ट्रक-टँकर चालकांच्या संपामुळे पेट्रोल मिळणार नसल्याच्या भीतीने टाकी फुल्ल करण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनचालकांची तोबा गर्दी.
🛑अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनानिमित्त २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी ?
🛑समाजवादी विचारवंत, नेते, कार्यकर्ते यांची पुणे – शनिवार दि. ६ रोजी पुण्यात बैठक होणार असल्याची आम. आजमी यांची माहिती.
मुंबई:- प्रतिनिधी.
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात राज्यातील मालवाहतूक करणाऱ्या ट्रक-टँकर चालकांनी संप सुरू केला आहे. यामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होऊन इंधन मिळणार नाही, या भीतीने राज्यभरातील पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी एकच गर्दी केली आहे. ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा काल सोमवारी सायंकाळपासून परिणाम दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
रात्री तर अनेक ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांची पंपावर झुंबड उडाली होती. केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात सुरू असलेला मालवाहतूकदारांचा संप बुधवार दि. ३ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलचा तुटवडा भासू लागल्याचेही चित्र आहे. तर दोन दिवस पेट्रोल डिझेल मिळणार नाही. भीतीने पेट्रोल पंपाबाहेर टाकी फूल्ल करण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान संप लांबल्यास अन्य वाहनांबरोबरच इंधन अभावी एसटी महामंडळाच्या वाहतुकीवरही परिणाम होण्याची भीती आहे.
दुचाकी-चारचाकी वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर केलेल्या गर्दीमुळे अर्धा ते एक तास रांगेत उभे रहावे लागत असल्याचे चित्र आहे. मात्र पेट्रोलसाठी लोक तासभऱ लाईनमध्ये थांबत आहेत. दरम्यान मनमाडमधून इंधन वाहतूक ठप्प असल्याने नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये संपाचा परिणाम आज मंगळवारी दिसून येण्याची शक्यता आहे. दरम्यान पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप सुरळीत चालू राहणार असल्याची माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनने दिली आहे.
🔴अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनानिमित्त २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी ?
मुंबई:- प्रतिनिधी.
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी भाजपने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यातच राम मंदिर हा सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय असल्याने या सोहळ्यात सर्व नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी ही सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
‘२२ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. प्रभू राम मंदिर उभारणीसाठी सुमारे ५०० – ५५० वर्षांचा संघर्ष करण्यात आला आहे. शेकडो रामभक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार, या दिवसाची तमाम रामभक्तांना प्रतीक्षा आहे. त्या दिवशी आपापल्या भागांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
‘जयंतीच्या पूर्वसंध्येला राममंदिर ही ‘बाळासाहेबांना श्रद्धांजली’
कोट्यवधी रामभक्तांसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे अयोध्येत राम मंदिर व्हावे, हे स्वप्न होते.बाळासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अयोध्येत २२ जानेवारी रोजी राममंदिराचे लोकार्पण होत आहे, ही बाळासाहेबांना मोठी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मध्यरात्री ठाण्यात रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात केली.शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: रक्तदान केले. ‘परदेशी गुंतवणुकीत राज्याने कर्नाटक, गुजरातला मागे टाकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवला आहे. अनेक उद्योजक आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आजही महाराष्ट्राला पहिली पसंती देत आहेत’, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक मीनाक्षी शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार उपस्थित होते.
वारकरी बांधवांना द्यावे निमंत्रण
राजकारण्यांऐवजी साधू-संत, वारकऱ्यांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण द्यावे, अशी मागणी वारकरी साहित्य परिषेदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन नगरीतील आणि समस्त महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार बांधवांचे श्रीराम मंदिर उभारणीत महत्त्वाचे स्थान आहे. राममंदिर उभारण्यासाठी राज्यातील सर्व स्तरांतील वारकरी बांधवांनी गावोगावी भजन-कीर्तन-प्रवचनाद्वारे गावा-गावातून प्रत्येकी एक वीट व सोबत रोख निधी जमविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. यासाठी रामायण कथा आयोजित केल्या व राज्यात प्रबोधन केले. त्यामुळे साधू-संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्यासह विचारवंत, वारकरी प्रतिनिधी यांना निमंत्रित करावे, भजन साहित्य उपलब्ध करून देऊन रेल्वेद्वारे अयोध्या प्रवासाचे आरक्षण करावे, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेने केली आहे. परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. शांताराम दुसाने, उपजिल्हाध्यक्ष जिभाऊ सूर्यवंशी आदींच्या सह्या आहेत.
🛑समाजवादी विचारवंत, नेते, कार्यकर्ते यांची पुणे – शनिवार दि. ६ रोजी पुण्यात बैठक होणार असल्याची माहिती
मुंबई/महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. अबू आसिम आझमी, – महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष. प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई.- प्रतिनिधी.
समाजवादी विचारवंत, नेते, कार्यकर्ते यांची पुणे – शनिवार दि. ६ रोजी पुण्यात बैठक होणार असल्याची माहिती
मुंबई/महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. अबू आसिम आझमी, – महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष. प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आपल्या देशाच्या संविधानानुसार आणि प्रास्ताविकेनुसार आपला देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प व निष्ठा व्यक्त करणारा आहे. तथापि अद्यापही आपल्या देशाची धोरणे एकूणच शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, युवक, बेरोजगार, महिला, दलित, इतर मागासवर्गीय समाज, अल्पसंख्याक समाजघटक या सर्व बहुजनांच्या विरोधातच असल्याचे जाणवते. समाजवादी पुरोगामी विचारधारेने राजकारणाला कमी लेखण्यानेच अशी परिस्थिती उद्भवली आहे का याचा विचार होणे आवश्यक आहे.
राजकीय सामाजिक क्षेत्रात आपण कित्येक वर्षापासून कार्यरत आहात. लोकशाही, समाजवाद व धर्मनिरपेक्ष समतेचे स्वप्न पहात पुरोगामी आणि विज्ञानवादी दृष्टिकोन असलेला समाज घडविण्याचा विचार आपण मनाशी बाळगून आहात. तर मग आपण आपल्या उद्दिष्टांच्या जवळपास तरी पोहोचलो आहोत कां ? त्या दिशेने आपली वाटचाल तरी सुरू आहे कां? यावर विचार विनिमय करण्यासाठी राज्यातील समाजवादी विचारावर निष्ठा असणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. आपण आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.
राज्यस्तरीय व्यापक बैठक
वेळ – शनिवार दि. ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ११ ते सायंकाळी ५ पर्यंत
जागा – बॅ. नाथ पै सभागृह, राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय, साने गुरुजी स्मारक, ५८७, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रोड, दांडेकर पूल, पुणे ३०
प्रमुख उपस्थिती – मा. आ. कुमार सप्तर्षि. मा. सुभाष वारे, मा. सुभाष लोमटे, मा. अॅड. निशा शिवूरकर, मा. आ. अबू आझमी व अन्य मान्यवर तरी सर्वांनी
या महत्वाच्या बैठकीस आपण आवर्जून वेळेवर व संपूर्ण वेळ उपस्थित रहावे असे आवाहन
प्रताप होगाडे – कार्याध्यक्ष स.पा. महाराष्ट्र, डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर उपाध्यक्ष स.पा. महाराष्ट्र, परवेज सिद्दिकी – प्रधान महासचिव स.पा. महाराष्ट्र, मेराझ सिद्दिकी प्रधान महासचिव स.पा. मुंबई अॅड. रेवण भोसले महासचिव व प्रवक्ता स.पा. महाराष्ट्र, राहल गायकवाड महासचिव स.पा. महाराष्ट्र, श्रीमती साजिदा निहाल अहमद – महासचिव स.पा. महाराष्ट्र, शिवाजी परुळेकर महासचिव स.पा. महाराष्ट्र, राऊफ मोहम्मद शेख – महासचिव स.पा. महाराष्ट्र, डॉ. विलास सुरकर महासचिव स.पा. महाराष्ट्र, विठ्ठल सातव दत्ता पाकिरे, श्रीमती साधना शिंदे, अनिस अहमद मनवेल तुस्कानो, नाना मानकर यांनी केले आहे.
