मृतांची संख्या २७ तर ७८ जण बेपत्ता.- शोधकार्यामध्ये पावसाचा व्यत्यय. ( सलग चौथ्या दिवशीही शोधमोहीम सकाळपासून सुरू .)
खालापूर (जि.रायगड)
इर्शाळवाडीतील मदत आणि बचाव कार्य शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी सुरू होते. दरडीखाली बचाव पथकाला आणखी पाच मृतदेह सापडले असून मृतांची संख्या २७ वर पोहोचली आहे. अद्याप ७८ जण बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढू शकते.मदत कार्यात पावसाचा व्यत्यय येऊ लागला आहे. या दुर्घटनेतील चार जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत.
दरम्यान,शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. सततच्या पावसामुळे शोधकार्यात प्रचंड अडचणी येत असून यंत्रसामुग्रीची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात चिखल, दगड आणि मोठमोठी झाडे सर्वत्र पसरल्याने मदत कार्य कठीण बनले आहे.राष्ट्रीय आपत्ती कृतिदलाचे जवान,’ एल अँड टी’चे कामगार, अपघातग्रस्त मदत पथक, स्थानिक तरुण, इर्शाळवाडीतील ग्रामस्थ आणि कोल्हापूर व्हाइट आर्मीचे जवान मृतदेह व गाडल्या गेलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी तिसऱ्या दिवशीही राबत होते. दुर्घटना होऊन तीन दिवस झाल्याने दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शनिवारच्या शोधकार्यात पिंकी संदेश पारधी (वय २५), नांगी किसन पिरकड (वय ५०), कृष्णा किसन पिरकड (वय २७), भारती मधू भुतांबरा (वय २२) आणि हिरा मधू भुतांबरा (वय १६) यांचे मृतदेह हाती लागले आहेत.
जनावरे गमावल्याचे दुःख.
इर्शाळवाडीवर कोसळलेल्या संकटात अनेक ग्रामस्थांनी आपली जिवाभावाची जनावरेही गमावली आहेत. मातीच्या खाली आतापर्यंत चार बैल आणि तीन शेळ्या मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्याच ठिकाणी खड्डा करून त्यांचे दफन करण्यात आले. कुटुंबीयांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरायचा प्रयत्न करत असलले ग्रामस्थ आपल्या घरातीलच एक जीव कायमचा सोडून गेल्याने अधिकच खचल्याचे दिसून आले. गावातील वृद्ध माणसे आपल्या मृत पाळीव प्राण्यांच्या देहाकडे पाहून अश्रू ढाळत होती.
श्वानांचे प्रयत्नही अपुरे
राष्ट्रीय आपत्ती कृतिदलाच्या मदतीसाठी शेरू आणि जॅकी असे दोन श्वान आघाडीवर आहेत; परंतु १५ ते २० फुटांच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह शोधून काढण्यात तेही कमी पडत आहेत. कोल्हापूरच्या ‘व्हाइट आर्मी’चे पथक पहिल्या दिवसापासून सापडलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करत आहे.
उद्धव ठाकरेंकडून सांत्वन
महाराष्ट्रातील धोकादायक, दरडींच्या छायेत येणाऱ्या गावांची यादी करून त्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेण्याची गरज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केली आहे. यासंदर्भात कोणतेही राजकारणमध्ये न आणता सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. ठाकरे यांनी शनिवारी इर्शाळवाडीतील पीडितांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.आपण मुख्यमंत्री असताना पुनर्वसनाचा आराखडा तयार केला होता आता त्याचा नव्याने अभ्यास करावा लागेल, असेही ते म्हणाले.
इर्शाळवाडीच्या प्रश्नावर केंद्र सरकारची मदत मागितली आहे, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे. इर्शाळवाडीच्या पुनर्वसनासाठी सिडकोला निर्देश दिले आहेत,त्याचप्रमाणे राज्यातील इतर दरडप्रवण भागांतील वस्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी एक योजना तयार करण्यात येईल. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
अनाथांच्या मदतीला शिंदे फाउंडेशन

इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथांचे पालकत्व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनने स्वीकारले आहे. आज दुर्घटना स्थळालगत बांधलेल्या शिबिरात पोहोचलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.आश्रमशाळेत शिकणाऱ्या अनेक मुलांचे पालक या दुर्घटनेत मरण पावले असून त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी या फाउंडेशनने घेतल्याचे गोऱ्हे यांनी नमूद केले. मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्वेक्षण करून अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
