राधानगरी व भुदरगड तालुक्यातील लंपी आजार प्रतिबंधासाठी अतिरिक्त पथक द्या : आमदार प्रकाश आबिटकर
पशुसंवर्धन आयुक्त श्री.वसेकर यांचेकडे मागणी
गारगोटी प्रतिनिधी,
राधानगरी व भुदरगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लंपी आजाराचा शिरकाव जनावरांवर झालेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून या आजारावर तात्काळ प्रतिबंध व्हावा यासाठी पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त पथक या दोन्ही तालुक्यामध्ये द्यावे अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त श्री.वसेकर यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राधानगरी व भुदरगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लम्पी आजाराचा शिरकाव झालेला असून राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा, ठिकपुर्ली व भुदरगड तालुक्यातील दारवाड गावातील गायी दगावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. पशुधनावरील लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संर्सगित क्षेत्रातील पशुधनांचे लसीकरण, गुरांची खरेदी-विक्री बंदी, जनावरांच्या गोठ्यात किटकनाशकांची फवारणी, पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील लम्पी आजारावर तात्काळ उपयययोजना व्हाव्या यासाठी योग्य त्या उपययोजना त्वरीत कराव्यात. तसेच जास्तीत-जास्त औषधे व व्हॅक्सीन या तालुक्यामध्ये पाठवावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.
शुक्रवार दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती, भुदरगड व दुपारी 2 वाजता पंचायत समिती, राधानगरी येथे लंपी आजरा उपययोजना करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधवांनी स्थानिक प्रशासनाच्या सुचनेप्रमाणे योग्य त्या उपाययोजना करून हवालदिल न होता परिस्थीतीचा धिराने सामना करावा असे आवाहन केले आहे.
.
