निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्याप्रकरणी साळगाव सन्मित्र पतपेढीच्या सहा विद्यमान संचालकांसह 15 जण अपात्र
कोल्हापूर :
साळगाव सन्मित्र पतपेढी लिमिटेड मुंबईच्या ऑक्टोबर नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर न केल्याप्रकरणी सहा विद्यमान संचालकांसह 15 जणांना अपात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये विद्यमान अध्यक्ष शशभूषण देसाई यांचाही समावेश आहे. यामुळे सहकार व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या व राज्यभरात 10 शाखा असणाऱ्या मुंबई येथील साळगाव सन्मित्र पतपेढी ची पंचवार्षिक निवडणूक 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाली. या निकालानंतर सहकार कायद्यानुसार विहित मुदतीत निवडणूक लढवलेल्या सर्वच पंधरा उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नव्हता. याबाबतची तक्रार एकता नितीन कुराडे यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकारी संस्था अप्पर निबंधक पुणे श्रीकृष्ण वाडेकर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीदरम्यान सर्वच उमेदवारांची साक्ष नोंदवून घेण्यात आली. यामध्ये निवडणूक लढवलेल्या एकही उमेदवाराने विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याचे सिद्ध झाल्याने सर्वच 15 जणांना सहकार कायद्यानुसार कोणत्याही सहकारी संस्थेच्या पदावर राहण्यासाठी तसेच आगामी तीन वर्षाच्या काळात सहकारी संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. यामध्ये विद्यमान अध्यक्ष शशीभूषण देसाई, उपाध्यक्ष मारुती माडभगत, सेक्रेटरी सुरेश दोरुगडे, विद्यमान संचालक संजयसिंह देसाई, सुरेश सुतार, प्रदीप गुडे, माजी अध्यक्ष महादेव निउंगरे, पल्लवी बांदेकर, सागरीका जाधव, हेमंत नातलेकर, नामदेव माडभगत, एकता कुराडे, निकिता कुराडे, दिलीप यादव यांचा समावेश आहे.


