तौत्के चक्रीवादळ:-
उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्या शिक्षिकेची मदतीसाठी हाक
विरार. प्रतिनिधी. २६ मे.
तौत्के चक्रीवादळाने कोकणासहित पालघर पट्ट्यात प्रचंड नुकसान झालं आहे. मुंबई आणि आसपासची ठाणे आणि विरार पट्ट्यातही नुकसान झालं आहे. मात्र आता या वादळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिकेचंही मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या तिन्ही बड्या नेत्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे या ९० वर्षांच्या आहेत. सुमन सध्या वृद्धाश्रमात आहेत. परंतु वसईतील या वृद्धाश्रमाला तोत्के वादळाचा फटका बसला.. त्या वास्तव्यास असलेल्या या वृद्धाश्रमाला मदत मिळावी, अशी मागणी या शिक्षिकेने आपले विद्यार्थी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर इथल्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत शिक्षिका होत्या. तिथे त्या गणित आणि विज्ञान हे विषय शिकवत होत्या. त्या 1991 मध्ये निवृत्त झाल्या.
या चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालं. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर”, असं शिक्षिका सुमन म्हणाल्या.
