जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय न झाल्यास धरणाचे काम बंद पाडणार.- सर्फनाला धरणग्रस्तांच्या बैठकीत निर्धार….
आजरा – प्रतिनिधी.
सर्फनाला धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुनर्वसनाचे कांही प्रश्न अजूनही शिल्लक आहेत. पुनर्वसन कायद्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर पुनर्वसन पूर्ण झाले आहे याची खात्री केल्यानंतरच पुनर्वसन प्राधिकरणाची मान्यता घेऊन घळभरणीचे काम करावयाचे असते. पण अशी बैठक न घेताच आणि पुनर्वसनाचे कांही प्रश्न तसेच ठेऊन घळभरणीचे काम पाटबंधारे खात्याने सुरू केले आहे. याबाबत लेखी निवेदन देऊन श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली धरणाचे काम बंद करायला गेलेल्या सर्फनाला धरणग्रस्तांना २० रोजी बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या लेखी पत्रानुसार दिनांक २० रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत डॉ भारत पाटणकर यांच्या उवस्थितीत बैठक होत आहे या बैठकीत जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याबाबत सकारत्मक चर्चा होऊन निर्णय न झाल्यास धरणाचे काम बंद पाडले जाईल असा निर्णय आज धरणग्रस्तांच्या मेळाव्यात घेण्यात आला आहे. श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की तालुक्यातील आंबेओहळ धरणात पाणी तुंबवून चार वर्षे झाली अजूनही शंभर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन बाकी आहे. त्यामुळे एकदा धरणात पाणी अडविले की पुनर्वसनाचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडतात हा अनुभव लक्षात घेऊन आम्ही सर्फनाला प्रकल्पाचे शंभर टक्के पुनर्वसन न झाल्यास केंव्हाही धरणाचे काम बंद पाडू.

यावेळी अशोक मालव, प्रकाश शेटगे, प्रकाश कविटकर, संतोष पाटील, हरी सावंत, कुंडलिक शेटगे, शंकर ढोकरे, श्रावण पवार, निवृत्ती शेटगे, अर्जुन शेटगे, गोविंद पाटील, कृष्णा ढोकरे, निवृत्ती पाटील, अर्जुन शेटगे यांच्यासह धरणग्रस्त स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाची बैठक –
२० तारखेला होणाऱ्या जिल्हाधिकारी बैठकीची पूर्वतयारी म्हणून प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, तहसीलदार समीर माने, सहाय्यक उपनिबंधक सुजय येजरे यांच्यासोबतआज सर्फनाला धारणस्थळावर प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली.
चौकट–
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न अजूनही बाकी असल्याने उद्या धरणस्थळावर आ. प्रकाश आबिटकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर पारपोली गावठाण खेडगे धरणग्रस्तांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय आजच्या मेळाव्यात घेण्यात आला.
