🛑राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील मतदान.- अमरावती, अकोला, परभणी, वर्ध्यात ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड?
🟥मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट.- पुढील दोन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचं संकट.
🟥’रो रो सेवे’तून कोकण रेल्वेला तब्बल ३३ कोटींचे उत्पन्न.👇
नागपूर :- प्रतिनिधी.
राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला.
🔴अमरावती, अकोला, परभणी आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर येथील शाळा क्रमांक १९ मधील खोली क्रमांक ५ मध्ये ईव्हीएम बंद पडलं. जवळपास १५ मिनिटे वोटिंग मशीन बंद पडलं होतं. त्यामुळे मतदारांचा चांगलाच खोळंबा झाला होता. अखेर ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. सध्या अमरावतीमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. दुसरीकडे वर्ध्यात देखील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू झाल्यानंतर अचानक ईव्हीएम मशीन बंद पडलं. वोटिंग मशीन बंद पडताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. मतदान थांबल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
🅾️अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. उमरा गावातील बुथ क्रमांक ३३३ मधील वोटिंग मशीन अचानक बंद पडलं. त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत मतदानाला सुरुवात झालेली नव्हती. ईव्हीएम बदलण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. परभणी शहरातील महात्मा फुले महाविद्यालयातील 172 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन सात वाजल्यापासून बंद पडले आहे. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी सुरू होणार मतदान खोळंबलं आहे. सदर मशीन तांत्रिक कारणाने बंद पडली असून 45 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया थांबली आहे. महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ५ जागांवर मतदान झालं होतं. यावेळी बऱ्याच नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, आज होणाऱ्या मतदानाला मतदार कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
🟥मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट.- पुढील दोन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचं संकट.
मुंबई :- प्रतिनिधी.
महाराष्ट्रावर एकीकडे अवकाळी पावसाचं संकट कायम आहे, तर दुसरीकडे मुंबईसह ठाणे कोकणात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. पुढील ४८ तासांसाठी हवामान विभागाने कोकणात तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवस मुंबई, ठाणेसह कोकणासाठी हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली असून उष्णतेचा यलो अलर्टही जारी केला आहे.
🔴त्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकटही कायम आहे. पुढील ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत पावासाची शक्यता आहे. काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
🅾️हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 48 तासात राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. आयएमडीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सोलापूर, धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात पावसाची शक्यता आहे. 27 एप्रिलला जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
🟥26 आणि 27 एप्रिलला धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या तडाखा बसताना दिसत आहेत. मात्र, देशाच्या काही भागात अवताळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण आल्हाददायक आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
🟥‘रो रो सेवे’तून कोकण रेल्वेला तब्बल ३३ कोटींचे उत्पन्न.
रत्नागिरी :- प्रतिनिधी.

कोकण रेल्वे मार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची वाहतूक करणारी रो रो सेवा आर्थिक उत्पन्नाचा कणा ठरत आहे. गेल्या वर्षभरात या सेवेतून कोकण रेल्वे प्रशासनाला तब्बल ३२ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.
🟥२६ जानेवारी १९९९ सालापासून सुरू असलेली ही सेवा कोकण रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय भर टाकत आहे. बीआरएन वॅगनवर ट्रक्सचा ‘रोल-ऑन रोल-ऑफ’ करण्याचा कोकण रेल्वेचा अनोखा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या व्यवस्थेत ट्रक बीआरएन वॅगन्सवर लूपच्या टोकापर्यंत असलेल्या रॅम्पद्वारे वर चढविले जातात. केले जातात. या ट्रकना पुढे जाण्याच्या दृष्टीनेही योग्यरीत्या सुविधा दिली जाते. बीआरएन वॅगन्सवर चढविण्यापूर्वी, ट्रकचे वजन केले जाते. एवढेच नव्हे तर ट्रकचालक आणि क्लीनर त्यांच्या ट्रकच्या केबिनमध्ये झोपून प्रवास करू शकतात.
🔴रो रो सेवा अर्थात रोल ऑन-रोल ऑफ सेवेमुळे मालवाहतुकीच्या क्षेत्रात कोकण रेल्वेने अभिनव यशस्वी उपक्रम उभारून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे. अनेक ट्रकची वाहतूक साखळीपद्धतीने एकाच वेळी होत असल्याने कोकण रेल्वेची ही कामगिरी लोकप्रिय झाली आहे. यात ३ रँकद्वारे सेवा दिली जात असून, एका रँकमध्ये ५० ट्रक सहजगत्या राहू शकतील, अशी व्यवस्था असते. मात्र, त्यासाठी ट्रकची उंची रस्त्यापासून जास्तीत जास्त ३.४ मीटर असल्याचीही खात्री केली जाते. त्यानंतरच वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली जाते.अवघ्या १२ तासांत सुमारे १५० ट्रकचालक आणि त्याच्या सहकाऱ्यासह अवघ्या १२ तासांत इच्छित स्थळी पोहोचतात.
🟥गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली रो रो सेवेमुळे गेल्या ३ वर्षांत कोकण रेल्वेला जवळपास २०० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून दिले आहे. गेल्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेला ३२ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या कोकण रेल्वेची रो रो सेवा कोलाड (मुंबईपासून १४५ किलोमीटर) ते वेर्णा (मडगावपासून १२ किलोमीटर), वेर्णा ते सुरतकल (मंगळूरपासून २० किलाेमीटर) आणि कोलाड ते सुरतकल अशी होत आहे. या सेवेवर जकात किंवा टाेल द्यावा लागत नाही. तसेच अपघाताचाही धोका नाही. रो रो सेवेत सर्व ट्रक रस्त्यावर धावत नसल्याने ही सेवा जलद आणि प्रदूषणमुक्त आहे. तसेच प्रवासादरम्यान ट्रकचीही कोणती हानी किंवा नुकसान होत नाही. इंधनाबरोबरच वेळेची बचत, दूर पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या चालकांसाठी सुखकारक प्रवास या सर्व कारणांमुळे मालवाहतूकदारांच्या नफ्यातही वाढ होते.
