“काळभैरी, बाळभैरी, भैरीच्या नावानं चांगभलं” – काळ भैरची यात्रा रविवारी – मुख्य यात्रा सोमवारी.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
गडहिंग्लज तालुक्यातील काळभैरी देवस्थान महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गडहिंग्लज येथील काळभैरीची यात्रा रविवारी दि. २५ रोजी सायंकाळी गडहिंग्लज शहरात पालखी सोहळा होणार तर सोमवारी दि. २६ मुख्य यात्रा होणार आहे. या यात्रेची प्रशासनाच्या वतीने व स्थानिक देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे.
काळभैरी यात्रेला मागील अनेक वर्षांची मोठी परंपरा आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला पालखी सोहळा तर गडहिंग्लज परिसरातील भाविकांकडून या पालखी सोहळ्यावेळीच काळभैरीचे दर्शन घेण्याला प्राधान्य दिले जाते. पालखीवेळी सासनकाठ्यांना गोंडे बांधण्याची परंपरा कायम आहे. यामुळे सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. गडहिंग्लज शहरातून पालखी काळभैरीच्या डोंगरावर जाते. रात्री बारा वाजता प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होऊन मुख्य यात्रेला प्रारंभ होईल. पहाटेपर्यंत मंदिरात वस्त्रालंकार, महाआरती व इतर विधी होणार आहेत. दि २५ रोजी दु. १२ वा. सबिना फिरणार आहे. यात्रेदिवशी काळभैरी डोंगर भक्तांच्या काळभैरी बाळ भैरी भैरीच्या नावानं चांगभलं या जय घोषणाने परिसर दुमदुमून सोडला जातो.

