समूह शाळा प्रकल्पास पालक- बालक-शिक्षक संघटनांसह बेरोजगार डी.एड्,बी.एड् धारकांचा तीव्र विरोध.
आजरा.- प्रतिनिधी.
शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा शासनाचा डावपेच हाणून पडणार. शासनाच्या वीस पटाखालच्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाला होता त्याला सर्व थरातून विरोध झाला आता याच शाळा पुन्हा बंद करण्याचा शासनाचा डाव आहे. तो पालक बालक शिक्षक संघ हाणून पाडणारच शिक्षणावर खर्च झाल्यास पुढची पिढी चांगली घडेल. ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देताना खर्चाचा हिशेब लावला मात्र आमदारांचे भत्ते वाढताना याचा विचार केला नाही. बड्या भांडवलदारांच्या गाड्या सुसाट जाण्यासाठी रस्ते बांधण्यावर करोडो रुपये खर्च केले जात आहेत. परंतु शिक्षणावर केलेला खर्च कधी वाया जात नाही आमची मुले आमच्या गावच्या शाळेतून दुसऱ्या शाळेत जाणार नाहीत याची सरकारने नोंद घ्यावी. विनाकारण वेळ काढूपणा करणे योग्य नाही. शिक्षक भरती करत असताना डिग्री घेऊन घरी बसणाऱ्या लाखो बेरोजगारांचा विचार करावा, कोणत्याही परिस्थितीत आमची मुले गावची शाळा सोडणार नाहीत, त्यामुळे समूह शाळा कार्यक्रम मागे घेण्यात यावा बळजबरीने प्रकल्प लादल्यास शासनाला जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागेल तरी शासनाने त्वरित निर्णय मागे घ्यावा. वीस पटाखालील शाळेच्या गावांनी आंदोलनासाठी तयार राहावे. शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांच्यासह नागरिकांनी या शासनाच्या निर्णयाला विरोध करावा असे आवाहन संघटनेद्वारे करण्यात येत आहे. शासनाच्या कंत्राटी नोकरभरती, शाळा दत्तक योजना, समुह शाळा व शिक्षक भरतीसाठी होत असलेला विलंब हे खूप भयानक आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी व आंदोलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रक शिवाजी गुरव यांनी सर्व शिक्षक संघटना, बेरोजगार डी.एड् बी.एड् संघटना, प्रत्येक गावातील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व शिक्षक व विद्यार्थी यांनी संपर्क साधावा व आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
