रूप दिसते.
तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजसुधारक सावरकर,
हिंदू संघटक सावरकर,
भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर; अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात. अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले. सावरकरांनी १९२७ मध्ये उःशाप हे पहिले नाटक लिहिले.
ते नाटक
“नाट्यकला प्रसारक मंडळाने”
रंगभूमीवर आणले. सावरकरांनी सन्यस्तखड्ग नाटक लिहिले.
त्यातील शतजन्म शोधताना हे नाट्य गीत अंगावर रोमांच उभे करते.
हे नाटक बळवंत नाटक मंडळाने १९३२ मध्ये सादर केले.
उत्तरक्रिया हे त्यांचे नाटक भारत भूषण संगीत मंडळाने सदर केले.
दत्ताराम यांना लहानपणी ऐका रानीत कीचकवध नाटकातील सैरंध्रीची भूमिका पाठ करवून घेवून सावरकरांनी त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी सैरंध्री उत्कृष्ट करवून घेतली.
१९४३ साली सांगलीस झालेल्या अखिल महाराष्ट्र नाट्य संमेलनाच्या शाताद्भी महोत्सवाच्या अध्यक्षपदाचा मन सावरकरांना मिळाला आहे.
सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले.
१९२१ मध्ये अंदमानच्या तुरुंगात असताना त्यांनी उर्दू आणि देवनागरी हस्ताक्षरात लिहिलेल्या २ गझल अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरां मधला देशाभिमान आणि लेखक जागा असल्याच्या खुणा पटवणाऱ्या अशा या गझला व गीत आहे.
🛑नेते एन. टी. रामाराव यांचा जन्मदिन.
⭕जन्म – २८ मे १९२३ (आंध्रप्रदेश)
⭕स्मृती – १८ जानेवारी १९९६ (हैदराबाद)
तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष व आंध्रचे माजी मुख्यमंत्री नंदमुरी तारक रामाराव उर्फ
एन.टी. रामाराव यांचा जन्म आंध्रप्रदेश मध्ये झाला.
त्यांची गणना तेलुगु चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये होते. त्यांना विजयवाडा येथे राहणाऱ्या त्यांच्या मामांनी दत्तक घेतले.
येथेच त्यांनी नगर निगम शाळेत शिक्षण घेतले आणि त्यानंतर एस.आर.आर. आणि सी.वी.आर. कॉलेज येथे शिक्षण घेतले होते.
एन.टी.आर. यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती.
त्याचमुळे त्यांनी घर चालवण्यासाठी कमी वयातच काम करण्यास सुरुवात केली.
एन.टी. रामाराव विजयवाडा येथील आसपास हॉटेल मध्ये दूध सप्लाय करण्यास सांगितले.
जे पैसे त्यांना मिळायचे त्यात त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची मदत केली.
१९४२ साली रामाराव यांनी त्यांच्या मामांची मुलगी बासव तारकम सोबत लग्न केले.
एन.टी. रामाराव यांना ८ मुले आणि ४ मुली. १९८५ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. १९९३ साली वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी तेलुगू लेखिका लक्ष्मी पार्वती सोबत लग्न केले
पण एन.टी.आर. यांच्या कुटुंबियांनी त्यांचा कधी स्वीकार केला नाही.
तेलुगू चित्रपटातील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून एन.टी. रामाराव यांचे नाव प्रसिद्ध होते.
१९४९ साली
‘मना देसम’ या चित्रपटातून त्यांनी फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत काम केले. अभिनयाशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांची स्क्रिप्ट लिहिली आणि अनेक चित्रपटांची निर्मितीही केली.
भारतीय सिनेमांतील योगदानासाठी एन.टी. रामाराव यांना भारत सरकारने १९६८ साली पद्मश्री देऊन सन्मानित केले. तेलुगू चित्रपटाशिवाय एन.टी. रामाराव यांनी अनेक तामिळ आणि हिंदी चित्रपटांतही काम केले.
त्यांनी १७ वेळा कृष्णाची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी पौराणिक भूमिका सोडून न्यायव्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या नायकाची भूमिका केली. एन.टी. रामाराव यांनी १९८२ साली तेलुगू देसम पार्टीची स्थापना केली आणि पॉलिटीक्समध्ये एंट्री घेतली.
प्रसिद्ध अभिनेते असल्याने
एन.टी. रामाराव यांना जबरदस्त यश मिळाले आणि यासोबतच ते आंध्रचे १० वे मुख्यमंत्री बनले.
१९८३ पासून ते १९९४ मध्ये ते तीनवेळा आंध्रचे मुख्यमंत्री बनले. राजकीय कारकिर्दीत रामाराव यांना खूप तणावपूर्ण दिवस पाहायला मिळाले. त्यांचे जावई एन्.चंद्रबाबू नायडू यांनी रामारावांविरूध्द ऑगस्ट १९९५ मध्ये बंड केले.
पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचे समर्थन नायडूंनाच मिळाले आणि रामारावांना मानहानीकारक परिस्थितीत मुख्यमंत्रीपदावरून दूर व्हावे लागले.
या वर्षी
एन.टी. रामाराव यांच्या जीवनावर ‘एन.टी.आर.’ नावाचा सिनेमा येतोय.
अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचा वाढदिवस.
⭕जन्म – २८ मे १९५३ (नाशिक)
अर्थतज्ज्ञ,
रिझर्व्ह बॅंकेचे कार्यकारी संचालक आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु,
राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांचा जन्म नाशिक येथे झाला.
त्यांचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत झाले.
जाधव कुटुंबीय मूळचे ओझर नाशिक येथील.
त्यांचे वडील दामोदर संताजी जाधव यांनी सुरवातीला हमाली केली.
मग ‘जी.आय.पी.’ रेल्वेत बिगारी म्हणून कामाला लागले.
पुढे ते रेल्वे पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरीला लागले.
त्यांनी मुलांवर चांगले संस्कार केले,
त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले.
चारही मुलांनी उच्च शिक्षण घेतले.
थोरला मुलगा ‘आय.ए.एस.’ झाला,
दुसरा मुलगा दुबईत ‘गल्फ एअर’ मध्ये नोकरी करत आहेत, तिसरा मुलगा मुंबई महापालिकेत अधिकारी आणि चौथा मुलगा म्हणजे डॉ. नरेंद्र जाधव.
डॉ. नरेंद्र जाधव मुंबई विद्यापीठाचे स्टॅटिस्टिक्स विषयाचे पदवीधर आणि अर्थशास्त्र विषयाचे द्विपदवीधर आहेत. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेला प्रयाण केले आणि इंडियाना विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली. आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या मातृभूमीसाठीच झाला पाहिजे,
या इच्छेने अमेरिकेत अनेक संधी मिळत असतानाही ते देशात परतले आणि अनेक वर्षे त्यांनी बँकिंग क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावली. तब्बल ३१ वर्षे
डॉ. जाधव बँकिंगच्या क्षेत्रात आपल्या कामाने तळपत राहिले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते प्रमुख सल्लागार आणि मुख्य अर्थतज्ज्ञ होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांची कारकीर्द अतिशय गाजली होती.
इंटरनॅशनल मॉनेटरी फंडचे ते सल्लागार आणि कार्यकारी संचालकही होते. अर्थतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून असणारा त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांची केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून तसेच केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नेमणूक केली होती.
नरेंद्र जाधव हे राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत.
या अत्यंत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असल्याने डॉ.जाधव दिल्ली मुक्कामी असतात.
शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास, क्रीडा, युवा, सामाजिक न्याय या क्षेत्रातील कार्य ते बिहार, तामिळनाडू, गोवा, दीव दमण, दादरा नगर हवेली या प्रांतांत करत आहेत. त्याच प्रमाणे मध्यंतरी त्यांची नेमणूक
‘चीफ इकॉनॉमिक काऊन्सेलर फॉर अफगाणिस्तान’ म्हणूनही करण्यात आली होती. इथिओपियासाठीही त्यांनी हेच काम केले आहे.
महाराष्ट्रात झालेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या संदर्भात नेमण्यात आलेल्या एकसदस्यीय आयोगाचे ते सर्वेसर्वा होते आणि अत्यंत संवेदनशीलपणे आणि परखडपणे त्यांनी आपला अहवाल सादर केला होता.
अशा प्रकारच्या तीसहून अधिक आयोगांसाठी डॉ.जाधव यांनी विविध अहवालांसाठी संशोधन केले आहे. देश विदेशातील विविध व्यासपीठांवर त्यांचे शंभरहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांचा आस्वादही रसिकांनी घेतला आहे.
लेखक या नात्याने डॉ.जाधव यांची १४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी विक्रीचे उच्चांक प्रस्थापित केले आहेत.
त्यांच्या या चौफेर कामगिरी बद्दल ३३ हून अधिक पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
डॉ.जाधव अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आहेतच;
पण त्यांची प्रशासकीय कामावरही मजबूत पकड आहे.
अत्यंत तर्कशुद्ध विचार,
प्रभावी मांडणी, मराठी आणि इंग्रजीवरील कमालीचे प्रभुत्व यामुळे त्यांचे विचार ऐकणे हा एक निराळाच अनुभव असतो.
मग ते व्यासपीठ कुठलेही असो. साहित्यिक, शैक्षणिक, अर्थविषयक, धोरणविषयक वा निखळ गप्पांचे डॉ.जाधव आपल्या वक्तृत्वाने सारे वातावरण चैतन्यमय करतात.
हे सारे करून डॉ.जाधव हे बेस्टसेलर लेखकही आहेत,
उत्तम अनुवादकार आहेत.
नरेंद्र जाधव यांनी तीन भाषेत ३७ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. इंग्रजी मध्ये १९, मराठीत १३,
आणि हिंदी मध्ये ३. तीनशे पेक्षाही अधिक शोध पेपर आणि लेख.
या पुस्तकात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर २१ पुस्तके आणि रवींद्रनाथ टागोरांवर ३ पुस्तके ज्यात विश्लेषणात्मक जीवनचरित्र आणि निवडक कविता,
लघु कथा, नाटक, विडंबने, लेख आणि भाषण यांच्या अनुवादाचा समावेश आहे.
‘आमचा बाप आन् आम्ही’
हे मराठीत त्यांनी आत्मचरित्र लिहीले आहे.
जगातल्या वीस भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहे.
संदर्भ : इंटरनेट