🛑एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या पत्रावर २३ आमदारांच्या सह्या.- अपात्रता सुनावणीत मोठा ट्विस्ट
🛑कारखान्याच्या हिताचा विचार करून स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणाऱ्या उमेदवारांना विजयी करा.- श्रमिक मुक्ती दल.
मुंबई :- प्रतिनिधी.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गेल्या काही दिवसांपासून सलग सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने हुकमी अस्त्र बाहेर काढल्याचं बघायला मिळालं. शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी सुरू असताना ठाकरे गटाच्या वकिलांनी एक अटेंडन्स शीट सादर केली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर २१ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीची ही अटेंडन्स शीट असून या बैठकीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर शिवसेनेच्या आमदारांनी सह्या केल्या होत्या. यामध्ये सध्या शिंदे गटात असणाऱ्या आमदारांसहित २३ जणांच्या सह्या आहेत. त्यामुळे ही अटेंडन्स शीट शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
🔴उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, ‘२१ जून रोजी सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदारांच्या बैठकीसाठी व्हिप जारी केला होता. या बैठकीला एकूण २३ आमदार उपस्थित होते. बैठकीत उद्धव ठाकरे यांना समर्थन देत एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्या प्रस्तावाला उपस्थित आमदारांनी अनुमोदनही दिलं. सदर आमदारांनी अटेंडन्स शीटवर सह्याही केल्या होत्या.’
🛑कोणकोणत्या आमदारांचा समावेश?
वर्षावर झालेल्या बैठकीला आता शिंदे गटात असणारे आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर हे उपस्थित होते.
दरम्यान, या अटेंडन्स शीटवरून ठाकरे गटाचे वकील शिंदे गटातील आमदारांना उलटतपासणीच्या दरम्यान प्रश्नांचा भडीमार करत कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
🛑कारखान्याच्या हिताचा विचार करून स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणाऱ्या उमेदवारांना विजयी करा.- श्रमिक मुक्ती दल.
आजरा – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखाना निवडणुकीत कारखान्याच्या हिताचा विचार करून स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची हमी व खालील अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय आज श्रमिक मुक्ती दलाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ संपत देसाई होते. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली तालुक्यात कष्टकरी जनतेच्या अनेक चळवळी चालू आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आमचा हस्तक्षेप महत्वाचा असल्याने खालील मुद्द्यांच्या आधारे उमेदवारांना मते देण्याचा निर्णय आज करण्यात आला.
१- श्रमुदच्या नेतृत्वाखाली जी आंदोलने उपक्रम तालुक्यात घेतले जातात त्या आंदोलन/उपक्रमात भागीदारी करणाऱ्या उमेदवारांना मते देणे
२- तालुक्यात आज सर्फनाला सोडून सर्व धरणे पूर्ण झाली आहेत कारखाना पूर्ण क्षमतेने चालायचा असेल तर धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची हमी देणे.
३- कारखाना कर्जमुक्त करून तो सहकारी तत्वावर स्वबळावर चालविण्याची हमी देणे.
४- स्वच्छ व पारदर्शक कामाची हमी दिली पाहिजे.
५- संचालक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने कारखान्याकडे ऊस आणण्यासाठी विषेश प्रयत्न करण्याची हमी देणे.
६-कोल्हापूर जिल्ह्यातील इतर अग्रेसर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊसाचे बिल देण्याची हमी देणे.
७- या तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून उत्पादकता वाढविण्यासाठी नवनवी बियाणे शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचविण्याचा ऊस विकास कार्यक्रम राबविण्याची हमी देणे.
८-सवलतीच्या दरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व सभासदांना साखर वाटपाची हमी देणे. वरील सर्व मुद्द्यांची हमी देणाऱ्या उमेदवरलाच मते देण्याचा निर्णय आज श्रमिक मुक्ती दलाने घेतला असून तालुक्यातील सर्व सभासदांनी या मुद्द्यांच्या आधारेच मतदान करण्याचे आम्ही आवाहन करीत आहोत. यावेळी कॉ संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, बाबू येडगे, शंकर पाटील, हरी सावंत, मारुती पाटील, भीमराव माधव, बाळू जाधव, श्रावण पवार, विष्णू मांजरेकर, नारायण भडांगे, विजय पाटील, मिनीन परेरा, एकनाथ खरुडे, श्रावण शेटगे, गोविंद पाटील ( गावठाण ) यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
