🟥राज्यात १५ मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा.
🟥महाराष्ट्र विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक:-2024 कार्यक्रम जाहीर.
🛑अवकाळीचा झटका….बळीराजाला फटका.
पपईसह केळीच्या बागा भुईसपाट..👇
पुणे :- प्रतिनिधी.
राज्यात पुढील काही दिवस पावसाचे आहेत. १५ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पुढील काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
🔴तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना १५ मे पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा, ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
🅾️हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून पुढील तीन दिवस बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यात ११ व १२ तर, सातारा येथे १२ तारखेला मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह गारपिट आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा व विदर्भात १२ मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ, येथे मेघगर्चना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची व गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १४ मे पर्यंत उर्वरित बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
🛑भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाही.- यंदा भरपूर पाऊस.- शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष चांगले जाणार
बुलढाणा :- प्रतिनिधी.
राज्यात प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घडमांडणीची भविष्यवाणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. अक्षय्य तृतियेच्या मुहुर्तावर करण्यात येणाऱ्या या घटमांडणीतील या भविष्यवाणीमधून पाऊस, पिकपाण्याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भेंडवळच्या घटमांडणीमधून करण्यात आलेल्या भाकितानुसार जून, जुलै हे महिने कमी पावसाचे असणार आहेत. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
🔴चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्याहस्ते ही घट मांडणी करण्यात आली. यानंतर घट मांडणीतील भाकित वर्तवण्यात आलं आहे. चांगला पाऊस होईल, खरीप पिके साधारण राहतील. रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली. त्यानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार आहे. भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार, यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल. जुलैमध्ये चांगला पाऊस होईल. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल.
🟥सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होईल. एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यावर्षी खरीप पिके साधारण राहील. त्यात करडी, मटगी, मसूर, तूर, बाजरी, हरबरा, मुंग व उडीद हे पिके साधारण येतील. त्यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल. पिकांची नासाडी देखील होईल, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. रब्बी पिकांमध्ये यंदा गहू पिक सर्वात चांगलं राहील, असं भाकित देखील वर्तवण्यात आलं आहे. आचारसहिंता सुरू असल्याने यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही. भेंडवळच्या घट मांडणीवेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.
🟥महाराष्ट्र विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक:-2024 कार्यक्रम जाहीर
🔴कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी 10 जून रोजी मतदान तर 13 जून रोजी मतमोजणी
🟥सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18 जून 2024 पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू👉जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे
सिंधुदुर्गनगरी:- प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील सदस्य निरंजन वसंत डावखरे यांची मुदत दिनांक 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. सदर जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार दिनांक 10 जून 2024 रोजी मतदान तर 13 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार उमेदवार व राजकीय पक्षांसाठीची आदर्श आचारसंहिता दिनांक 8 मे 2024 ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या म्हणजेच दिनांक 18 जून 2024 पर्यंतच्या कालावधीसाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता लागू राहील. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे.
🟥महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक :-2024 कार्यक्रम पुढीलप्रमाणे
निवडणूकीची अधिसूचना 15 मे 2024 (बुधवार) रोजी प्रसिध्द होईल. नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 22 मे 2024 (बुधवार) असा आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्याचा दिनांक 24 मे 2024 (शुक्रवार) असा असून उमेदवारी अर्जमागे घेण्याचा अंतिम दिनांक 27 मे 2024 (सोमवार) आहे. मतदान दिनांक 10 जून 2024 (सोमवार) होईल. मतदानाची वेळ सकाळी 08.00 ते दुपारी 04.00 वाजेपर्यंत आहे. मतमोजणीचा दिनांक 13 जून 2024 (गुरुवार) होईल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 18 जून 2024 (मंगळवार) आहे.
अवकाळीचा झटका….बळीराजाला फटका.
पपईसह केळीच्या बागा भुईसपाट

अकोला :- प्रतिनिधी.
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील भंडारा आणि अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या पावसामुळं मोठे नुकसान झालं आहे. पपईसह केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.
🔴भंडारा जिल्ह्यातील मागील तीन दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसाचा फटका भातपिकांसह पालेभाजी पिकांनाही बसला आहे. यासोबतचं जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या मिरची या बागायती शेतीलाही याचा फटका बसला आहे. अवकाळी पावसानं भात पिकांसह मिरची आणि पालेभाज्याची पिकं जमिनदोस्त झाली आहेत. तर, अनेक शेतातील मिरची पीक जळून खाली पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे.
🟥अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळाने हिवरखेडसह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपुर नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना फटका बसलाय. ज्यामध्ये शेकडो एकरावरील पपई व केळीच्या फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. काल अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात वादळाची तीव्रता इतकी होती की मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे. तर संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी, अशा कित्येक फळे, भाजीपाला धान्य आणि विविध पिकांचे नुकसान झाले आहे.
🅾️दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे. 16 मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. त्यामुळं या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी पडत असलेल्या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे. काही ठिकाणी या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
