दूर जरी ध्येयाचे मंदिर, कळस दिसू लागले. ….. आता वाटचाल शेड्यूल्ड दर्जाकडे ( ढोबळ नफा १२ कोटी १८ लाख.)
आजरा.- प्रतिनिधी.

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये आजरा बँकेने गतवर्षी पेक्षा रु.१०० कोटीने ठेवीमध्ये वाढ केली असून एकूण व्यवसायामध्ये रु.१९२ कोटीने वाढ झाली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १५१८ कोटी झाला आहे याच बरोबरीने निव्वळ एनपीएचे प्रमाण हे शून्य टक्के राखण्यात यश मिळवले असून ढोबळ NPA ३.९२ टक्के आहे. या आर्थिक वर्षामध्ये सर्व सेवकांना १० टक्के ते २५ टक्यापर्यन्त इतकी भरघोस पगार वाढ देवून सुद्धा नफ्यामध्ये सातत्यपणा ठेवलेला आहे. बँकेचा एकूण ढोबळ नफा १२ कोटी १८ लाख इतका झाला आहे. हे बँकेचे यश सभासद, हितचिंतक, ग्राहक व कर्मचारी यांना समर्पित आहे.
बँकेची स्थापना झालेनंतर २०१७ साली बँकेला मल्टीस्टेट दर्जा प्राप्त झाला त्यामुळे बँकेचा कार्यविस्तार हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये झाला आहे. याचबरोबर पुढील आर्थिक वर्षात बँकेच्या २ शाखा महाराष्ट्र राज्यात व १ शाखा कर्नाटक राज्यात सुरू होत आहे. पुढील वर्षात याच्या बरोबरीने शेड्यूल्ड दर्जा प्राप्त करण्याचे ध्येय हे बँकेच्या मा. संचालक मंडळाने समोर ठेवले आहे.
अर्बन बँकामधून सर्व निकषामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केले बद्दल (ठेवी रु.८०० कोटी च्या वरील बँक) अविस पब्लिकेशन यांचे मार्फत दिला जाणारा “बँको ब्लू रिबन -२०२३” हा पुरस्कार मिळाला आहे. या वर्षी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यामध्ये सातत्य राखण्याचे काम हे बँकेचे हितचिंतक, सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री. रमेश कुरुणकर यांनी दिली. याच बरोबरीने बँकेच्या या यशामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अविरत काम केल्यामुळेच बँकेची प्रगती होऊ शकते असे मत बँकेचे उपाध्यक्ष श्री. सुनील मगदुम यांनी व्यक्त केले.
