आपल्या मुलीशी त्या तरुणाचे लग्न होऊ नये म्हणून जादूटोणा व अघोरीचा मलिग्रेत प्रकार.- आजरा पोलिसात
गुन्हा नोंद.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा मलिग्रे येथील एका तरुणाचे आपल्या मुलीशी लग्न होऊ नये म्हणून जादूटोणा व अघोरी प्रकाराचा अवलंब केल्याप्रकरणी आजरा पोलीसात ग्रा. पं. सदस्या रेश्मा शामराव बुगडे, शामराव दत्तू बुगडे ( दोघे रा. मलिग्रे ), सुनील बाबु निऊंगरे (कागिनवाडी) व एका भोंदूबाबा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद संबंधित तरुणाने पोलीसात दिली आहे.
याबाबत आजरा पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि,
फिर्यादी तरुण, रेश्मा बुगडे व शामराव बुगडे हे एकाच गावातील असून फिर्यादी यांचे बुगडे यांच्या मुलीशी गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. फिर्यादी व मुलीच्या घरी याची सर्वांना माहिती होती. संबंधित मुलीला फिर्यादी तरुण व त्याचे नातेवाईक आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती लग्नाची मागणी घालण्यासाठी बुगडे यांच्या घरी गेले होते. यावेळी बुगडे यांनी तरुणाला अपमानास्पद वागणूक देऊन नकार दिला.
सुनील निऊंगरे आणि एका भोंदूबाबाच्या मदतीने दोघेजण जादूटोण्याचे प्रकार करू लागले. याचाच एक भाग म्हणून २९ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गावातील स्मशानभूमीत जाऊन काहीतरी पुरले असल्याचे फिर्यादीचा मित्रांनी पाहिले व फिर्यादीला सांगितले. स्मशानभूमीत काय पुरले आहे हे पाहण्यासाठी फिर्यादी गेला असता त्याला आपला व संबंधित मुलीचा फोटो, लिंबू, पांढरी मोहरी व चंदेरी रंगाचा कागद पुरून त्यावर एक अंडे व दारू ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुन्हा २८ ऑक्टोबर रोजी रात्री ८
वाजण्याच्या सुमारास कोवाडे मार्गावर रेश्मा बुगडे हिने दुचाकीवरून जाऊन मरगुबाई मंदिराच्या बाजूला
असलेल्या जंगलात जिवंत कोंबडी, अंडे

व एक काळे, बाहुले झाडावर मोळा मारून लटकविलेले आढळले. पुन्हा
पुन्हा असे प्रकार भोंदूबाबाच्या मदतीने केल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नाईक करीत आहेत.

हा नेमका भोंदूबाबा कोण…असावा.
गेले काही दिवस मलिग्रे परिसरात आपल्या अघोरी जादूटोण्याची दहशत पसरविणारा भोंदूबाबा कोण ? असा सवाल तालुकावासीय उपस्थित करीत आहेत. या प्रकरणानंतर भोंदूबाबा गायब झाला असून हा भोंदूबाबा कोण अशी चर्चा व या भोंदूबाबा शोध लवकरच घ्यावा अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.

