महाराष्ट्रातील बारा बलुतेदार – दैनंदिन जीवनातील देवाघेवाणसह- देवांच्या कार्यात अग्रेसर बलुतेदार.
माहिती. संकलन : मिलिंद पंडित..

पूर्वी प्रत्येक गावात बलूतेदारी पद्धत ही प्रचलित होती. प्रत्येक गावात दैनंदिन जीवनातील देवाघेवाण करण्यासाठी जे व्यवहार होत असत ते पैशानी न होता वस्तु्विनीमय द्वारे होत असे.
म्हणजेच त्या काळी ही वस्तूविनीमय पद्धत वापरण्यासाठी बारा बलूतेदार हे ठरविले गेले होते. यांच्या मार्फतच हे दैनंदिन व्यवहार होत असत.
महाराष्ट्रात शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांना फार महत्वाचे स्थान होते.
शेतकरी हा धान्य पिकवून देत असे व शेती करीत नसलेले इतर लोक हे त्याच्या नेमीच्या महत्वाच्या गरजा पूरविण्याचे कार्य करीत असत. ते म्हणजेच हे बारा बलूतेदार (कारू) हे लोक. बलुतेदार हे गावाचे वतनदार असत व पिढ्यानपिढ्या तेच गावचे ठराविक कामे करीत असत. बारा बलुतेदारांची काही नावे व माहिती खालील प्रमाणे आहे.
(१) कुंभार
कुंभार हा बारा बलूतेदारांपैकी एक बलुतेदार म्हणून ओळखला जात असे. ऋग्वेद काळापासून कुंभार आहेत व त्यांच्या देवांची नावे पंचांनेपीर, भवानी देवी, सांगई अशी आहेत. महाराष्ट्रात कुंभारांच्या 22 पोटजाती आहेत. कुंभारकला ही एक विशिष्ट कला असून त्यासाठी तलावातील किंवा गाळातील विशिष्ट प्रकारची माती लागते.
कुंभार त्याची भांडी बनविण्यासाठी त्याच्या चाकावर हया मऊ मातीचा गोळा ठेवून बांबूच्या काठीने चाकाला गती देतो व त्या गोळ्याला सुरेख आकार देतो. ओल्या मातीपासून पाणी पिण्याचे माठ, घड, गाडगी, मडकी, पणत्या व कौले इत्यादी वस्तू बनवून मग त्या वस्तुंना भाजून विकणाऱ्या करागिरीला कुंभार असे म्हणतात. याशिवाय कुंभार गौरी -गणपतीच्या, दुर्गेच्या व अन्य मूर्ती ही बनवितो. कुंभाराच्या अवजारांमध्ये आवा, गंडा किंवा गुंडा, चोपणे, बांबूचा दांडा, मण्यांची माळ व साचे या वस्तूंचा समावेश असतो.
(२) कोळी
कोळी समाज हा बारा बलुतेदारांमधीलदुसरा बलुतेदार आहे. हा समाज कोल्या वंशीय समाज असल्यामुळे त्यांना ” कोळी ” असे नापडले आहे. कोळी समाजात अनेक जाती आहेत. जसे कोळी, मांगेला कोळी, भोई कोळी, वैतकोळी, सोनकोळी, ख्रिश्चन कोळी इत्यादी आहेत. मासेमारी हा कोळी समाजाचा मुख्य व्यवसाय आहे त्यांचमुळे ह्यांची वस्ती समुद्र किनाऱ्याजवळ दिसण्यात येते. कोळ्यांच्य वस्तीला ‘कोळीवाडा’ म्हणतात. या समाजाचा श्री. एकवीरा आई देवीवर खूप विश्वास असते वनारळीपोर्मिचा सण हा समाज मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कोळी समजचा मुख्य जेवण भात आणि मासे असून गोड पदार्थामध्ये ते नारळीभात, नारळाच्या वड्या व करंज्या हे आहेत. ‘कोळीनृत्य’ हा कोळी समाजाचा मुख्य वैशिष्ट आहे.
(३) गुरव

बारा बलुतेदारपैकी गुरव हे तिसऱ्या क्रमांकवरील समाज आहे. गुरव हे देवळात देवाची पूजा करून घरोघरी बेलपत्री पोचविण्याचे काम करत. अनेक गावांमध्ये ब्राम्हण पुजाऱ्याऐवजी गुरव असत. गुरव व गुरवकी ही व्यवसायावरून पडलेली जात आहे.
(४) चांभार
बारा बलुतेदारपैकी चांभार हे चौथ्या क्रमांकवरील समाज आहे. बूट निर्मिती हा या समाजाचा पारंपरिक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. चांभाराचे मुख्य काम जनावरांच्या कातड्यापासून निरनिराळ्या वस्तू बनविणे हा असतो. त्यात चमड्याच्या चपला, बूट, पर्स, कातडी पट्टे, कातडी चाबूक बनविणे व त्यांची दुरुस्ती करणे ही असत.
(५) मातंग
बारा बलुतेदारपैकी मातंग हे पाचव्या क्रमांकवरील समाज आहे. केतकी पासून दोरखंड बनविणे हा मातंग समाजाचा पारंपरिक व्यवसाय होता. याशिवाय झाडू बनविणे, घराची तोरणे बनविणे, हे ही त्यांचे व्यवसाय होते. गावातील शुभ प्रसंगी मातंगांनी हलगी वाजविण्याची प्रथा होती. मातंग समाजाच्या १५ पोटजाती आहेत. मातंग समाजातील लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण अनेक लोकांना दिले आहे.
व अनेक शूर वीर या क्रांतिवीराच्या तालमीतून तयार झाले होते.
(६) तेली
बारा बलुतेदारपैकी तेली समाज हे सहाव्या क्रमांकवरील समाज आहे. तेली म्हणजेच ते काढून विकणारी व्यक्ती असा पूर्वी अर्थ लावला जात असे परंतु तेली लोकांनी बियांपासून जो रस काढून उपयोगात आणला, त्याला तेल हे नाव मिळाले. तेली समाज हा महाराष्ट्रासह दक्षिण आशियात ही आढळणारी जात आहे.
(७) न्हावी
बारा बलुतेदारपैकी न्हावी समाज हे सातव्या क्रमांकवरील समाज आहे. न्हावी म्हणजेच केशवपन, केशकर्तन, दाढी करणे, केशभूषा, केशरचना इत्यादी व्यवसाय करणारी व्यक्ती. न्हाव्याला नापित, नाभित, वारीक, म्हाली, हजाम असेही म्हणतात. न्हाव्याला लहान मुलांच्या डोक्यावरील जावळ काढण्यासाठी ही विशेषतः बोलविण्यात येते.

(८) परीट
बारा बलुतेदारपैकी परीट समाज हे आठव्या क्रमांकवरील समाज आहे. परीट हा घरोघरचे कपडे गोळा करून त्यावर बिब्याच्या खुणा करून ते कपडे व्यवस्थित धुवून इस्त्री करून पुन्हा घरोघरी पोहचविण्याचे काम करीत असे. त्याला वर्षभर खुप काम असे. परीट समाजातील लोक लढवय्ये व रांगडे असत. कुस्ती खेळण्यात या समाजातील लोक पटाईट असत. धोबीपछाड हा डाव परिटांनीच शोधला आहे.

(९) माळी
बारा बलुतेदारपैकी माळी समाज हे नवव्या क्रमांकवरील समाज आहे. माळी समाज म्हणजे पारंपरिक माळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करणारा होता. या समाजात अनेक पोटजाती आहेत. हे लोक शेती व्यवसायातील असल्यामुळे फुले, फळे, भाज्या, कांदा इत्यादी बागायती पिके काढणे हा मुख्य व्यवसाय करीत असत. माळी हा शब्द माला (संस्कृत) शब्दपासून बनला आहे. माळी समाजातील प्रसिद्ध व्यक्ती संत सावतामाळी हे आहेत.

(१०) महार
बारा बलुतेदारपैकी महार समाज हे दहाव्या क्रमांकवरील समाज आहे. पूर्वी महार हा गावचा हरकाम्या म्हणून ओळखला जात असे. जो ओरडून दवंडी देत असे, व प्रेताचे सारणही ही वाहत असे. महारांकडे खेडेगावच्या सरहद्दी सांभाळणे, चौकीदारी व जासूसी करणे ही कामे पूर्वी देण्यात येत असत. महार समाजातील अनेक लोकांनी नंतर बौद्ध धर्म स्वीकारला आहे.

(११) लोहार
बारा बलुतेदारपैकी लोहार समाज हे अकराव्या क्रमांकवरील समाज आहे. लोखंडाच्या वस्तू घडविणारे कारागीर म्हणजे लोहार. लोहार हे तप्त लोखंडाळा ऐरणीवर ठोकून वस्तुंना आकार देण्याचे काम करीत. उदा. साधारणपणे शेतीची, बागकामाची अवजारे बनविणे, विळे, कोयते, सळ्या, प्राण्यांच्या खुरांचे नाळ, कुदळी, घमेली, खिडक्यांचे गज या वस्तू बनवितात. लोहार समाजात लोहार, पांचाळ, नालबंदी, घिसाडी यां पोट जाती आहेत. त्याचबरोबर छिन्नी, हातोडी घण, ऐरण, भाता, भट्टी हे लोहारांचे पारंपरिक हत्यार व अवजारे आहेत.

(१२) सुतार
बारा बलुतेदारपैकी सुतार समाज हे बाराव्या क्रमांकवरील समाज आहे. लाकडी वस्तू तयार करणारा कारीगार म्हणून सुतार या समाजाची ओळख असे. सुतार हा लाकडापासून फर्निचर व दैनंदिन लाकडी वस्तू बनविण्याचे काम करत असत.
अशा प्रकारे पूर्वी बारा बलुतेदार आपापली कामे उत्तम प्रकारे करत असत. तीच परंपरा आजही महाराष्ट्रात आहे.

व गावातील मुख्य कार्य शेती असल्यामुळे शेती करणारा शेतकरी त्यांना त्यांच्या या कामांच्याबदली धान्य पुरवित असे व त्यावेळी पैशांचे कोणतेही व्यवहार होत नसत. परंतु आता मात्र लोक पैशांच्या बदल्यात किंवा मुद्रांच्या बदल्यात यातील कोणतीही सेवा घेऊ शकतात.
संदर्भ :- पुरातन विभाग
