🛑आजरा नगरपंचायत वाढीव कर आकारणी बाबतच्या तक्रारीला.- अनुसरण नगरपंचायतीची कार्य -🛑 कर्तव्य जबाबदारीची नगरपंचायतने दिली प्रसिद्धीपत्रका द्वारे माहिती.
🛑सर्व श्रमिक संघटना वतीने विविध मागण्याचे तहसीलदारांना निवेदन.
🛑व्यंकटराव प्रशालेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुण्यदिनानिमित्त प्रतिमापूजन.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा नगरपंचायत वाढीव कर आकारणी बाबतच्या तक्रारीला.- अनुसरण नगरपंचायतीची कार्य – कर्तव्य जबाबदारीची नगरपंचायतने दिली प्रसिद्धीपत्रका द्वारे माहिती. नगरपंचायत मुख्य अधिकारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सद्यस्थीमध्ये नगर पंचायत आजरा क्षेत्रामध्ये भांडवली मुल्यावर आधारीत कर आकारणी करून आर्थिक वर्ष २०२३ – २४ करिता केलेल्या कर आकारणी संबधी नगरपंचायत क्षेत्रातील मालमत्ता धारकांना विशेष नोटीस प्रदान करणेत आल्या आहेत.
नोटीस वाटल्यानंतर नागरिकांमध्ये कर आकारणी संबधी माहिती नसल्याचे, मालमत्तेच्या मागणी मध्ये ४ ते ५ पट वाढ झाल्याने सदर आकारणी अवास्तवी असल्याचे तसेच करवाढ रद्द करणेबाबत विविध जनसमुहाकडून निवेदने नगरपंचायत कार्यालयास प्राप्त झालेली आहेत. त्यानुसार नागरिकांच्या मनातील शंकांचे निरसन होणेकामी व नगरपंचायतकडून केलेल्या करवाढीच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे माहिती ही आजरा नगरपंचायत क्षेत्रातील मालमत्ता धारकांना देणेत येत आहे.
१) नगरपंचायत आजरा क्षेत्रातील सार्वजनिक रस्ते, जागा व इमारत या ठिकाणी दिवाबत्ती करणे, आग विझविण्यासाठी सुसज्य अग्निशमन दल ठेवणे, सार्वजनिक जागा, रस्ते, गटारी, साफ ठेवणे, पाणी पुरवठा संबंधी कामे व इतर अशा आवश्यक कामांची जबाबदारी ही नगरपंचायत आजरा कार्यालयाची आहे.
२) सदर कामासाठी येणारा खर्च भागविण्यासाठी नगरपंचायत क्षेत्रामध्ये विविध करांची आकारणी करून ते वसुल करणेचा अधिकार शासनाने नगरपंचायतीस दिलेला आहे.
३) सद्यस्थितीमध्ये आजरा नगरपंचायत क्षेत्रातील कर वसुली ही ग्रामपंचायत कालीन सन २०१६-१७ मध्ये करण्यात आलेल्या कर निर्धारणानुसार करणेत येत होती. म्हणजेच नगरपंचायत स्थापनेपासून ७ वर्षे उलटून ही जुन्याच ग्रामपंचायत कालीन दराने आज पर्यंत वसुली होत आहे.
४ वर्षामध्ये आजरा नगरपंचायत कार्यक्षेत्रामधील वाढता विस्तार त्यामुळे आजरा नगरपंचायत कार्यालयामार्फत होणाऱ्या खर्चात (उदा. पथ दिव्यांची विद्युत देयके, पाणी पुरवठ्यांची विद्युत देयके, दुरुस्तींच्या कांमांसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दरामध्ये वाढ व इतर अनुषंगिक खर्च इ.) वाढ होत आहे. परंतू त्याप्रमाणात उत्पन्नात वाढ होत नाही व त्या कारणाने आवश्यक सोई सुविधा पुरविताना अडचन निर्माण होत आहे.
५) वरील बाबी लक्षात घेवून आवश्यक खर्च भागविण्याकरिता व सुधारीत चांगल्या सुविधा आजरा नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना पुरविण्याकरिता भांडवली मुल्यावर आधारित नवीन कर आकारणी लागू करण्याची प्रक्रिया नगरपंचायत कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. सदर कर आकारणी करिता भारांक ठरविताना शासनाकडून देण्यात आलेल्या दरांमधील कमीत कमी शक्य दर विचारात घेवून दरवाद करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ४०% हून अधिक (म्हणजेच सन २०१७ पासून, नगरपंचायत स्थापनेपासून, गृहीत धरल्यास ही कर वाढ प्रतीवर्षी ६ % च्या जवळपास असल्याचे आढळून येते) अधिक वाढ होणार नाही यानुसार दर निश्चित करणेत आलेले आहेत.
६) तरीही काही मालमत्तांमध्ये ४०% हून अधिक कर वाढ झाल्याचे आढळून येते. असे खालील पैकी एक किंवा त्याहून अधिक कारणाने कर वाढ झालेली असू शकते.
अ) विना परवानगी मोठ्या स्वरुपाचे, वाणिज्य वापर असलेले आर.सी.सी बांधकाम केलेले असलेस.
ब) रोजगार हमी कर व शिक्षण उपकर (हे शासन खाती जमा करणेत येतात हा निधी नगरपंचायत कार्यालयामार्फत खर्च करण्यात येत नाही)
क) परवाना घेऊन अतिरिक्त बांधकाम करून पूर्ण झालेनंतर त्याची नोंद नगरपंचायत कार्यालयात केलेली नसलेस व नगरपंचायत कार्यालयास न कळविता मालमत्तेचा वापर चालू केला असलेस.
(टीप – ६०० चौ. फुट पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या निवासी वापराकरिता केलेल्या बांधकामास कोणत्याच प्रकारचा दंड आकारणेत आलेला नाही.)
तरी वरील बाबी लक्षात घेऊन सर्व आजरा नगरपंचायत वासियांना विनंती करण्यात येते की, त्यांनी नगरपंचायत मार्फत करण्यात आलेली करवाढ प्रक्रिया समजून घेवून ती पार पाडण्यास नगरपंचायत कार्यालयास सहकार्य करावे. आपल्या मालमत्तेवर झालेल्या कर आकारणी संबधी काही तक्रार असल्यास ही तक्रार आवश्यक कागदपत्रासह दिनांक ०५/१२/२०२३ पुर्वी नगरपंचायत आजरा कार्यालयात अर्ज करण्यात यावा.
तसेच जो पर्यंत नवीन कर आकारणीस अंतीम मंजूरी प्राप्त होत नाही तोपर्यंत जुन्या आकारणी नुसार मालमत्ता कर भरणे चालु आहे.
मुख्याधिकारी,आजरा नगरपंचायत, आजरा. यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
🛑सर्व श्रमिक संघटना वतीने विविध मागण्याचे तहसीलदारांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ श्रमिक शेतकरी संघटना, याच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदने देण्यात आले. यावेळी गिरणीकामगार संघटना च्या वतीने महात्मा जोतीबा फुले याना पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर आजरा तहसील कार्यालय मध्ये नायब तहसीलदार माळसाकांत देसाई यांना सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले, कष्टकरी, शेतकरी कामगार, श्रमिकांच्या विविध मागण्यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाने , कंत्राटीकरण थांबवून, किमान वेतन लागू करावे. कामगार कपात न करता , सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. त्याचप्रमाणे दुष्काळ जाहीर करावा. वाढती महागाई, बेरोजगारी यांच्यासह शेतीला हमीभाव मिळावा. समन्वय पाणी वाटप व्हावे, दूध भाव वाढवावा, केंद्र शासनाने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द व्हावेत, स्वामीनाथन आयोग लागू करावा. आधी गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी , शेतकरी कामगार श्रमिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी , विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले ,यावेळी संघटनेच्या वतीने स्थानिक पातळीवरील प्रश्नांच्यासाठी सुद्धा निवेदन देण्यात आले ,यामध्ये शेतकऱ्यांच्या काजू बियांना हमी भाव मिळावा , तसेच आजरा सहकारी साखर कारखाना कारखाना हा शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी तत्त्वाने चालावा, यासाठी शासनाने लक्ष द्यावे, नदीवरील मोटरीना पाणी मीटर बसवण्यास येवू नये पाणी धोरणात व लाईट बिलात बदल करू नये अशा विविध मागण्यांची निवेदन देण्यात आले यावेळी काँ. शांताराम पाटील, नारायण राणे, निवृत्ती मिसाळ, हिंदुराव कांबळे, काॅ. संजय घाटगे, शांताराम हारेर, हरिभाऊ कांबळे, अशोक तानवडे, लक्ष्मी खवरे, राजाराम मांगले, गोपाळ चाळके इत्यादी उपस्थित होते .
🛑व्यंकटराव प्रशालेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुण्यदिनानिमित्त प्रतिमापूजन.
आजरा.- प्रतिनिधी.


व्यंकटराव हायस्कूल व जुनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांचे हस्ते करण्यात आले.. यावेळी इयत्ता नववी ब या वर्गाचे वर्गशिक्षक व्ही. पी. गावडे व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या नियोजनाप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंग . विठ्ठल विजय दळवी, अस्मिता उत्तम नावलकर, सक्षम शशिकांत कांबळे, समृद्धी नामदेव दोरूगडे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात मांडले तसेच समीक्षा शिवाजी मांगले, साक्षी शिवाजी कुंभार यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केल्या. मराठी विषय शिक्षक श्री व्ही.टी.कांबळे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे विषयी सांगताना ते थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, जातीवादाला कडाडून विरोध करणारे एक धाडसी आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व अंधश्रद्धेचे निर्मूलन आणि महाराष्ट्रात स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे क्रातींकारी कार्य ..त्यांचे शिक्षणावर असणारे प्रेम, त्यांनी पहिली स्त्री शिक्षिका घडविली, तसेच त्यांचा गोरगरीब ,दिन दलित यांच्या विषयी असणारा जिव्हाळा त्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी त्यांनी जीवनामध्ये केलेले अपार कष्ट आणि समाजाची सेवा करता करताच त्यांच्या संपूर्ण कुटुंबांनी केलेला मोठा त्याग आपल्या भाषणात सांगितला…
त्यानंतर एम एम देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन समृद्धी सिताराम पाटील व सान्वी ज्ञानदेव निऊंगरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.




