निसर्ग म्हणजे शरीर आहे. या शरीराच्या नियमाच्या विरोधात जाऊ नका.- सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ वैद्य सुविनय दामले.
( आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात व्याख्यानमाला संपन्न. )
आजरा : – प्रतिनिधी.
निसर्ग म्हणजे शरीर आहे. या शरीराच्या नियमाच्या विरोधात जाऊ नका. नियम मोडला तर शिक्षाही भोगावी लागणारच आहे असे स्पष्ट प्रतिपादन कुडाळचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ वैद्य सुविनय दामले यांनी केले. ते आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या व्याख्यानमालेत बदलता आहार आणि बदलते आरोग्य या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थांनी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.अशोक बाचुळकर होते.
वाचनालयाचे संचालक कुंडलिक नवलकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. वैद्य सुविनय दामले यांचा वाचनालयाचे कार्यवाह सदाशिव मोरे प्रायोजक अश्विन डोंगरे यांचा वाचनालयाचे सहकार्यवाह विनायक आमणगी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. आम्ही पाश्चात्य विचार व संस्कारांचे गुलाम बनलो आहोत. त्यामुळे सर्व आजारांना आपले शरीर निमंत्रण देत आहे. आहारावर कंट्रोल नसेल तर सर्व आजार चुकीच्या जीवन पद्धतीतून निर्माण होतात. शरीरातील ९९ टक्के आजार हृदय व मनाशी संबंधित आहेत. त्या मनाला खंबीर बनवा. संतुलित ठेवा. शांत ठेवा असेही आवाहन वैद्य सुविनय दामले यांनी केले. खाण्यावर बंधन घालू नका मात्र जेवताना पूर्ण आनंद घेऊन जेवा. जेवल्यानंतर काय जेवलो हे विसरून जा. मनात भिती असेल तर सगळे माती होईल. शरीर विहीरीसारखे आहेत त्याची पाण्याची टाकी बनवू नका. श्वास, आहार व नामस्मरण आयुष्यभर करीत रहा. जेव्हा सूर्य असतो तेव्हा जेवा. शरीरातील पचनासाठी योग्य वेळी योग्य आहार असणे गरजेचे आहे. जेवण व झोप यामध्ये अडीच ते तीन तासाचे अंतर असावे. अन्नपचनाला भरपूर वेळ मिळाला नाही तर विष तयार होते. दररोजच्या आहारात ताक, तूप, लोणी, तेल खावे. आपले आयुष्य चार घास सुखाचे खाण्यासाठी आहे. मात्र जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नाही. मिळविलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करा डॉक्टरांसाठी नाही. आज आरोग्य म्हणजे आकड्यांचा खेळ झाला आहे त्यासाठी शरीर, मन व आत्मा याचे आत्मपरीक्षण करा असेही आवाहन वैद्य सुविनय दामले यांनी केले.
कार्यक्रमास मधुकर क्रमित, शंकराव शिंदे, जी. एम.पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर, उपाध्यक्षा गीता पोतदार, कार्यवाह सदाशिव मोरे, सहकार्यवाह विनायक आमणगी, संचालक सुभाष विभुते, विजय राजोपाध्ये, वामन सामंत, रवींद्र हुक्केरी, महमदअली मुजावर, विठोबा चव्हाण, कुंडलिक नावलकर, डॉ. अंजनी देशपांडे, विद्या हरेर, सुचेता गड्डी यासह नागरिक उपस्थित होते.
