🛑गर्भवती मातांच्या आरोग्याशी खेळ.- पोषण आहारात अळ्या अन् कीडे
🟥धक्कादायक!- पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या २ विद्यार्थिनींवर रॅगिंग.
🟥टेन्शन वाढलं!
राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट.- फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक
🛑अहमदनगर-कल्याण मार्गावर पिकअकचा भीषण अपघात.
चिमुकलीचा मृत्यू. – ३ जण गंभीर जखमी.
🛑 वेटींगवरील तिकिट रद्द करण्यासाठी आकारलेल्या शुल्कातून रेल्वेची ३ हजार कोटींहून अधिक कमाई.
🟥महागाई अन् बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून जनता मोदी सरकारवर नाराज.- धक्कादायक आहे सर्व्हेचा निकाल! – लोकनीती सीएसडीएसच्या सर्व्हेमधून धक्कादायक गोष्टी समोर..पहा..👇
मुंबई – प्रतिनिधी.
पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आणि सोनकीडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर राज्य सरकारचा राज्यातील गरोदर महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
🟥राज्य सरकारच्यावतीने गर्भवती मातेस व गर्भात असणाऱ्या बालकास उत्तम प्रकारची शक्ती मिळावी यासाठी पोषक आहाराचे किट दिले जाते. यात बदाम, खारीक, काजू, गूळ व इतर पौष्टिक आहाराचा समावेश आहे. मातेचे आणि बाळाचे आरोग्य तंदुरुस्त चांगले रहावे या हेतूने हा उपक्रम राबविला जातो. मात्र या हेतूलाच हरताळ फासला जाताना दिसत आहे.
शिरूर तालुक्यातील (जि. पुणे) आंबळे येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आहारातील गूळ आणि काजूमध्ये किडे आढळले आहेत. गरोदर महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याने सरकारचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शासकीय यंत्रणेतील विशिष्ट ठेकेदार प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून जादा नफा मिळण्याच्या दृष्टीने खारीक, काजू, गूळ आदी निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची खरेदी करीत असल्याचे आणि त्यातून मिळणारा मलिदा ओरबाडून खाण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु त्यामुळे गरोदर मातांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
🅾️हे किट कोणत्याही प्रकारची तपासणी न करता आणि त्यातील वस्तूंचा कसलाही दर्जा न तपासता वाटले जात आहेत. पौष्टिक आहारात जिवंत अळ्या, सोनकिडे आणि बुरशी आढळल्यामुळे हे खाद्यपदार्थ सरकारी यंत्रणेकडून दिले जाणे म्हणजे ठेकेदाराचे लाड करण्यासारखे आहे.
🟥निष्कृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांमुळे गरोदर माता व बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. दलालीच्या महाजाळ्यात असणाऱ्या ठिकाणीच हे प्रकार आढळतात, अशी नागरिकांमध्ये चर्चाही आहे.
🛑सरकारला गरोदर मातांच्या आरोग्याशी देणेघेणे नाही. 👉सुषमा अंधारे
या घटनेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली. अंधारे म्हणाल्या, ‘पोषण आहाराच्या नावाखाली गरोदर माता, अंगणवाडीत अचानक छापेमारी केल्यास सर्व ठिकाणी निकृष्ट आणि आजारी पडाल असा माल आहे. सोनकीडे आणि अळ्या आढळणे ही पहिली बाब नाही. शिरूरमधील घटनेचे पुरावे आढळले, तरी त्याच्यावर कारवाई होत नाही. सरकारला त्यांचेच प्रश्न सुटलेले नाहीत. त्यांना गरोदर मातेच्या प्रश्नाशी देणेघेणे नाही. निवडणूक, जागावाटप यामध्ये ही सर्व माणसे गुंतली आहेत’.
🟥आरोग्य यंत्रणेचा कारभार खिळखिळा झाला आहे. या योजनेचे नाव पोषण आहार योजना आहे. मात्र, त्यात पोषक घटक नाही. कुठल्याही अंगणवाडीत खिचडी की रवा असतो हे काही कळत नाही, अशी टीका अंधारे यांनी केली.
🔴ठेकेदारावर कारवाईच्या पोकळ बाता
यासंदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला चोभे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शिरूर तालुक्यातील आंबळे येथे पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने ठेकेदारामार्फत पौष्टिक आहार पुरवला आहे. तो पुन्हा जमा करून त्याचा पंचनामा करून त्याची चौकशी करून जिल्हा परिषदेकडे परत पाठविण्यात येईल. ठेकेदारासोबत जिल्हा परिषदेचा जो करार झालेला आहे, त्या करारानुसार तो ‘पोषण आहार’ बदलून देण्यात येईल. नियमानुसार ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.
🟥पोषण नेमके कुणाचे? – अमोल कोल्हे
गर्भवती महिलांच्या पोषण आहारात अळ्या सापडल्याचा प्रकार धक्कादायक आहे. हा गर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तसेच आहार पुरवण्यात नेमके पोषण कुणाचे आहे? महिला, बालके की ठराविक ठेकेदारांचे, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.
पोषण आहारात निकृष्ट वस्तूंचा पुरवठा गंभीर. 👉आदिती तटकरे
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आंबळे येथे जो प्रकार घडला आहे, ही निश्चितच गंभीर बाब आहे. त्याची प्राथमिक माहिती घेतली आहे. आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषदेचे स्थानिक अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, तसेच चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
🟥धक्कादायक!- पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या २ विद्यार्थिनींवर रॅगिंग
पुणे – प्रतिनिधी.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींवर रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या महिनाभरात या दोन घटना घडल्या आहेत. यातील एक विद्यार्थिनी सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी असून, ती क्ष-किरणशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. दुसरी विद्यार्थिनी भूलशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
🔴बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालय मागील काही काळापासून चुकीच्या घटनांमुळे चर्चेत आहे. महाविद्यालयात वारंवार घडणाऱ्या गैरप्रकारांमुळे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. त्यातच आता गेल्या महिनाभरात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर रॅगिंग झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रॅगिंगचा गंभीर प्रकार घडूनही महाविद्यालय प्रशासनाकडून या दोन्ही प्रकारांबाबत मौन बाळगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
🅾️सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील दोन विद्यार्थिनींनी रॅगिंगची तक्रार महाविद्यालय प्रशासनाकडे केली. या दोन्ही विद्यार्थिनींनी वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पहिल्या विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर रॅगिंग प्रतिबंधक समितीने चौकशी केली. त्यात तक्रारदार विद्यार्थिनी, तिच्या वर्गातील विद्यार्थी, दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांची चौकशी करण्यात आली. यानंतर हा चौकशी अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे पाठविण्यात आला. यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. दुसऱ्या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरही सध्या चौकशी सुरू आहे.
🟥रॅगिंगची पहिली घटना
रॅगिंगची पहिली घटना गेल्या महिन्यात घडली आहे. याप्रकरणी क्ष-किरणशास्त्र विभागात वैद्यकीय पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तक्रार दिली आहे. ही विद्यार्थिनी सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी असून, ती आता पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तिने तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी रॅगिंग प्रतिबंधक समितीने चौकशी केली होती. समितीने चौकशी करून आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर केला आहे.
🔴रॅगिंगची दुसरी घटना.
रॅगिंगची दुसरी घटना गेल्या आठवड्यात घडली. याप्रकरणी भूलशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तक्रार दिली आहे. या प्रकरणी रॅगिंग प्रतिबंधक समितीने चौकशी केली आहे. आता पदव्युत्तर तक्रार समितीकडून पुढील चौकशी सुरू आहे.
🟥रॅगिंगबाबत पदव्युत्तरच्या एका विद्यार्थिनीने गेल्या महिन्यात तक्रार केली होती. याप्रकरणी चौकशी करून अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे पाठविला आहे. दुसऱ्या विद्यार्थिनीची तक्रार गेल्या आठवड्यात मिळाली असून, तो विभागांतर्गत वाद आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे.
डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय
🟥टेन्शन वाढलं!
राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट.- फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक
मुंबई – प्रतिनिधी.
राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट घोंघावत आहे. राज्यामध्ये ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचा अहवाल समोर आला आहे. आजच्या पाणीसाठा अहवालामधून ही माहिती मिळत आहे. अजून पावसाळ्याला दोन महिने अवकाश आहे, त्याअगोदरच पाणीसाठ्यामध्ये मोठी घट दिसून येत आहे.
🛑कोकण विभागामध्ये एकूण जलसाठ्यापैकी ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर पुणे विभागामध्ये ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक विभागामध्ये एकूण जलसाठ्यापैकी ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यामध्ये सर्वात कमी म्हणजेच १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अमरावतीमध्ये ४१ टक्के तर नागपुरमध्ये ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.
🔴नाशिक जिल्ह्यामध्ये २३८ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण २४ धरण या प्रकल्पांमध्ये अवघा २८.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये पाणीप्रश्न गंभीर होत चालल्याचं दिसत आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये फक्त ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २३८ टँकरद्वारे सद्यस्थितीत २३० गावं आणि ४७७ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे.
🟥राज्यातील अनेक वाड्या वस्त्यांमध्ये पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. अनेकदा त्यांना हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत असल्याचं दिसत आहे. यंदा कमी पाऊस पडल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीसाठ्यांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच प्रचंड हाल होत आहेत.
बऱ्याच जिल्ह्यांमध्ये खाजगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 337 गावांना 443 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांसाठी लागणारा चारा आणि पाणी अपुरे पडत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा १७ टक्केवर आल्याने प्रशासनाने उद्योग आणि सिंचनासाठी लागणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हर्सूल तलावाची देखील भूजल पातळी आता ७.५ फुटापर्यंत घटली आहे.
🟥मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये २७ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा, भातसा या धरणांतून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो. या सात धरणांतून दररोज ३,९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो.सातही धरणांची एकूण साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. सध्या सरासरी केवळ २७.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. साल २०२२ मध्ये ३६.७६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. ७ एप्रिल २०२३ रोजी ३३.९० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहचला आहे.
🛑अहमदनगर-कल्याण मार्गावर पिकअकचा भीषण अपघात.
चिमुकलीचा मृत्यू. – ३ जण गंभीर जखमी.
अहमदनगर :- प्रतिनिधी.
अहमदनगर – कल्याण मार्गावरील अहमदनगरमधील कर्जुले हद्दीमध्ये पहाटे पाच वाजता पिकअपचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
🟥याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर- कल्याण रोडवर आज पहाटे साडे पाच वाजता भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींना नजिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअपमधील सर्व प्रवासी हे बीड जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे सर्व जण मंचरहून पारनेरकडे यात्रेसाठी निघाल्याचेही सांगण्यात येत आहे.
🛑 वेटींगवरील तिकिट रद्द करण्यासाठी आकारलेल्या शुल्कातून रेल्वेची ३ हजार कोटींहून अधिक कमाई.
नवी दिल्ली – वृत्तसंस्था.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्काच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने 2 हजार 109 कोटी रुपये कमावले आहेत. माहिती अधिकारातून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात डिसेंबर २०२३ पर्यंत 1 हजार 762 कोटी रुपये कमावले आहेत.
भारतात अनेक लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास आरामदायीही मानला जातो. अनेकदा प्रवास करत असताना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नाहीत. अशावेळी प्रवासी वेटिंगवर तिकीट काढतात. मात्र तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता नसल्यास किंवा अन्य कुठल्याही कारणाने तिकीट रद्द करावे लागते. अशावेळी भारतीय रेल्वेच्या वतीने तिकीट रद्द करण्यासाठी काही शुल्क आकारले जाते. या शुल्काच्या माध्यमातून रेल्वेने घसघशीत कमाई केली आहे.
माहिती अधिकार अधिनियमाच्या माध्यमातून इंदु तिवारी यांनी यांसदर्भात रेल्वे विभागाकडून काही दिवसांपूर्वी माहिती मिळवली. त्यांनी मिळवलेल्या माहितीनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेने तिकीट रद्द करण्यासाठी आकारलेल्या शुल्कामधून 2 हजार 109 कोटी रुपये कमावले तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात डिसेंबर २०२३ पर्यंत 1 हजार 762 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे लोकांचे वेटिंगवर असलेले तिकीट रद्द करणे रेल्वेच्या चांगल्याच फायद्याचे असल्याचे दिसून येते.
🟥महागाई अन् बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून जनता मोदी सरकारवर नाराज.- धक्कादायक आहे सर्व्हेचा निकाल! – लोकनीती सीएसडीएसच्या सर्व्हेमधून धक्कादायक गोष्टी समोर..पहा..👇

🟣सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी आपली संपूर्ण ताकद प्रचारासाठी झोकून दिली आहे. यातच लोकनीती सीएसडीएसच्या सर्व्हेमधून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. दोन टर्म यशस्वीपणे पूर्ण करणारे मोदी सरकार पुन्हा एकदा अर्थात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून लोक सरकारवर नाराज असले तरी, ते भाजपच्याच बाजूनेच मतदान करणार असल्याचे सांगत आहेत. हा सर्व्हे 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या 3 आठवडे आधी करण्यात आला आहे.
🛑पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नरेद्र मोदी यांना लोकांची पहिली पसंती आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे राम मंदिर. याशिवाय, राहुल गांधी यांना पंतप्रधान पदावर पाहू इच्छिनाऱ्यांची संख्या फार कमी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
🟥एनडीएला 12 टक्क्यांची आघाडी
विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. च्या तुलनेत तब्बल 12 टक्के लोकांची NDA ला मतदान करण्याची इच्छा आहे. 2019 मध्ये, उत्तर मध्य भारत आणि पश्चिम भारतातील हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या होत्या. मात्र, दक्षिण भारतात काँग्रेसलाच अधिक जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपची कामगिरी आणखी चांगली होऊ शकते. हिंदी भाषिक राज्यांमध्ये आपली पकड कायम ठेवण्याबरोबरच पक्षाने दक्षिण भारतातही आपला मतदार उभा केला आहे. कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी काँग्रेसच्या तुलनेत कमी आहे, मात्र, त्यात पूर्वीच्या तुलनेत निश्चितपणे सुधारणा अपेक्षित आहे.
🔴मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड.
या सर्वेक्षणात ५० टक्क्यांहून अधिक लोकांनी सरकारच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. तर 40 टक्के लोक सरकारच्या कामावर असमाधानी आहेत. 2019 च्या तुलनेत सरकारच्या कामकाजावर समाधानी असलेल्या लोकांच्या संख्येत 8 टक्क्यांनी घट झाली आहे. बेरोजगारी आणि महागाईबाबत लोक सरकारवर नाराज असून गरीब लोकांमध्ये अशा लोकांची संख्या अधिक आहे.